You are currently viewing ग म भ न

ग म भ न

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ राधिका भांडारकर यांचा अप्रतिम लेख*

*ग म भ न*

माझी शाळा. हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक अत्यंत हळवा कोपरा असतो. आयुष्याच्या भविष्याची, शाळा ही सुरुवात असते. काहीच कळत नसतं, कसलाच अनुभव नसतो. बाल मनातली एक अनोळखी भीती आणि डोळ्यातून नकळत सांडणारे पाणी घेऊन, आईचा हात घट्ट पकडून, शाळेच्या आवारात पाऊल टाकलेलं असतं, आणि त्यानंतर एक एक पायरी चढत, शाळेच्या त्या सुंदर विश्वात आपलं बाल्य, कौमार्य, तारुण्य कसं विकसित होत जातं हे कळतही नाही.
शाळा.
एक लांबलचक इमारत, खूप मोठे पटांगण.,घंटा,पार बांधलेली झाडे,टीचर्स रुम,प्रयोगशाळा,आणि मित्रमैत्रीणींचा घोळका.वर्गात नोटीस घेऊन येणारा शिवा,आणि खूप काही.
पाचवीच्या वर्गात असताना वाटायचं दहावीचा वर्ग किती छान आहे! आपण कधी त्या वर्गात जाऊ? आणि ही दहावी ची मुलं जसा रुबाब करतात, तसा आपल्याला कधी करायला मिळेल?
शाळा म्हणजे बेंचेस, खडू, फळा, गणवेश, प्रार्थना, मधल्या सुट्टीतला सवंगड्यांबरोबर बरोबर खाल्लेला डबा. आणि उरलेल्या वेळात खेळलेले, सोनसाखळी, लंगडी,लगोरी असे मैदानी खेळ. हरलो-जिंकलो,आऊट,टाईम प्लीज, रुसवे भांडणे, कट्टी -बट्टी, कच्चा लिंबू अय्या!ईश्श!
आणि कधीतरी थोडं घाबरत थोडं धिटाईने, नियम मोडत , शाळेच्या आवाराबाहेर जाऊन, एक पैशाचा खाल्लेला गोड पेरू! जांभळं ,चिंचा म्हातारीचा कापूस वगैरे. अवीट गोडी! अविस्मरणीय! त्या एका पैशाच्या पेरूची, आजच्या शंभर रुपयाच्या थाई पेरू ला गोडी कशी येणार?
गोखले बाई फार आवडायच्या. विंदांची स्वेदगंगा ही कविता त्यांनी इतक्या तळमळीने शिकवली होती ,की आजही त्या ओळी अर्थासकट मनावर स्वार आहेत.
स्वेद बिंदूंनो विसरा भीती
खूप बाळगा एकचित्त
अहित जयातून तीच अनिती
वेद यात नि यात बायबल

पुराण अथवा कुराण यातच
मता मतांचा सोडा गोंधळ ।।
गोखलेबाई ही कविता एका चालीत आणि लयीत म्हणायच्या.आणि ती आमच्या उमलत्या मनावर हलकेच पांघरत जायची. शाळेत शिकलेली, म्हटलेली,
” फुलपाखरू छान किती दिसते!” किंवा “देवा तुझे किती सुंदर आकाश!” किंवा कुसुमाग्रजांची,
” आवडतो मज अफाट सागर।
निळ्या जांभळ्या जळात केशर ।।..शाळेच्या अंगणात बहरलेल्या या काव्यानंदाने आजपर्यंत च्या जीवनात कधीही साथ सोडली नाही.
राजेबाईंनी काळ- काम- वेग ,नफा-तोटा ,सम व्यस्त इतकं घोटून घेतलं की आयुष्यातलं गणितही पक्कं झालं!
नाशिककर बाईंनी प्रेमचंद मुन्शी,मन्नु भंडारी,हरिवंशराय बच्चन यांच्या साहित्याची ओळख करून दिली. फडके बाईंनी माझ्यासारख्या बेसूर गळ्यातू नही, भूप रूप शांतरस असलेले आरोह-अवरोह काढले. चित्रकलेचे तांबे सर मला म्हणायचे,” अगं! तुला नक्की काय काढायचे आहे? चिमणी की बदक?”विवीध कलांचे असे एकेक थेंब शाळेच्या त्या अंगणात मनात साठत गेले.दोन डोंगरातला उगवता सूर्य,निळे आकाश ,उडणारे पक्षी ,नारळाचे झाड,घर,नदी रस्ता हे एकमेव जागतिक चित्र आजही शालेय जीवनाची साक्ष आहे!
सूर्याभोवती पृथ्वी कशी फिरते, याचं प्रात्यक्षिक चौधरी बाई करून दाखवायच्या. वर्गातलाच कोणीतरी एक सूर्य, कोणीतरी एक पृथ्वी, आणि मग सारी ग्रहमाला बाईंच्या स्टेजवर फिरायला लागायची. या नाटकात मीही एकदा मंगळाची भूमिका केली होती!
पण सारं काही मजेत शिकलो.
पहिल्या नंबर पासून तिसाव्या नंबर पर्यंत प्रवास केला. पण स्पर्धा नव्हती. मित्र-मैत्रिणींच्या यशातही आनंद होता. तसे काही काही चेहरे होते कुसकट! पण वैर, द्वेष असे काही नव्हते.” यावेळेस माझा नंबर तू पटकावलास ..”इतकाच राग.
शिक्षाही भोगल्या की! बेंचावर उभे राहिलो, वर्गाच्या बाहेर ओणव्याने ऊभं राहून काही मिनिटे सहन केली. शंभर वेळा, शिक्षा म्हणून एखादी ओळ लिहिली. पण पालकांनी कधी शिक्षकांची तक्रार केली नाही.
शाळा म्हणजे एक मंदिर होतं. “हे!जगत्राता विश्वविधाता “या प्रार्थनेने शाळा सुरु व्हायची. ..
वर्‍हांड्यातल्या फळ्यावर रोज एक सुविचार लिहिलेला असे.आम्ही विद्यार्थीच लिहीत असू.
” एकमेका सहाय्य करू। अवघे धरू सुपंथ।।”
” खरा तो एकची धर्म। जगाला प्रेम अर्पावे,।।” “” “अंथरूण पाहून पाय पसरावेत।”
अलसस्य कुत:विद्या
अविद्यस्य कुत: धनम्
अधनस्य कुत: मित्र
अमित्रस्य कुत: सुखम।।

