You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा गाबीत समाज संस्थेच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक संपन्न

सिंधुदुर्ग जिल्हा गाबीत समाज संस्थेच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक संपन्न

मालवण :

 

गाबीत समाज सिंधुदुर्ग संस्थेच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक मालवण येथील नगरवाचनालयाच्या सभागृहात गाबीत समाज जिल्हा संघटक श्री. चंद्रशेखर उपरकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली. यावेळी जिल्हा सचिव सौ. राधिका कुबल, सहसचिव श्री.तुळशीदास गांवकर, तसेच मालवण तालुकाध्यक्ष डॉ. प्रमोद कोळंबकर, सचिव श्री.महेंद्र पराडकर, वेंगुरला सचिव श्री. नागेश गावकर, पर्यटन महासंघाचे अध्यक्ष श्री. बाबा मोंडकर, सिंधुदुर्ग जिल्हा श्रमजीवी रापण संघाचे अध्यक्ष श्री. दिलीप घारे, श्रमिक मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष श्री. छोटू सावजी, श्री.अन्वय प्रभू, श्री.बाबी जोगी, नॅशनल फिश वर्कर्सचे श्री.रविकिरण तोरस्कर, नगरसेविका सौ. सेजल परब, सावंतवाडी शाखा सचिव श्री.दिपक तारीसर, श्री. संजय केलूसकर, कोचरेकर गुरुजी, इतर पदाधिकारी उपस्थित होते.

सभेचे प्रास्ताविक करताना जिल्हा संघटक श्री. चंद्रशेखर उपरकर यांनी संघटनेच्या गेल्या वर्षभराच्या सर्वंकष कामकाजाचा आढावा घेतला. गाबीत समाज वधुवर मेळाव्याबाबत माहिती देऊन जास्तीत जास्त उपवर मुलींच्या नोंदणी करण्याचे आवाहन केले. जिल्हा संघटनेने राबविलेल्या उपक्रमांची माहीती दिली. मालवण तालुकाध्यक्ष डॉ. प्रमोद कोळंबकर यांनी तालुका शाखेने हाती घेतलेल्या जात पडताळणी, शालेय दाखले, सभासदत्व वाढविणे इत्यादि कार्याची माहिती दिली. यावेळी बेंगुर्ले तालुका शाखेची विशेष सभा घेऊन कार्यकारिणीची फेररचना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यावेळी श्री. छोटू सावजी,बाबी जोगी,दिलीप घारे, अन्वय प्रभू, रविकिरण तोरस्कर यांनी पारंपारिक मच्छीमार संघटनानी पर्ससीन नेटधारक व एलईडी द्वारे मासेमारी विरोधी वेळोवेळी केलेल्या आंदोलनांचे वेळी जिल्हा गाबीत समाजसंघटनेने पाठिंबा न दिल्याची खंत व्यक्त केली. तसेच श्री. रविकिरण तोरस्कर यांनी कायद्याने बंदी असलेल्या एलईडी मच्छिमारी विरोधी ठराव मांडला. श्री. बाबा मोंडकर यांनी गाबीत समाजातल्या विविध घटकाना प्रतिनिधित्व देऊन समाज कार्यात सहभागी करून घेतल्यास संघटना आर्थिक व सामाजिक कार्यात अधिक योगदान देऊ शकेल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी श्री रविकिरण तोरस्कर यांनी गाबीत समाजातील गरीब व गरजु मुलाना यावर्षी वह्या वाटप करण्यासाठी रुपये २५०००/- ची देंणगी जाहिर केली. तसेच आरोग्य शिबिरे भरविणयासाठी सर्व प्रकारची मदत करण्याचे जाहीर केले.

गाबीत समाज संघटनेचे आधारस्तंभ मत्स्यउद्योजक तथा जिल्हाध्यक्ष श्री. श्रीकृष्ण ताम्हणकर यांनी आपल्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे संस्थेच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच गेली २० वर्षे समाजातल्या सर्व घटकानी दिलेल्या आपुलकीच्या सहकार्याबददल आपल्या पत्रातुन आभार व्यक्त केले आहेत. त्यामुळे गाबीत समाज जिल्हाध्यक्षपदाची व नव्या कार्यकारिणीची निवड करण्याची प्रक्रिया लवकरच पार पाडली जाईल असे जिल्हा संघटक श्री. चंद्रशेखर उपरकर यांनी जाहिर केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा