You are currently viewing महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात झालेला भूकंप अनैसर्गिक; सर्वसामान्यांच्या मनात शंका

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात झालेला भूकंप अनैसर्गिक; सर्वसामान्यांच्या मनात शंका

सिंधुदुर्ग चे पालकमंत्रीही पोहोचले गुवाहाटीला

राज्यसभेच्या निवडणुकीत पडलेली ठिणगी विधानपरिषदेच्या निवडणुकीत पेटली आणि विधानपरिषद निवडणुकीच्या संध्येला शिवसेनेतून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे जवळपास तीस आमदारांना घेऊन सुरतला रवाना झाले आणि शिवसेना पक्ष फुटल्याची वार्ता सर्वत्र पसरली. शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हा प्रचंड मोठा धक्का मानला गेला. उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून शिवसैनिकांना भावनिक साद घातली, त्याचप्रमाणे फुटीर गटाच्या आमदारांना पुन्हा शिवसेनेकडे येण्यासाठी आवाहन केले. एवढेच नव्हे तर शिवसेना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत फुटीर आमदार गटाचे प्रमुख नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कोणतीही कारवाई न करण्याचे ठरविले. या सर्व घडामोडी घडत असतानाच शिवसेनेच्या ५५ आमदारांपैकी जवळपास पंचेचाळीस आमदार, मंत्री हे सुरतहुन गुवाहाटीला गेलेल्या एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळाले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माजी गृहराज्यमंत्री आम.दीपक केसरकर हे एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणून वारंवार पत्रकार परिषदांना सामोरे जाताना आपण सर्व पाहत होतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसैनिकांनी पक्षनिष्ठा आणि कट्टर शिवसैनिक म्हणून आम. वैभव नाईक सिंधुदुर्ग जिल्ह्यात येताच त्याचे जल्लोषात स्वागत केले आणि फुटीर गटाचे आमदार म्हणून माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या घरावर दगडफेक करण्यापर्यंत मजल गेली. कोकणातील दीपक केसरकर वगळता इतर आमदार शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले असे सांगितले जात असतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आज दुपारी विमानाने गुवाहाटीकडे रवाना झाले व शिवसेनेचे बंडखोर गटाचे आमदार मंत्री राहत असलेल्या हॉटेलमध्ये जाऊन त्या गटात सामील झाले. उदय सामंत नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांना भेटल्याचे चित्रही तात्काळ व्हायरल झाले. त्यामुळे आणखी एक मंत्री बंडखोर गटाला जाऊन मिळाल्याचे दिसून येत आहे.

एकंदरीत शिवसेनेचे सर्व आमदार मंत्री बंडखोर गटाकडे जात असल्याने शिवसेना पक्षात पडलेली उभी फुट किंवा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात झालेला भूकंप नैसर्गिक नसून घडवून आणलेला आहे की काय? अशी शंका सर्वसामान्यांच्या मनात उत्पन्न होत आहे. लवकरच या सर्व प्रकरणावर पडदा पडून सत्य बाहेर येईल अशीच सर्वांना आशा वाटत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा