सावंतवाडी
हिंदू-मुस्लिम धर्माच्या एकतेचे प्रतिक असलेल्या/कोलगाव येथील परमपूज्य श्री सद्गुरू मियासाब यांचा ७७ वा पुण्यतिथी सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. यावेळी सदगुरु मियासाब यांच्या भक्तगणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन घेतले.
या वार्षिक उत्सवाला दरवर्षी परमपूज्य श्री सदगुरू मियासाब समाधीस्थळी सावंतवाडीच नव्हे तर जिल्हाभरातील भक्तगण नतमस्तक होतात. गेली दोन वर्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने पार पडलेला हा सोहळा यंदा उत्साहात साजरा झाला. यासाठी नीटनेटके नियोजन करण्यात आले आहे. सकाळ पासूनच सदगुरु मियासाब याच्या समाधीकडे भक्तांची पाऊले वाट धरत होती. संतांची भूमी असण्याऱ्या कोकणातील सद्गुरू मियासाब हे सर्व जाती धर्माच्या पलीकडे जावून धर्मातील अध्यात्माच्या प्रगतीपथावर पाऊल टाकणारे पहिले सदगुरू. म्हणूनच त्यांना हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतिक मानले जाते. योगी एकादशी दिवशी हा पुण्यातिथी सोहळा साजरा केला जातो. मियासाब यांचा ७७ वा पुण्यतिथी सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. देव मामलेदार यांचे ते शिष्य असून सावंतवाडी व कोलगाव येथील स्थानिकांचा व व्यापारी वर्गाचा या कार्यक्रमात मोठा वाटा असतो. मियासाब यांच्या समाधीवर चादर चढवून नवस फेडले जातात. तर या पुण्यतिथीला जिल्हाभरातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात. दुपारी समाधीवर चादर चढवताना मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित राहीले होते. त्यानंतर महाप्रसादालाही भक्तांनी गर्दी केली होती. सायंकाळी उशिरापर्यंत भक्तांची मोठी गर्दी समाधीस्थळी पाहायला मिळाली.