सोनी टीव्ही प्रदर्शीत “कोण होणार करोड पती” मंचावर जिंकलेली २५ लाख रुपये रक्कम शिक्षण संस्थेला सुपूर्द
देवगड :
नुकत्याच मराठी कोण होणार करोडपती या शोमध्ये सुधा मूर्ती यांनी हजेरी लावली व पंचवीस लाख जिंकून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील बापर्डे गावातील पावणादेवी शिक्षण संस्थेला ते पैसे दिले. ग्रामीण भागातील या शाळेची उभारणी करण्यात पदाधिकारी ग्रामस्थांसह सुधा मूर्ती यांच सिंहाचा वाटा आहे.
सोनी टीव्ही प्रदर्शीत कोण होणार करोड पतीच्या मंच्यावर जिंकलेली संपूर्ण रक्कम रुपये २५ लाख, सुधा मूर्ती यांनी श्री देवी पावना देवी कृपा शिक्षण विकास मंडळ संचलित यशवंतराव राणे विद्यालय बापर्डे यांना गावातील मुलांना आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुपूर्द केली आहे. यशवंतराव राणे विद्यालय महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त वर्ग ६ वी ते १२ वी ( वाणिज्य + सायन्स ) असून स्वयं अर्थ सहाय्याने सुरु आहे.
सुहास राणे आणि सुधा मूर्ती यांचे खूप जुने ५० वर्षांचे ऋणानुबंध आहेत. त्यांच्यामुळेच आज जागतिक किर्तीच्या या समाजसेविका बापर्डे गावातील या छोट्या शाळेच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या आहेत. सुधा मूर्तींच्या या नव्या देणगीमुळे संस्था आता पुन्हा नव्या जोमाने ६ वी ते १२वी पर्यंत वर्ग वाढवून प्रगतीपथावर वाटचाल सक्षम झाली आहे.
बापर्डे गावाचे उच्च शिक्षित डॉ. सुहास मारुतीराव राणे यांच्या प्रयत्नातून हे सर्व शक्य झाले आहे, त्यामुळे आज संपूर्ण गांव त्यांचे व सुधा मूर्ती यांचे अभिनंदन व आभार व्यक्त करत आहेत.