वैभववाडीत मुसळधार पाऊस
वैभववाडी
तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. करुळ घाटात पावसामुळे पडझड सुरु झाली आहे. घाटात धोक्याची खिंडनजीक दरड गटारात कोसळल्याने संपूर्ण पाणी, दगड मातीसह रस्त्यावरून वाहत आहे. त्यामुळे वाहातूकीला अडथळा निर्माण झाला आहे.
गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे करुळ धोक्याची खिंड येथे दरड रत्त्यावर कोसळली होती. त्याठिकाणी दरड बाजूला हटवून उपाययोजना केली होती. याच ठिकाणी याही वर्षी दरड गटारात कोसळून डोंगरातून येणारे पाणी, दगड मातीसह रस्त्यावर येत आहे. त्यामुळे रस्ता निसरडा होऊन वाहातूकीस धोकादायक बनला आहे.
कोल्हापूर – तळेरे महामार्ग हा राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाकडे हस्तांतरण झाला आहे. त्यामुळे या मार्गात येणार करुळ घाट ही प्राधिकरणाकडे देखभाल दुरुस्तीसाठी येतो. माञ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या घाटमार्गाच्या देखभाल दुरुस्तीकडे गांभिर्यांने पहाताना दिसत नाही. त्यामुळे घाटमार्गाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे. उन्हाळ्यात घाटातील रस्त्यावर पडलेल्या खड्डयामुळे वाहनचालक व प्रवाशांचे हाल होत होते. तब्बल महिनाभर घाटातील वाहातूक बंद ठेवून घाटातील रस्त्याचे डांबरीकरणाचे काम करण्यात आले. पावसाळ्यात वारंवार कोसळणा- या दरडीमुळे वाहातूकीला अडथळा व वाहातूकीची मोठी कोंडी होते. याबाबत पावसाळ्यापूर्वी उपाययोजना करण्यात आली नसल्याचा आरोप नागरीकांकडून केला जात आहे. पावसाळ्यात वाहातूक सुरळीत करण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाने करुळ घाटात २४ तास कार्यरत असलेली यंञणा उभारावी अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.