You are currently viewing चर खोदाई पावसाळ्यात बनणार धोकादायक!

चर खोदाई पावसाळ्यात बनणार धोकादायक!

वळणावर अपघाताची शक्यता, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाहनचालक संतप्त

बांदा

पावसाळ्यात धोकादायक बनणाऱ्या मडुरा येथील पाईपलाईन चर खोदाईकडे अद्याप सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. रस्त्याच्या मधोमध खोदाई केलेल्या ठिकाणी खडीकरण व डांबरीकरण किंवा कॉंक्रिटीकरण केले नसल्याने चर खोदाई पावसाळ्यात धोकादायक बनणार असून प्रशासनाने याकडे पावसाळ्यापूर्वी लक्ष देण्याची मागणी संतप्त प्रवासी, वाहनचालकांमधून होत आहे.

बांदा-शिरोडा मार्गावर पाडलोस ते मडुरा दरम्यान दोन ठिकाणी रस्त्याच्या मधोमध खोदाई करून त्यावर केवळ मातीच्या सहाय्याने मलमपट्टी करण्य़ात आली. मडुरा रेल्वे स्टेशनकडे जाणारा मार्ग व बांदा-शिरोडा मार्ग ज्या ठिकाणी जोडतो त्याच ठिकाणी खोदाई केल्याने धोका अधिक बनला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अशा धोकादायक कामांकडे दुर्लक्ष झाल्याने अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याचा आरोप नाररिकांतून होत आहे.

पाऊस सुरू झाल्यास संपूर्ण मार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरणार असून वाहने घसरण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात याच ठिकाणी दुचाकी घसरून अपघात झाला होता. पाडलोस ग्रा.पं.माजी सदस्य हर्षद परब व सामाजिक कार्यकर्ते श्रीधर परब यांनी त्या दुचाकीस्वारास दवाखान्यात नेले. परंतु अशा घटनांकडे प्रशासनाने दुर्लक्ष न करता तात्काळ लक्ष देऊन खोदाई केलेल्या चरावर खडीकरण व डांबरीकरण करावे अशी मागणी हर्षद परब यांनी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा