You are currently viewing प्रवाहाच्या विरुद्ध मी

प्रवाहाच्या विरुद्ध मी

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच…. लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्य लेखक कवी दीपक पटेकर यांचा अप्रतिम ललितलेख

वाहत्या गंगेत हात धुतल्याने किती पुण्यवान होतात? …यश कधीच आपल्याकडे धावत येत नाही….तर यश मिळवण्यासाठी अपयशाच्या पायऱ्या ओलांडून यशाकडे झेप घ्यावीच लागते…वाऱ्याच्या वेगाने तर पालापाचोळा सुद्धा स्वैर धावू लागतो…वाट मिळेल तिथे जातो…वाऱ्याच्या विरोधात उभाराहण्याची त्याची ताकद नसते…असा पालापाचोळा होऊन जगण्यापेक्षा वाऱ्याच्या वेगापुढे दगड होऊन स्तब्ध राहिल्यास….लोक दगड म्हणून हिणवतील…पण नशीब बल्लवत्तर असेल तर शेंदूर फासून देवत्व बहाल करतील…बेधुंदपणे कोसळणाऱ्या पावसात ओढ्याच्या पाण्याला प्रचंड वेग असतो…दगड धोंड्यातून वाट काढत नदीच्या ओढीने वेगात जात असतं… अन् त्याच वाहत्या पाण्याच्या प्रवाहाच्या विरोधात मासा मात्र चढणीकडे…पुढील भविष्य माहिती नसतानाही उड्या मारत मार्गक्रमण करत असतो…उधानलेल्या सागरात लाटांवर स्वार होत नौका देखील न डगमगता खोलवर समुद्राची सैर करते…
*तुफानाशी लढताना*
*घट्ट करावं आपलं मन*
*आयुष्यात कुठे रोज येतात*
*वादळ झेलण्याचे क्षण…*

छोट्या छोट्या गोष्टींमधून खूप काही शिकत गेलो….बालपणीच्या दिवसात…सक्ती असायची अभ्यासाचीच…दिवसच होते ते अभ्यासात वाहून घ्यायचे…अभ्यासाचाच तो प्रवाह…अभ्यास गरजेपुरता करून खेळासाठी छडीचा मार खाऊन देखील…क्रिकेटची आवड जोपासली…कदाचित प्रवाहाच्या विरोधात जाऊन काहीतरी वेगळं करण्याचे बाळकडू तिथूनच मिळत गेले… मोटारसायकल त्यावेळी क्वचितच दिसायची…एसटीचा प्रवास म्हणजे राजेशाही म्हटल्यास वावगं ठरणार नाही… भटकंतीची प्रचंड आवड….सर्वजण जिथे एसटी ने फिरायचे…आपली स्वारी तिथे सायकलने पोहचायची…गड.. किल्ले असो वा समुद्र किनारे…”चल मेरी गाडी…टुणूक टुणूक” म्हणत आमची सवारी निघायची…भर उन्हातान्हात…कोसळत्या पावसात…गारठलेल्या पहाटेच्या धुक्यातून वाट काढत…दवबिंदूंनी भिजलेले डोईवरचे चकाकणारे केस हाताच्या बोटांनी झटकत….दूर दूर भटकत…
कॉलेजमध्ये असताना हिप्पीसारखे(फॉरेनर) मोठे केस वाढवून…हिरोगीरी करीत शायनिंग मारण्याची तर फॅशनच होती…नवनवीन कपडे घालून…मुलींच्या मागे फिरण्यात पोरांचा दिवस जायचा…कित्येकदा छेडछाडीचे प्रकार व्हायचे…त्या हिरोगीरीच्या प्रवाहात कधी वाहून गेलोच नाही… तर हिरोंच्या समोर कित्येकदा अडथळा म्हणून उभा राहिलो…पोरींच्या बाजूने राहिल्यावर नावंही ठेवली गेली…पण बदनामीची मनात भीतीच बाळगली नाही…केसांचा मिलिटरी कट… एनसीसी मध्ये प्रवेश घेत…कॉलेजच्या एनसीसी युनिटचा दोन वर्षे अंडर ऑफिसर म्हणून राहिलो… तब्बल चार वर्षे एनसीसीची शिस्त अंगात भिनली…हिरोगीरीच्या बेधुंद प्रवाहाला दूर ठेवत…२६ जानेवारीच्या परेडमध्ये उत्कृष्ठ परेडचा कप मिळविण्यातच धन्यता मानली…
कॉलेजच्या उपहारगृहात पोरं सिगारेट ओढायची…तास सुरू झाले की..लपून छपून प्राचार्य देखील सिगारेटचा झुरका मारायचे….त्या वासाने डोकं फिरायचं…प्राचार्यांकडे एनसीसी अंडर ऑफिसर असताना “उपहारगृहात सिगारेट ओढण्यास मनाई करावी” असा मागणी अर्ज करून खुद्द प्राचार्यांचीच पंचाईत करत विरोधात उभा राहिलो…
आजकालचे राजकारण म्हणजे “चोरावर मोर” अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे…स्वार्थासाठी, सत्तेसाठी प्रत्येकजण एकमेकांवर कुरघोडी करतो…खोटं बोलून…स्वार्थ साधणे कार्य शून्य असाच प्रकार नेहमीच दिसतो…मी मात्र परखडपणे त्यावर व्यक्त होतो…”आपला तो बाब्या…दुसऱ्याचं कार्ट”…हा दुजाभाव न बाळगता…इतरांसारखं आपल्याच्या चुकीला देखील अंधपणे साथ न देता…चुकीला चूक म्हणण्याची हिम्मत मनात बाळगतो…त्यामुळे अनेकदा टीकेचा धनी होतो…पण न पटणाऱ्या गोष्टीला उगाच गळ्यात बांधून घेत नाही…
आपल्या कष्टाच्या कमाईवर वा अवैद्य कमाईवर लोक स्वैर मजा मारताना रोजच दिसतात… गरजवंतांना लाथाडताना आयुष्याची मजा करणारा प्रवाह वाढला आहे…अशा प्रवाहात स्वतःला झोकून न देता…निदान आपल्या संपर्कातील गरजवंताला फुल ना फुलाची पाकळी मदत नेहमीच करत आलो…फुलाच्या पाकळीचा सुगंधही हाताशी न ठेवता…
अन्याय, अत्याचार… सहन होत नाहीत की डोळ्याने पाहून गप्प राहता येत नाही…
पुरुषाची पत्नी गेली तर तो लग्न करून संसार थाटतो… मग एखाद्या स्त्रीचा पती गेल्यावर तिने घरात स्वतःला का कोंडून घ्यावं? तिला देखील तिचे भावी आयुष्य सुखकर जगण्याचा अधिकार आहेच…पतीच्या निधनानंतर मंगळसूत्र काढणे…बांगड्या तोडणे…भाळीचं सौभाग्याचे लेणं पुसून टाकणे…या प्रथांचा वीट वाटतो… तिच्या पतीने तिला दिलेले अधिकार पुसून टाकण्याचा इतरांना अधिकार कोणी दिला? तो त्या स्त्रीचा अधिकार आहे…तिने आयुष्यभर पतीची आठवण जपावी…अथवा पुसावी…याचे तिला स्वातंत्र्य आहे…पत्नी गेल्यावर पुरुषांबाबत यातील काहीच होत नाही…मग हा अन्याय स्त्रीवर का? धार्मिक कार्य जरूर असावी…श्रद्धेनुसार…पण अंधश्रद्धा नसावी…
या प्रथांच्या विरोधात आहे मी…समाज सुधारतोय…मग या कित्येक काळापासून सुरू असलेल्या प्रथा का आजही बदलत नाहीत?
*गंगेच्या पाण्यात न्हाऊन*
*स्वच्छ होईल मळ तनाची*
*अस्वच्छता असते अंतरी*
*कोण झाडेल मळ मनाची?*

©(दीपि)
दीपक पटेकर, सावंतवाडी

प्रतिक्रिया व्यक्त करा