मुंबई (प्रतिनिधी):
महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या प्रदेश चिटणीसपदी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजन पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मूळचे सावंतवाडी येथील रहिवासी असलेले राजन पवार यांना प्रदेश सरचिटणीस पांडुरंग भवर यांनी नियुक्ती पत्र दिले आहे.
राजन पवार हे सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटनेचे पदाधिकारी आहेत. त्यांनी समाजाच्या हितासाठी नेहमी आग्रही भूमिका घेतली आहे. समाजाप्रती असलेल्या सदभावनांची, संघटनात्मक कौशल्याची दखल घेत औरंगाबाद येथे झालेल्या सभेत नाभिक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळे व कार्याध्यक्ष दामोदर बिडये यांच्या आदेशाने राजन पवार यांना नाभिक महामंडळाच्या प्रदेश चिटणीसपदी नियुक्ती देण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाभिक संघटना तसेच विविध सामाजिक क्षेत्रातून अभिनंदन होत आहे. सावंतवाडीचे माजी आमदार शिवराम दळवी यांनी भ्रमणध्वनीवरून त्यांचे खास अभिनंदन केले आहे.