नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे
सिंधुदुर्ग
एरवी नितांत सुंदर आणि शांत असणारा सागर पावसाळ्यात मात्र रौद्र रुप धारण करतो. त्याचेहे रौद्ररुप अनेकवेळा किनाऱ्यावरील नागरी वस्तीला अनुभवास येते. त्यातही पावसाळ्याच्या दिवसात असे काही दिवस असतात ज्यावेळी समुद्राला मोठे उधान येते. त्याचवेळी जर मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू असेल तर समुद्र किनाऱ्यासोबतच खाडी किनाऱ्यावरील वस्त्यांनाही त्याचा फटका बसण्याची शक्यता असते. यंदाच्या पावसाळ्यात समुद्रामध्ये 26 वेळा मोठे उधान येणार असल्याची माहिती प्रादेशिक बंदर विभागाने दिली आहे.
पावसाळ्यात जून महिन्यात 6 वेळा, जुलै महिन्यात 7 वेळा, ऑगस्ट महिन्यात 7 वेळा आणि सप्टेंबर महिन्यात 6 वेळा मोठे उधान येणार आहे. जूनमध्ये मंगळवार दि. 14 जून पासून शनिवार दि. 18 जून हे सलग 5 दिवस मोठ्या भरतीचे असून याकालावधीत 2 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा समुद्रात उठणार आहेत. तर 30 जून रोजीही दुपारी मोठी भरती येणार असून दोन मीटर पेक्षा जास्त उंचीच्या लाटा उठतील असा अंदाज आहे. जुलै महिन्यामध्ये बुधवार दि. 13 जुलै ते रविवार दि. 17 जुलै या कालावधीत मोठी भरती येणार आहे. या काळात समुद्रात 2 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उठणार आहेत. तसेच 30 व 31 जुलै हे दिवसही मोठ्या भरतीचे असणार आहेत. ऑगस्ट महिन्यामध्ये गुरुवार दि. 11 ऑगस्ट ते सोमवार दि. 15 ऑगस्ट या काळात मोठी भरती येणार आहे. याही कालावधीत 2 ते सव्वादोन मीटर उंचीच्या लाटा उसळतील. तसेच दि. 29 व 30 ऑगस्ट या दिवशीही मोठी भरती असणार आहे. सप्टेंबर महिन्यात शुक्रवार दि. 9 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर हे मोठ्या उधानाचे दिवस असून याकाळात 2 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळणार आहेत. या उधानाच्या काळात समुद्राच्या आणि खाडीच्या पाणीपातळीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी याकाळात दक्ष राहून होणाऱ्या जीवित व वित्त हानीपासून संरक्षण करणे गरजेचे आहे.
बंदर विभागामार्फत या काळात बंदरात धोक्याची सूचना देारा बावटा लावला जातो. तसेच या काळात मच्छिमारांनी तसेच नागरिकांनी समुद्रात जाऊ नये असाही इशारा देण्यात आला आहे.
मोठी भरती आणि जोरदार पाऊस एकाच वेळी सुरू झाल्यास मोठ्या प्रमाणावर पूर येण्याची शक्यता असते. अशावेळी नागरिकांनी पुढीलप्रमाणे खबरदारी घ्यावी. कचरा, प्लास्टिक पिशव्या आणि बाटल्या या नाले व गटारामध्ये तुंबणार नाहीत याची दक्षता घ्यावी. मोठ्या भरतीच्या काळात जास्तीत जास्त घरीच राहण्याचा प्रयत्न करावा. आकाशवाणी तसेच स्थानिक प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांकडे लक्ष ठेऊन त्याचे पालन करावे. पाणी शिरण्याची शक्यता असलेले किनाऱ्यावरील तसेच खाडी किनाऱ्यावरील वस्तीस्थान रिकामे करून तात्पुरते स्थलांतर करावे. स्थलांतरावेळी कंदिल, टॉर्च, खाण्याचे सामान, पाणी, कोरडी कपडे, महत्वाची कागदपत्रे जवळ ठेवावीत. पाण्यात अडकल्यास सोडवण्यासाठी आलेल्या टीमला सहकार्य करावे.
वस्तीपर्यंत पाणी आल्यास घरातील वीज कनेक्शन बंद करावे. सर्व आवश्यक साहित्यासह स्थलांतर करावे व त्याविषयी आपले आप्त, नातेवाईक यांना कल्पना द्यावी. जर जवळपास वीजेची तार कोसळली असेल तर त्याची माहिती महावितरणला द्यावी. अशा वीजेच्या तारेपासून लांब रहावे. साठलेल्या पाण्यातून जाण्याची वेळ आलीच तर सोबत एक मोठी काठी ठेवावी व त्याच्या आधाराने पाण्याच्या खोलीचा आदांज घेत जावे. जेणेकरून एकदम खोल पाण्यात किंवा खड्ड्यात पडणार नाही.
पुढील गोष्टी करण्याचे टाळा – वाहत्या प्रवाहामध्ये जाऊ नका, उधानाच्या काळात तसेच जोरदार पाऊस पडत असताना समुद्रामध्ये किंवा खाडीमध्ये पोहण्यासाठी उतरू नका. पाणी आलेल्या रस्तावरून वाहने चालवू नका. पुराच्या पाण्याच्या संपर्कातील कोणतेही खाद्यान्न खाऊ नका. घरामध्ये पाणी आले असेल तर विद्युत पुरवठा स्वतःहून सुरू करू नका. त्यासाठी महावितरणच्या अभियंत्यांना संपर्क करून त्यांच्याकडूनच विद्युत पुरवठा सुरू करून घ्या. पडण्याच्या स्थितीत असलेले वीजेचे खांब, झाड, भिंत यापासून दूर रहा.
नैसर्गिक आपत्तीमध्ये नागरिकांना सर्वती मदत करण्यासाठी प्रशासन सज्ज असतेच. पण, आपणच केलेली आपली मदत जास्त महत्वाची असते. प्रशासन आपल्यापर्यंत पोहचेपर्यंत आपणच आपली मदत करणे जास्त गरजेचे आहे. त्यामुळे अशा उधानाच्या काळात परिस्थितीपाहून सूचनांचे योग्य पालन करणे गरजेचे आहे.
हेमंतकुमार चव्हाण,
माहिती सहाय्यक,
जिल्हा माहिती कार्यालय, सिंधुदुर्ग