You are currently viewing पितृ देवो भव

पितृ देवो भव

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सौ अनिता व्यवहारे यांचा अप्रतिम लेख*

🙏 *पितृ देवो भव.* 🙏

🙏 *तुझे सुरज कहू या चंदा*
*तुझे दीप कहू या तारा*
*मेरा नाम करेगा रोशन*
*जग मे मेरा राज दुलारा.*…
आज सकाळी नऊ वाजता माझा *स्वयंपाक घरातील मित्र* हे गीत गात होता. मीही तल्लीन होऊन ऐकत होते. ऐकता ऐकता मी विचारात गढून गेले…
किती सुंदर नातं….. *बाप आणि मुलगा….*
प्रत्येक बापाची आपल्या मुलासाठी हीच इच्छा असते. आपली अधुरे राहिलेले स्वप्न करण्यास पूर्ण करण्यास ते चांगलं माध्यम त्यांना मिळालेलं असतं. आणि म्हणूनच स्वतः झिजत राहून आपल्या पंखात बळ देण्याचं काम ते करत असतात…. असे विचार चक्र चालू असतानाच… मित्राने दुसरा गीत गायला सुरुवात केली..
*सासरला जाता जाता उंबरठ्यामध्ये*
*बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये*
*दमलेल्या बाबाची या कहाणी तुला*……

मी अजूनही विचारातच…. माझ्या वडिलांना जाऊन दोन-तीन वर्ष झाले असतील..तेव्हा पासून बापासाठी हळवं झालेलं माझं मन आज पुन्हा या *हुंदक्यांचा संगीताने* खुलले…
पुन्हा तिसऱ्यांदा ही माझा मित्र या विषयावर गाऊ लागला तेव्हा वाटले !हे काय? मातृत्वाचा महासागर खळाळत वाहणार्‍या आपल्या विश्वात आज *बाप* या नात्यावर का फिदा सगळेच……एफ एम चे स्टेशन बदलले तेव्हा निवेदकाचा सांगण्यावरून माझ्या लक्षात आले. अरे हो आज *पितृदिन…. फादर्स डे*. 🙏
जरा वेगळाच आणि नवखा हा शब्द आपल्यासाठी. कारण बाप हा पडद्यामागचा कलाकार.. त्यांची थोरवी सांगणारे साहित्यिक, गीतकार फारसे नाहीत… जितक *आई* या विषयावर लिहिलं गेलं, तितकं इथं नाही लिहिता आलं कुणाला.? कळलाच नाही का बाप कुणाला? मग आठवल्या *अनिल दीक्षित* यांच्या कवितेतल्या ओळी…
*बाप स्वाभिमानी बाणा*
*बाप कणखर कणा*
*त्याच्या काळजात सुद्धा*
*लाजाळूची संवेदना*
हे सर्व त्याला त्याच्या मुलात पाहायचं असतं आणि म्हणूनच तो कठोर बनतो. *आई* हा दोन अक्षरी शब्द. *हृदयाच्या मखमली पेटीत ठेवलेला* असतो पण *काटेरी मुकुट धारण करणारा बाप शरीरात भिनलेला असतो. “नभ वाऱ्याचे असे औदार्य थोर” घेऊन तो आपल्या अवतीभोवती वावरत असतो. बाप म्हणजे घराचं अस्तित्व. तो गेला की अस्तित्व मिटतं.. आतापर्यंत आपण खूप काही वाचलं. पण त्यात सर्व साहित्य व संत महात्म्यांचे विचार, अगदी देवादिकांना सुद्धा आईचेच गोडवे गायले आहेत. चित्रपटातही फक्त आईच पुरस्कृत…. सर्व चांगल्या गोष्टींना आईच्या प्रेमाची उपमा .. अगदी तुरळक ठिकाणी बापाचं वर्णन आपण वाचलेलं…. पण बाप कसा? तर तो तामसी, व्यसनी, मारझोड करणारा.. सगळेच बाप असे असतात का हो.? नाही…दोन पाच टक्के बाप असे असतीलही. पण चांगल्या बापाचं काय… *तुझे सुरज कहू या चंदा* असं म्हणणारा बाप *पापा कहते है बडा नाम करेगा*..असं म्हणणारा बाप…. यांचं काय…????
आई आपले दुःख अश्रूतून व्यक्त करते आणि तिच्याकडे *अश्रूंचे पाट* असतात पण बापाकडे *संयमाचे घाट*.. *माझी आई अन्नपूर्णा सर्व घरादाराला ती रुचकर जेवण करून देते अशी तिची थोरवी गाणारे* आपण *आयुष्याच्या शिदोरीची सोय करणारा बाप विसरून जातो*… आपल्या लेकराचे दुःख पाहून आई रडते… रडून मोकळी होते पण.. सांत्वन बापालाच करावं लागतं.रात्री उशिरा उशीत तोंड खुपसून रडणारा बाप पाहिलाय मी. स्वत :चा बाप मेला तरी त्याला रडता येत नाही.कारण इतरांचं सांत्वन करणं, बहिण भावंडांना आधार त्यालाच द्यावा लागतो. बायको सोडून गेली तरी मुलांसाठी अश्रूंना आवरावच लागतं…
आई आणि बाप यांची उदाहरणे द्यायची झाली तर.. *जिजाबाईने शिवबांना घडविलं सारा इतिहास याची साक्ष देतो,* पण त्यावेळी *शहाजी राजांची झालेली ओढाताण** विसरून जातो. भगवान श्रीकृष्ण यांच्या चरित्रात देवकी आणि यशोदा यांच्या कौतुकाचे पाट वाहिलेले आपण पाहिलेत. पण यमुनेच्या पुरातून पोराला डोक्यावर घेऊन जाणारा *पिता वासुदेव* कसा विसरेल हा समाज… !कौसल्या मातेचे पुत्रप्रेम अगाध..पण पुत्रावियोगाच्या दुखान जीव सोडणाऱ्या राजा दशरथ यांची ही जाणीव आहेच ना आपल्याला..
बापाचा मुलावर प्रेम असतं का? तर हो.! किती! कळून घ्यायला *बाप व्हावं लागतं*…! गरिबी वाट्याला आलेल्या बापाची चप्पल आणि फाटलेल बनियन, वाढलेली दाढी बघितली की मग कळते त्याची ही काटकसर..
हाताला चटका बसला, पायात काटा टोचला…. फार मोठी नाहीत ही दुःख…पण त्याप्रसंगी *आई गं हे शब्द बाहेर पडतात… आणि रस्त्याने चालताना चुकूनजरी गाडी अंगावर आल्याचा भास जरी झाला तरी.. *बापरे*! असं पटकन म्हटलं जातं. मला आठवतं माझ्या लहानपणी शाळेचा निकाल लागला की, आई जवळ घ्यायची, कुरवाळायची. कौतुक करायची.. मग ती खूप जवळची वाटायची.. पण *निकाल पाहताक्षणी पायात चप्पल अडकवून बाप गुपचुप बाहेर पडायचा त्यावेळी वाटायचं यांना तर काहीच कौतुक नाही माझं..*. 😔
काही वेळानंतर पेढ्याचा पुडा घेऊन येऊन *धर सगळ्यांना वाट पेढे* म्हणणारा बाप… मात्र पत्र प्रेमापासून वंचित राहिला..
काय करतो बाप आपल्यासाठी आयुष्यात? आठवून पहा जरा..
मुलांच्या नोकरीसाठी चप्पल झिजवणारा बाप, लाचार होऊन हात जोडणारा बाप, मुलीला चांगलं स्थळ मिळावा म्हणून उंबरठे झिजवणारा बाप, घराच्या सुखासाठी मौन धारण करून व्यथा झेलणारा बाप कळून घ्यायला हवा. आपल्या मुलांसाठी झेलाव्या लागतील तेवढ्या वाईट गोष्टी तोच झेलतो… कोणाला त्याची झळ पोहोचू देत नाही…… तेव्हा त्याला *वाल्या कोळ्याची उपमा द्यावीशी वाटते* जसे *त्याच्या पापात कोणी सहभागी होत नाही तसेच असते बापाचे.*. *त्याच्या दुःखाचा वाटेकरी तोच असतो…*
ज्या घरातला बाप संपतो ना, त्या घराकडे अनेकांच्या वाईट नजरा असतात. तो जिवंत असेपर्यंत कोणीही वाईट नजरेने पाहण्याची हिंमत करणार नाही. तो वृद्ध असला तरी तो घराचा कर्ता असतो..

🙏 *कर्ता बाप आपलं कर्म पूर्ण करीत आयुष्याचं क्रियापद बनतो* 🙏

ही जाणीव प्रत्येकाने ठेवायला हवी.. *आई तर महान, महत्तम आहेच*…. हो पण *बापाचं ही स्मरण* ठेवायला हवं..

*जन्मदाता है जो नाम जिन से मिला*
*थामकर जिन की उंगली है बचपन चला*
*कंधे पर बैठ के जिनके देखा जहा*
*ज्ञान जिनसें मिला क्या बुरा क्या भला*
*कितने उपकार है क्या कहे ये बता ना आसान है*
*धरती पे रूप मा बाप का..*🙏
अशा बापासाठी आज *फादर्स डेच्या* निमित्ताने त्याला एकच सांगा..
*बाबा तुमच्या विखुरलेल्या स्वप्नांना भरीन मी ओंजळीत*
*जिव्हाळ्याच्या झालरीने सजविन नात्यातले संगीत*
*थकल्या भागल्या तुमच्या जिवाचा बनेल मी आधार*
*कुटुंबाला करीत सांभाळ*
*सांभाळीन तुमचे जीवन सार*

*सौ अनिता व्यवहारे*
*ता श्रीरामपूर*

प्रतिक्रिया व्यक्त करा