friend in need is a friend indeed असे कितीतरी सद्विचार…संस्कारांचं गाठोडं बांधून दिलं या शाळेने .
या शाळेने, जसं मन घडवलं, तसं उमलत्या वयाबरोबर फुलणार्‍या स्पंदनांची ही जाणीव करून दिली. कळीचं फुल होताना घडणारी अंतस्थ वादळं बघायला आणि अनुभवायलाही शिकवलं. त्यासाठी लागणारी संयमाची, प्रशिक्षणाची, स्थैर्याची किल्लीही हाती ठेवली. . अकरावी नंतर शाळा संपली.
( आमच्या वेळी दहावी अधिक दोन असे नव्हते. अकरावी होती. आणि त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणाची सुरुवात असे.)
शाळेच्या त्या इमारतीला, त्या पटांगणाला, तिथल्या झाडांना, त्या घंटेला निरोप देताना, खूप खूप काहीतरी वाटून गेले.
उरले उरात काही
आवाज चांदण्याचे
आकाश तारकांचे
उचलून रात्र गेली ।।
अशी काहीतरी भावना झाली असावी.
*माझी शाळा* या दोन शब्दांबरोबर, या भावनांचे धबधबे असे कोसळले खरे! पण आज, या शेवटच्या टप्प्यावरून मागे वळून पाहताना, दूर कुठेतरी, अंत: चक्षूने माझी शाळा पाहताना वाटते, या चार भिंतीच्या शाळेने मला संरक्षण दिले. माझ्या जगण्याच्या सीमा निश्चित केल्या ही असतील. पण माझी विद्यार्थीदशा कुठे संपली? या शाळेच्या बाहेर एक मोठी शाळा होती जिथे माझा प्रवेश झाला. आणि त्या शाळेत मी अजूनही आहेच की! आज हीच *माझी शाळा* आहे. फरक इतकाच, या शाळेला भिंती नाहीत, बसायला बाक नाहीत, लिहायला फळा नाही,शिक्षकांचा ठराविक समूह नाही. जिथे जाऊ तिथे शिक्षक आहेत. ते आपल्यालाच शोधायचे आहेत. सारे काही मुक्त आहे. ज्ञानाचा सागर आहे. त्यात एक तर बुडाल नाही तर तराल. इथे तुमचं तुम्हाला शिकायचंय्. तुमचं तुम्हाला टिपायचंय्. अंथरुण पाहून पाय पसरायचे की अंथरुणच वाढवायचे? नेहमी खरं बोलायचं की कधी खोट्याचाही आधार घ्यायचा? जगावर प्रेम करायचे की जगापासून सावध राहायचे? एका गालावर कोणी मारलं तर दुसरा गाल पुढे करायचा की ठोशास प्रतिठोसा द्यायचा, हे तुमचं तुम्हाला ठरवायचे आहे. *ये ग ये ग सरी माझे मडके भरी* हेच का माझं गाणं इथे असायला हवं हेही तुम्हालाच ठरवायचे आहे. आज मात्र *माझी शाळा* म्हणजे हे जग आहे ,हे जीवन आहे का?
मनात येतं..
।जग हे बंदी शाळा
कुणी न येथे भलाचांगला
जो तो पथ चुकलेला
कुणा न माहीत सजा किती ते
कोठून आलो नच स्मरते
सुटके लागी मन घाबरते
जो आला तो रमला।।
या माझ्या शाळेत मात्र आजही मी विद्यार्थीच आहे. प्रवाहपतित, ज्ञानपिपासू. गुरूच्या शोधात असलेली मी अजूनही गमभन गिरवत आहे…

राधिका भांडारकर पुणे.

प्रतिक्रिया व्यक्त करा