जागतिक बाल कामगार विरोधी दिनानिमित्त आवाहन
सिंधुदुर्गनगरी
बालकामगार या सामामाजिक अनिष्ट प्रथेचे समूळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीने समाजामध्ये जागृती निर्माण व्हावी याकरिता शासनाच्या विविध विभागामार्फत व विविधस्तरावर प्रयत्न केले जात आहेत. 12 जून जागतिक बालकामगार विरोधी दिनाचे औचित्य साधून सरकारी कामगार कार्यालयामार्फत जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात आले आहे.
14 वर्षाखालील बालकास सर्वच व्यवसाय व प्रक्रियांमध्ये काम करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. 14 ते 18 वयोगटातील किशोरवयीन बालकास धोकादायक व्यवसाय व प्रक्रियांमध्ये कामगार ठेवणे हा फौजदारी गुन्हा आहे. फौजदारी गुन्ह्यासाठी 6 महिने ते 2 वर्षापर्यंत वाढविता येईल इतक्या तुरुंगवासाची शिक्षा किंवा किमान रु. 20,000 व कमाल रु. 50,000 इतका दंड किंवा दोन्ही ही शिक्षा मालकास होऊ शकतात. गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्यास, किमान 1 वर्ष ते 3 वर्षापर्यंत वाढविता येईल इतकी तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
सर्व औद्योगिक संघटना, असोसिएशन, व्यापारी असोसिएशन, हॉटेल असोसिएशन, क्रिडाई- बांधकाम व्यवसायातील मालक असोसिएशन व वीटभट्टी असोसिएशन, सर्व शासकीय, निमशासकीय संस्था, नागरीक यांनीही या अनिष्ट प्रथेचे उच्चाटन करण्याकरिता जनजागृती करुन या मोहिमेत सहभाग नोंदवावा व आपला जिल्हा बालकामगार मुक्त करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी यांनी केले आहे.