You are currently viewing रुग्णवाहिकेसाठी शेड तसेच कर्मचारी निवासस्थाने दुरुस्त न केल्यास उपोषण – नगरसेवक रामचंद्र मणेरीकर यांचा जिल्हाधिकारी यांना इशारा

रुग्णवाहिकेसाठी शेड तसेच कर्मचारी निवासस्थाने दुरुस्त न केल्यास उपोषण – नगरसेवक रामचंद्र मणेरीकर यांचा जिल्हाधिकारी यांना इशारा

दोडामार्ग

दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्णवाहिका ह्या पार्किंग शेड उपलब्ध नसल्याने ऊन पावसात रस्त्यावर उभ्या असतात यासाठी या रुग्णवाहिकांसाठी शेड उभारावी व रुग्णालयातील अधिकारी,कर्मचारी यांच्यासाठी असलेली निवासस्थाने दुरुस्त करावी या मागणीसाठी नगरसेवक रामचंद्र मणेरीकर, सामाजिक कार्यकर्ते समीर रेडकर यांनी वारंवार निवेदने देऊन प्रशासनाचे लक्ष या मागणींकडे वेधले होते, मात्र संबंधीत प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे असे म्हणत येत्या २६ जूनपासून या न्याय मागणीसाठी उपोषणाचा इशारा निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना नगरसेवक रामचंद्र मणेरीकर यांनी दिला आहे.

त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सदर रुग्णालयातील रुग्णवाहिका ही नवीन आहे तसेच १०८ ही रुग्णवाहिकाही येथेच असते मात्र सतत उन पावसात या रुग्णवाहिका उभ्या असल्याने त्या लवकर नादुरुस्त होऊ शकतात त्यासाठी या वाहनांना पार्किंग शेड बांधावी तसेच रुग्णालयात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांची निवासस्थाने जीर्ण झाली असून ती कोसळण्याच्या मार्गावर आहेत तीही दुरुस्त करून मिळावीत यासाठी वेळोवेळी संबधित प्रशासनाचे निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात आले मात्र त्याला वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे काम प्रशासनाने केले यासाठी २६ जूनपासून आपण उपोषण छेडणार असल्याचे रामचंद्र माणेरीकर यांनी निवेदनात म्हटले आहे, या निवास्थानच्या आजुबाजूचा परिसरातही योग्य साफसफाई नसल्याने या निवासस्थानात साप तसेच इतर उपद्रवी प्राणी घुसतात त्यांमुळे हा परिसर स्वच्छ करून मिळावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांसह जिल्हा शल्य चिकित्सक सिंधुदुर्ग तसेच उप संचालक आरोग्य विभाग कोल्हापूर यांनाही दिले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा