कॅन्सर पीडित लोकांचे पुनर्वसन या विषयावर कुडाळ येथील फिजिओथेरपी महाविद्यालयामध्ये दोन दिवसाची कार्यशाळा संपन्न..
कुडाळ :
रोग्यांची सकारात्मकता व आशावाद त्याला रोगातून बरे होण्यास मदत करते. कोणत्याही आजारावर शस्त्रक्रिया केल्यानंतरचे उपचारही फार महत्त्वाचे असतात योगा, व्यायाम या उपचारांमार्फत शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती राखता येते. याचे एक उत्तम शास्त्र म्हणजे फिजिओथेरपी उपचार पद्धती होय. असे उद्गार उदयपूर येथील जनार्दन राय नागर राजस्थान विद्यापीठाचे डीन प्राचार्य डॉ शैलेंद्र मेहता यांनी काढले. ते बॅ.नाथ पै फिजिओथेरपी महाविद्यालय कुडाळ तर्फे आयोजित ‘कॅन्सर ग्रस्त लोकांचे पुनर्वसन तंत्र’ या विषयावरील दोन दिवसांच्या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
त्यांनी आपल्या पुढील मनोगतामध्ये – भावी फिजिओथेरपी डॉक्टरांना कॅन्सर वरील ऑपरेशन – विशेषता ब्रेस्ट कॅन्सर वरील ऑपरेशन – झाल्यावर येणाऱ्या शारीरिक व मानसिक व्याधींवर म्हणजे खांदा दुखणे, हात वर न जाणे, हाताला सूज येणे, श्वास घेताना त्रास होणे, थकवा जाणवणे, वेदना होणे यासाठी फिजिओथेरपी उपचार पद्धती महत्त्वपूर्ण ठरते. ऑपरशनोत्तर उपचाराचामध्ये रुग्ण हाताळण्याचे तंत्र, ड्रेसिंग, दैनंदिन हालचाली यांची प्रात्यक्षिकांसह प्रोजेक्टर चा वापर करून महत्त्वपूर्ण माहिती विशद केली. सर्जरीनंतर चे दुष्परिणाम व गुंतागुंत टाळण्यासाठी व्यवस्थित माहिती दिली.
यावेळी व्यासपीठावर बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, फिजिओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरज शुक्ला, कुडाळ येथील अॉंको सर्जन डॉ.आदेश पाळेकर,बॅ नाथ पै नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या मीना जोशी, उपप्राचार्य कल्पना भंडारी, महिला व रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण मर्गज, महिला अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य परेश धावडे, फिजिओथेरपी डॉक्टर प्रा.प्रगती शेटकर,डॉ. शरावती शेट्टी इत्यादी उपस्थित होते.
कुडाळ येथील ‘कॅन्सर क्लिनिक ‘चे आॅंकोसर्जन डॉ. आदेश पाळेकर यांनीसुद्धा ब्रेस्ट कॅन्सरवरील ऑपरेशन नंतर रुग्णांवर कोणत्या पद्धतीने उपचार केले जातात? रुग्णांमध्ये सकारात्मकता कशी वाढविता येते? यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख डॉ. सुरज शुक्ला यांनी करून दिली तर उपस्थितांचे आभार डॉ प्रगती शेटकर यांनी मानले.