राष्ट्रवादी जिल्हा उपजिल्हाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी साधला निशाणा
सिंधुदर्ग –
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कर्ज काढून महामार्ग बनवलेला आहे असे सांगत एका जिल्ह्यापुरती टोल माफी मिळणार नाही असे सांगून त्यांचा स्वतःचा मुलगा आमदार नितेश राणे यांच्या डरकाळ्यातील हवाच काढून घेतली आहे. असा निशाणा राष्ट्रवादी जिल्हा उपजिल्हाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी साधला आहे. वडीलच टोल माफी मिळणार नाही असे सांगत असतील तर आमदारांच्या टोल विरोधाला काय किम्मत आहे ? असा प्रश्नही पिळणकर यांनी यावेळी केला आहे. मात्र जिल्हा वासियांना टोलमाफी मिळत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही असेही ते यावेळी म्हणाले.
मुंबई गोवा महामार्गावरील ओसरगाव टोल नका सुरु करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसने त्याला कडाडून विरोध केला. हा टोल सिंधुदुर्ग वासियांना मोठा त्रासदायक असल्याची भूमिका घेऊन जिल्यातल्या सर्वच वाहनांना टोल मधून माफी मिळाली पाहिजे हि मागणी आम्ही सरकारकडे लावून धरली आहे. मात्र मुंबई गोवा महामार्ग हा केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असताना आमदार नितेश राणे यांनी आपल्या पक्षाचे सरकार असलेल्या आणि आपले वडील त्या सरकारमध्ये मंत्री असलेल्या केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्या ऐवजी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून टोल कार्यालयाला आणि कार्यालयाच्या गेटला टाळे ठोकलेले आहे. तर स्वतः आमदारांनी जिल्ह्यातील लोकांना टोल माफी मिळत नाही तोपर्यंत टोल चालू करू देणार नाही अशी भूमिका मीडियातून मांडली आहे.
मात्र एका बाजूला आमदार मुलगा टोलला विरोध करत असताना दुसऱ्या बाजूला केंद्रीय मंत्री असलेल्या वडिलांनी टोल माफी मिळू शकत नाही असे स्पष्ट सांगत आमदार नितेश राणे यांनाच मोठा धक्का दिलेला आहे. आमदार नितेश राणे हे यावरून आपल्या वडिलांचा सल्ला घेऊन बोलत नसल्याचे दिसून येत आहे. तर मुलाच्या भूमिकेला सन्माननीय नारायण राणेंचा पाठिंबा नसल्याचे दिसून येत आहे. असेही पिळणकर यावेळी म्हणाले.
कणकवलीत महामार्गाची भिंत कोसळली तेव्हा याच आमदारांनी थयथयाट केला होता मात्र पुढे काय झाले हे जनतेने पहिले. आता टोलच्या प्रकरणात यापेक्षा काही वेगळे होईल याची अपेक्षा कोणालाच नाही. किंबहुना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्यातून ते समोर आले आहे. त्यामुळे आमदार नितेश राणे यांनी आपला टोलला विरोध असल्याचे चित्र उभे करून जिल्ह्यातील लोकांची फसवणूक थांबवावी असेही पिळणकर यावेळी म्हणाले.