You are currently viewing महाराष्ट्र शासन कृषि विभागामार्फत संपूर्ण राज्यात बीजप्रक्रिया अभियान

महाराष्ट्र शासन कृषि विभागामार्फत संपूर्ण राज्यात बीजप्रक्रिया अभियान

सावंतवाडी :

 

शेतीमधील अत्यंत महत्वाचा घटक म्हणजे बियाणे हा असल्याने महाराष्ट्र शासन कृषि विभागामार्फत संपूर्ण राज्यात बीजप्रक्रिया अभियान कृषि विभाग राबविले जात आहे. सावंतवाडी तालुक्यात तालुका कृषि अधिकारी कार्यालयामार्फत आतापर्यंत १२० प्रात्याक्षिकांच्या माध्यमातून २२५० शेतकऱ्यांना बीजप्रक्रिया कशी करावी याबाबत प्रात्याक्षिकासहीत मार्गदर्शन करण्यात आले.

बियाणेची उगवण चांगली व्हावी, पिकांचे किडी व रोगांपासून संरक्षण व्हावे, जमिनीची सुपीकता वाढावी आणि शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे या उद्देशाने या बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येते. या बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक प्रशिक्षणातून ‘अधिक उत्पादन व पिक संरक्षण ! पेरणीपूर्वीच करा बीज संस्करण !!’, ‘जो शेतकरी बीजप्रक्रिया करी ! किड रोग नसे त्याचे शिवारी !!’, ‘जीवाणू खताची किमया न्यारी ! करी रासायनिक खताची बचत भारी!!’ आदी घोषवाक्यातून शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यात येत आहे.

वेर्ले येथे घेण्यात आलेल्या बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक प्रशिक्षणाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक प्रशिक्षणात ओवळीये कृषि सहाय्यक नागनाथ साखरे यांनी बीजप्रक्रिया कशी करावी याबद्दल उपस्थित शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले तर कृषि पर्यवेक्षक यशवंत गव्हाणे यांनी भात बीयाणासाठी प्रथम मिठाच्या द्रावणाची नंतर बुरशीनाशक व त्या नंतर जीवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया प्रात्याक्षिकासहीत करुन दाखवली.

यावेळी वेर्ले सरपंच सुभाष राऊळ ग्रामपंचायत सदस्य अस्मिता राणे, भगवान राणे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश घाडी, माजी सरपंच शशिकांत घाडी, कलंबिस्त कृषि सहाय्यक छाया राऊळ, बाळकृष्ण राणे, नारायण नाईक, शंकर राऊळ, लाडजी राऊळ आदी शेतकरी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा