You are currently viewing नितेश परीट यांना पोट्रेट आर्टिस्ट ग्रुप स्पर्धेचे उपविजेतेपद

नितेश परीट यांना पोट्रेट आर्टिस्ट ग्रुप स्पर्धेचे उपविजेतेपद

बांदा

मडुरा येथील युवा कलाकार नितेश परीट याच्या शिल्पाला स्व. शांता देशपांडे उपविजेता पुरस्कार प्राप्त झाला आहे. पोट्रेट आर्टिस्ट ग्रुप स्पर्धेच्या सातव्या वार्षिक कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सदर कार्यक्रम विवा इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट्स, विरार येथे पोर्ट्रेट आर्टिस्ट ग्रुपने आयोजित केला होता.

नितेश परीट यांना विशेष समारंभात ज्येष्ठ रंगकर्मी मनोज जोशी यांच्या हस्ते रोख २५ हजार रुपये व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. नितेश परीट यांच्या शिल्पाचे सर्वच मान्यवरांनी कौतुक केले. नितेश परीट यांना यापूर्वीही विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
स्व. शांता देशपांडे पुरस्कार मिळाल्याबद्दल नितेश परीट यांनी आनंद व्यक्त केला आहे. आपण घेतलेल्या कष्टाचे चीज झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यांनी स्पर्धेबद्दल विस्तृत माहिती दिली. देशपातळीवर स्पर्धा होऊन प्रत्येक महिन्यात एक विजेता निवडण्यात येतो. अंतिम स्पर्धेत १२ दिग्गज स्पर्धकांमधून पाच परीक्षक तीन विजेत्यांची निवड करतात.
त्यांनी पोर्ट्रेट आर्टिस्ट ग्रुपचे संस्थापक गुरुवर्य वासुदेव कामत, प्रख्यात शिल्पकार आणि चित्रकार वंजारी सर, आचरेकर सर व बहुळकर सर यांचे आभार मानले आहेत. तसेच विवा इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट्स आणि प्राध्यापक व स्वयंसेवक यांचेही आभार मानले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा