कोकणातील डेगवे गावचे “गणेश” मूर्तीकार..! श्री. गणेश चतुर्थी जवळ आली आहे. त्यामुळे कोकणातील प्रत्येक गावातील लोकांची लगबग सुरू झाली आहे. गणेश मूर्तीकार दिवस रात्र आपल्या गणेश चित्रशाळेत “गणेशमुर्ती” रंगविण्यात व मुर्ती देण्यात कार्यमग्न आहेत ; तर ज्यांच्या घरी गणपती येणार त्या लोकांची घराची रंगरंगोटी, व “माटी”साठी लागणारे सामान गोळा करण्यात व्यस्त आहेत. या पार्श्वभूमीवर कोकणातील सर्व गावांमध्ये असणाऱ्या गणेशमूर्तीकारा प्रमाणे आपल्या डेगवे गावात सुद्धा बरेच “गणेश मूर्तिकार” आहेत. ते आपली कला गणेशमूर्तीच्या स्वरूपात किंवा चित्रकलेच्या स्वरूपात सादर करताना दिसतात. अशाच पैकी डेगवे गावातील कार्यरत असलेल्या विविध कला गुण संपन्न कलाकारांचा; तसेच पूर्वी होऊन गेलेल्या व मला ज्ञात असलेल्या कलाकारांचा छोटासा अल्प परिचयाचा आढावा या छोटेखानी लेखात घेत आहे. फार वर्षांपूर्वीची गोष्ट. अंदाजे ५० वर्षापूर्वीचा काळ असेल. त्याकाळी डेगवे गावात आंबेखणवाडीचे स्व. नामदेव राघोबा देसाई हे विद्यार्थी दशेतील हरहुन्नरी “गणेशमुर्ती” कार होते. ते शाळेय शिक्षण घेत असताना सुरवातीच्या काळात आंबेखणवाडीत घरी; त्यानंतर बाजारवाडीत मा. गुंडू केसरकर यांच्या शेत मांगरात “गणेश मुर्ती” बनवित होते. त्यामुळे सदर “गणेश मुर्ती” बनवितांना त्यांना जवळून पहाण्याचा योग मला आला होता. त्यानंतर ते कला शिक्षक म्हणून मालवण, देवबाग हायस्कूल मध्ये नोकरीला राहिले. नंतर थोडी वर्षे तेथे “गणेश मुर्ती” केल्या. आता त्यांच्या कलेचा वारसा त्यांचा सुपुत्र योगेश देसाई हा थोड्या फार प्रमाणात घरातील मुर्ती व इतर कला बनवून चालवित आहे. त्याकाळी डेगवे गावात दुसरे कलाकार श्री बाबी शेटकर आणि बंधू बाजारवाडी हे होते. ते सुरुवातीला गणेशमुर्ती आपल्या घरी करीत होते. नंतर जुन्या सोसायटीकडे काही वर्षे गणेश मुर्ती बनविताना त्यांना पाहिले आहे. तेथे बांदा गावातील स्व. प्रकाश येडवे हे त्यांचे सहकारी म्हणून येत होते. स्व. कृष्णा सोनु देसाई फणसवाडी यांनी दोन, तिन वर्षे फणसवाडीत गणेशमूर्ती बनविल्या होत्या. नंतर ते नोकरी निमित्ताने मुंबईला आले. जांभळवाडीत स्व. प्रकाश वासुदेव देसाई यांनी आपल्या रहात्या घरी काही वर्षे गणेशमूर्ती बनविल्याचे आठवते. नंतर ते नोकरीसाठी मुंबईला गेल्यानंतर तेथे सुध्दा या कलेचा वारसा त्यांनी जपला होता. शिवाय या वाडीत बाबा मेस्त्री यांनी आपल्या कलेला वाव दिलेला आहे. आता गणेशमूर्तीची हि कला त्यांचा मुलगा श्री. बाळ मेस्त्री अव्याहतपणे चालवित आहेत. श्री माऊली मंदिर जवळपास असलेले मेस्त्री हेही गणेश कलाकार होते. स्व. रामा चव्हाण बाजारवाडी