You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा सरपंच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेत विविध विषयांवर केली चर्चा…

सिंधुदुर्ग जिल्हा सरपंच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेत विविध विषयांवर केली चर्चा…

कुडाळ

सिंधुदुर्ग जिल्हा सरपंच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.
सरपंच निवड कायद्याच्या अंमलबजावणीत झालेल्या बदलामुळे काही गावातून राजकीय आकसातून थेट सरपंचांवर अविश्वास ठराव दाखल केले जात आहेत.
लोकनियुक्त किंवा थेट सरपंच हे गावच्या ग्रामस्थांनी निवडून दिलेले असल्याने त्यांच्यावर अविश्वास पारीत होण्यासाठी ग्रामसभेने मान्यता देणे क्रमप्राप्त / आवश्यक आहे . तरी याबाबत आवश्यक कायद्यातील तरतुदीनुसार विचार करून नंतरच अविश्वास ठरावाला मान्यता दयावी. अशी मागणी सरपंच संघटनेने लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
कोरोना महामारीच्या काळात सरपंच/उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी गावस्तरीय कर्मचाऱ्यांच्या सोबतीने आपआपली गावे कोरोना रोगापासून लांब ठेवण्यासाठी गेले 6 महिने अहोरात्र मेहनत केली आहे. त्यामुळेच सिंधुदुर्ग जिल्हा कोरोनापासून बऱ्याच अंशी सुरक्षित राहिला आहे.

केंद्र सरकारने आता अनलॉकची अंमलबजावणी संपूर्ण देशात सुरू केली आहे. त्यामुळे सर्व सेवा आणि व्यवसाय पूर्वपदावर येत आहेत. यामुळेच व्यवसाय किंवा अन्य महत्वाच्या कामा निमित्ताने बाहेरील राज्य/जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांना 14 दिवस विलगिकरणात राहण्याची अट शिथील करावी. तसेच कोरोना बाधित रुग्ण आढल्यानंतर उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत जाहीर करण्यात येणाऱ्या कंटेनमेंट झोन गेले काही दिवस खूपच उशिराने जाहीर होतात. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होतो त्याकरिता सदरचे  कंटेनमेंट झोन तात्काळ जाहीर करण्यात करावेत.

येणाऱ्या कालावधीत हिंदू धर्मीयांचा वर्षातील महत्वाचा नवरात्रोत्सव आणि दसरा सण जवळ येत आहे. या निमित्ताने प्रत्येक गावातील देवस्थान आणि मंदिरामध्ये महत्वाचे धार्मिक विधी आणि कार्यक्रम संपन्न होत असतात. या कार्यक्रमांना गणेश चतुर्थीच्या धर्तीवर वार्षिक कार्यक्रम आणि धार्मिक विधी करण्यासाठी विशेष सवलत मिळावी अशी मागणी जिल्हा सरपंच संघटनेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली. या सर्व मागण्यांना जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून शासनाकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही सरपंच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिली आहे.

यावेळी संतोष राणे, दादा साईल, दाजी राणे, प्रमोद गावडे, संजय शिरसाट, विष्णू(पपु) परब, पराशर सावंत, सूर्यनारायण गवस इत्यादी सरपंच संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा