चिपळूण संघाचे चेअरमन अशोकराव कदम यांची मागणी
चिपळूण :
खरीप हंगाम सुरू झाला असून महाराष्ट्र कृषि उद्योग व आरसीएफ कंपनीकडून अपुरा खत पुरवठा झाला असून यामध्ये महाराष्ट्र कृषी उद्योगाकडून १३६ टन तर आरसीएफ कंपनीकडून ६०० टन युरिया एकंदरीत ७३६ टन खताचा पुरवठा लवकरच व्हावा, अशी मागणी चिपळूण तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन अशोकराव कदम यांनी केली आहे.
शेतकऱ्यांना भात बि बियाणे, भाजीपाला बियाणे वाटप करण्यात आले आहे. पेरणी हंगामानंतर शेतकऱ्यांना खतांची आवश्यकता असते. बफर स्टॉक अंतर्गत चिपळूण खरेदी-विक्री संघाने शेतकऱ्यांच्या मागणीनुसार महाराष्ट्र कृषि उद्योगाकडे २८८ युरिया खताची मागणी करण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात १५२ टन खताचा पुरवठा करण्यात आला आहे. हा पुरवठा अपुरा असून नजीकच्या काळात ६० ते ७० टन खताचा पुरवठा केला जाईल, असे सांगण्यात आले आहे. मात्र, या खत पुरवठ्याने शेतकऱ्यांची मागणी पूर्ण होणार नाही. तरी बफर स्टॉक मधील उर्वरित १३६ टन खताचा पुरवठा लवकरच करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.
तसेच आरसीएफ कंपनी कडून ९०० टन युरिया खताची मागणी करण्यात आली होती. मात्र, या कंपनीने ३०० टन युरिया खताचा तर १०० टन सुफला खताचा पुरवठा केला आहे. तर उर्वरित खत पुरवठा लवकरच करण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. याबाबत आरसीएफ कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला. या अधिकाऱ्यांनी सहकार्य करण्याचे मान्य केले आहे. यानुसार शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत मागणीनुसार व खत देण्याची हमी चिपळूण खरेदी-विक्री संघाने घेतली आहे, अशी माहिती चेअरमन अशोकराव कदम यांनी दिली आहे.