You are currently viewing भारतात कोरोना रुग्णांच्या पॉझिटिव्हीटीच्या दरात घट…

भारतात कोरोना रुग्णांच्या पॉझिटिव्हीटीच्या दरात घट…

 

नवी दिल्ली:

 

कोरोनाचा संसर्ग वाढत असलेल्या भारतात आता नव्या रुग्णाच्या वाढीची गती काहीशी कमी होताना दिसत आहे. त्यामुळे सरकार आणि सर्वसामान्यांना थोड्या प्रमाणात दिलासा मिळत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये दररोज वाढणाऱ्या रुग्णांच्या संख्येत थोड्या अंशी घट झाली आहे. गेल्या आठवड्यात देशभरात सुमारे ८० लाख कोरोना चाचण्या देखील करण्यात आल्या आहेत. त्यानुसार ३० सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर च्या काळात कोरोनाचा पॉझिटीव्हीटीचा दर ६.८ टक्क्यांवर पोहोचला आहे.

 

कोरोना रुग्णांच्या चाचणी बाबत मिळालेल्या माहितीनुसार, २ ते ८ सप्टेंबरदरम्यान करोनाचा पॉझिटीव्हीटीचा दर ८.३ टक्के इतका होता. तर १६ ते २२ सप्टेंबरदरम्यान हाच दर ९.२ टक्के इतका होता. मात्र, त्यानंतर करोनाच्या पॉझिटीव्हीटीच्या दरात तीव्र गतीने घसरण दिसून येत आहे. गेल्या तीन आठवड्यात हा दर ६.८ टक्क्यांवर आला आहे. याशिवाय गेल्या काही दिवसांमध्ये भारतात कोरोनाचा रुग्णवाढीचा ग्रोथ रेट निगेटीव्ह झाल्याचे ही स्पष्ट झाले आहे.

 

देशभरात आतापर्यंत सुमारे ८ कोटी ८० लाख नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही नव्याने आढळणाऱ्या रुग्णांच्या संख्येहून अधिक आहे. त्यावरुन पॉझिटीव्हीटीच्या दरात तीव्र गतीने घट दिसून येत आहे. या व्यतिरिक्त गेल्या २ आठवड्यांमध्ये देशातील सक्रिय रुग्णांची संख्या देखील १० लाखांनी कमी झाली आहे. तसे असले तरीही हिवाळा आणि सणासुदीचे दिवस पाहता कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता व्यक्त करत सतर्कता बाळगण्याची आवश्यकता असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. या वेळी सतर्कता बाळगल्यास कोरोनाचा संसर्ग रोखला जाऊ शकतो, अशी माहिती केंद्र सरकार आरोग्य विभागाचे सचिव राजेश भूषण यांनी दिली आहे.

 

 

पुढील आकडेवारी पाहता, ६ ऑक्टोबरला देशात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ९ लाख १९ हजार २३ इतकी होती. यात केवळ महाराष्ट्रातच २ लाख ३२ हजार ७२१ सक्रिय रुग्ण होते. तर आंध्र प्रदेशात सक्रिय रुग्णांची संख्या ५१ हजार ५० इतकी होती. कर्नाटकात ५१ हजार ५९६, तामिळनाडूत ४५ हजार ८८१, उत्तर प्रदेशात ४५ हजार २४ आणि पश्चिम बंगालमध्ये २७ हजार ७१७ इतके सक्रिय रुग्ण होते. कालपर्यंत वाढलेल्या एकूण ६१ हजार २६७ नव्या रुग्णांपैकी ७७ टक्के रुग्ण हे १० राज्यांमधील होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा