संजय गांधी योजनेसाठी सुद्धा मुदतवाढ मिळावी…
सावंतवाडी
शैक्षणिक प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे दाखले मिळण्यास तहसील प्रशासनाकडून विलंब होत आहे. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थी व पालकांची गैरसोय टाळण्यासाठी हे दाखले लवकरात-लवकर उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जावेत, अशी मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नायब तहसीलदार मनोज मुसळे यांच्याकडे केली आहे. दरम्यान संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक उत्पन्नाच्या दाखल्याची पूर्तता करण्याची अंतिम तारीख ३० जून ठेवण्यात आली आहे. मात्र अद्याप आवश्यक दाखल्यांची उपलब्धता लाभार्थींकडे झाली नाही. त्यामुळे त्यांनाही मुदतवाढ मिळण्यासाठी शासन स्तरावर आपण पाठपुरावा करावा, असे यावेळी सांगण्यात आले. याबाबत त्यांनी श्री. मुसळे यांना निवेदन दिले.
यावेळी संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष अशोक दळवी, गजानन नाटेकर, नारायण राणे, माजी नगरसेविका भारती मोरे, शैलेश गवंडळकर, संजय मडगावकर, विश्वास घाग आदी उपस्थित होते.
त्यांनी दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, सद्यस्थितीत विद्यार्थ्यांची शालेय प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी आवश्यक असणारे दाखले हे तहसील प्रशासनामार्फत दिले जातात. मात्र ते मिळण्यात विलंब होत असल्याच्या तक्रारी विद्यार्थी व पालकांनी केल्या आहेत. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होऊ शकतो. त्यामुळे भविष्यात होणारे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी त्यांना जास्त अटी-शर्ती न घालता लवकरात लवकर आवश्यक दाखल्यांची पूर्तता करून द्यावी. तर संजय गांधी योजनेच्या लाभासाठी उत्पन्नाचा दाखला व इतर कागदपत्रे जमा करण्याची अंतिम तारीख ३० जून ठेवण्यात आली आहे. मात्र अद्याप लाभार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे ते या योजनेपासून वंचित राहू शकतात. अशा परिस्थितीत लाभार्थ्यांवर कोणताही अन्याय होऊ नये, यासाठी त्यांना मुदतवाढ द्यावी, असे म्हटले आहे.