यांनी या कलेचा वारसा पहिल्या पासून चांगल्याप्रकारे चालविला होता. आता सदर कला त्यांची मुले सर्वश्री प्रकाश चव्हाण, प्रविण चव्हाण उत्तम प्रकारे चालवित आहेत. शिवा्य गावातील अन्य कलाकार आपापल्या परीने “गणेश मुर्ती” घडवित असायचे ते मला आजही आठवते. आपल्या गावातील गणेश मुर्तीकार असलेली हि कलाकार मंडळी त्यावेळी बैल गाडीतून विशिष्ट गावातून शाडूची माती हि दोन, अडीच महिन्यापूर्वी आणीत होते. आणि ती माती बारीक व मऊ करणे. नंतर नागपंचमीला “नागोबा”बनविणे. गोकुळ अष्टमीला “श्री कृष्णाच्या”मुर्ती बनविणे हे काम करायचे. शिवाय गावातील लोकांच्या आगाऊ सुचनेनुसार त्यांच्या “गणेश मुर्त्या” बनविणे. हे त्यांचे काम गणेश चतुर्थीपूर्वी किमान दोन महिने चालायचे. आम्ही लहान मुले प्रत्येक वेळी त्या गणेश शाळेत जाऊन प्रत्येक दिवशी घडविलेल्या आकर्षक “गणेश मुर्त्या ” व त्या सोबतची चित्रांची पहाण्यासाठी नेहमी जात होतो. तो पहाण्याचा आनंद वेगळा असायचा. ते पाहून आल्यावर आमच्या बालमित्रात सतत चर्चा करीत होतो. पहिल्यांदा सर्व कलाकार मंडळी “गणेश मुर्त्या” हाताने बनवित असायचे. नंतर आता त्या मुर्त्यांचे हळूहळू गणेश मुर्तीचे तयार साचे आले आहेत. आणि त्या तयार साच्यातून वेगवेगळ्या “गणेश मुर्त्या” आकाराला येऊ लागल्या आहेत. गणेश मूर्तीकार आपल्या या आगळ्या वेगळ्या कलेच्या माध्यमातून वेगवेगळ्या गणेश मुर्ती घडवित असतो. ती त्याची अंगभूत कला असते. पारंपारिक’ गणेश मुर्ती’ ऐवजी एक वेगळ्या, वेगवेगळ्या पद्धतीच्या मुर्त्या घडवण्यात त्या कलाकारांचा हातखंडा असतो. ती मुर्ती घडविण्यात त्यांना एक प्रकारची मजा वाटते. त्याकाळी श्री बाबी शेटकर, बाजारवाडी, श्री कृष्णा देसाई फणसवाडी, श्री रामा चव्हाण बाजारवाडी, शिवाय बाबा मेस्त्री जांभळवाडी किंवा गावातील अन्य ज्ञात, अज्ञात कलाकार आपापल्या परीने गणेश मुर्ती घडवित असायचे. ते मला आजही आठवते. श्री बाळ मेस्त्री यांनी आपली कला अव्याहतपणे चांगल्याप्रकारे सुरू ठेवलीआहे. गणेश मूर्ती घडवणे. त्या विविध रंगाच्या माध्यमातून लोकापर्यंत आपली कला सादर करणे. नवरात्रोत्सव कार्यक्रमाच्या वेळी नवदुर्गा देवींच्या मुर्त्या घडवणे. शिवाय एखादी शाळा किंवा एखाद्या गावातील मंदिरातील भिंतीवर तसेच अन्य गावातील लोकांच्या गणपती पुजन करतात त्या भिंतीवर वेगवेगळी चित्रे रेखाटणे हे त्यांचे विशेष असे काम आहे. डेगवे या गावातील प्रतेक गावकरी व, कलाकार मंडळी सामाजिक, शैक्षणिक, संस्कृतिक, सहकार, शेती, विविध कला शिक्षक, सैन्यदलात, पोलीस दलात, खाजगी, शासकीय, निमशासकीय, शेती व्यवसाय करणारे शिवाय राजकीय कार्यकर्ते असलेल्यांचा गाव आहे. ते आपापल्या क्षेत्रात आपल्या कार्य कर्तुत्वाने वेळोवेळी लोकांसमोर आलेले आहेत. अलीकडे तात्या स्वार हा हरहुन्नरी कलाकार भजनीबुवा शिवाय, नाट्य, व डेकोरेशन क्षेत्रातील भरीव कार्य करणारी व्यक्ती म्हणून सर्वज्ञात आहे. अनेक क्षेत्रात वेगळेपण व आधुनिक पध्दतीचा अवलंब करणारे व्यक्तीमत्व म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते आहे. त्यांचा जनसंपर्क सुध्दा चांगला आहे. डेगवे गावातील दुसरे सुपुत्र स्वर्गीय प्रकाश वासुदेव देसाई यांनी काही दिवस आपल्या गावात मूर्ती घडवल्या होत्या. त्यानंतर ते मुंबई मध्ये नोकरी निमित्त गेले. मुंबईमध्ये मुलुंड येथे त्यांनी आपल्या वडिलांच्या नावे “वासुदेव आर्ट” नावाने कार्यशाळा सुरु करुन लहान गणेश मुर्ती पासून मोठ्या गणेश मुर्ती, पर्यंत मुर्ती बनविल्या व वेगळी ओळख निर्माण केली आहे. नवरात्रीत वेगवेगळ्या आकाराच्या व वेगळी रुपे साकारणा-या “देवीच्या मुर्त्या” घडविल्या आहेत. सदर काम वर्षभर चालत असून त्यांचा तो व्यवसाय आहे. हे मी प्रत्यक्ष पाहिले आहे. अलीकडच्या काळात त्यांचे सुपुत्र वासुदेव प्रकाश देसाई यांनी जे. जे. कला आर्ट मधून विशेष पदवी घेऊन वडीलांच्या मागे त्यांच्या कलेचा वारसा चांगल्याप्रकारे चालवीत आहेत. हि गोष्ट निश्चित कौतुकास्पद आहे. खरोखरच मुंबईसारख्या महानगरीत हे जिकरीचं काम इमाने, इतबारे करीत आहेत. ही निश्चितच प्रेरणा देणारी बाब आहे. शिवाय समस्त डेगवे ग्रामस्थांना ही अभिमानाची गोष्ट आहे. या सर्व कलाकार मंडळीना व कोकणातील सर्व गणेश मुर्तीकारांना; गावातील सर्व गावकरी मंडळीना ग्रामदेवता श्री. माऊली, महालक्ष्मी, स्थापेश्वर यांची कृपादृष्टी लाभली आहे. शिवाय त्यांना कलेचा वारसा, वरदहस्त लाभला आहे. ‘दिग्विजय’ असलेल्या आपल्या ‘डेगवे’ गावाची व कलाकारांची कीर्ती सर्वदूर महाराष्ट्रात, देशात पसरुन त्यांना कलेच्या क्षेत्रात नांव लौकीक संपादन करून आपल्या गावाचे, आई, वडीलांचे व कोकणचे नांव काढू दे. अशी प्रार्थना श्री गणेश चरणी करतो आहे. शिवाय डेगवे गावातील समस्त गणेश मूर्तीकार यांना तसेच ज्ञात-अज्ञात कलाकारांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आहे. श्रीविघ्नहर्त्या “गणराया’ सर्वांना चांगली बुद्धि देऊन सर्वांचे कल्याण कर. अशी समस्त डेगवे ग्रामस्थांच्या वतीने प्रार्थना करतो आहे. समस्त कोकणातील गणेश मूर्तिकार यांना व समस्त डेगवे ग्रामस्थांना श्री गणेश चतुर्थी निमित्ताने खूप खूप हार्दिक शुभेच्छा व्यक्त करीत आहे. धन्य ती आठवण! धन्य ते कलाकार !!
*उल्हास बाबाजी देसाई*
डेगवे, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.