You are currently viewing मी , वृद्धाश्रमातून…मी ..खिडकी बोलते आहे

मी , वृद्धाश्रमातून…मी ..खिडकी बोलते आहे

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा. सौ. सुमती पवार यांचा अप्रतिम लेख

मी , वृद्धाश्रमातून…मी ..खिडकी बोलते आहे ….

“ हेच फळ काय मम तपाला …”

लग्न होऊन सासरी आले, किती खुश होते मी…
नवा संसार, नवा जोडीदार, तारूण्याने मुसमुसलेली
काया..डोळ्यात स्वप्नांची रास, जमिनीवर चालतच
नव्हते हो मी..अधांतरी अघांतरी, डोळे अर्धोन्मिलीत
स्वप्नाळू असे.. !

मी तर शिकतच होते.आणि ते अपूर्ण ठेवायचेच
नव्हते मला. जोडीदार नोकरीला.त्या जुन्या काळानुसार
पगार,एवढी महागाई नव्हती तेव्हा! अहो, पाच रूपयाला
पोष्टमन तेलाचा डबा मिळायचा.४० रूपयांत ढीगभर किराणा
यायचा तेव्हा. तरी घरच्या जबाबदाऱ्या होत्याच ना? सासु
सासरे, नणंदा , त्यांचे शिक्षण, लग्ने इ .इ. तरी ही नवी स्वप्ने
व जबाबदाऱ्या पेलण्याची पुर्ण तयारी करून संसाराला लागले
मी,नव्या उमेदीने..अर्थात शिक्षण जमेल तसे पूर्ण करायचे
या निर्धारानेच …

बघता बघता संसार फुलायला लागला. अहो , अडचणी तर
साऱ्यांनाच येतात . त्यांचा पाढा नाही वाचणार मी तुमच्यापुढे!
संसार वेलीवर दोन फुले उमलली.पहिल्या वेळी तर लहान वया
मुळे लवकर समजलेच नाही मला, इतकी वेडी होते मी!
सर्व अडचणींवर मात करत झगडत संसार चालू होता. मुले
वाढत होती. शाळेत ही जाऊ लागली. ना रिक्षा होत्या ना पैसे!
सबकुछ पायी पायी .. शाळेत पोहोचवा पायी पायी.. दवाखान्यात पायी पायी.तरी मस्त आनंदात जात होते दिवस.
मुले शाळेत जाऊ लागली. अभ्यासात ही हुशार निघाली.

माझे शिक्षण पूर्ण होऊन एका अॅाफिसमध्ये मी ही नोकरीला
लागले. चार चाकांनी गाडी रूळावर धावू लागली.बघता बघता
मुले कॅालेजला जाऊ लागली. चार हातांनी कमावल्यामुळे
फार ओढाताण झाली नाही. वाटले .. गंगेत घोडे न्हाले .
शिक्षणं झाली, नोकऱ्या लागल्या .. व्वा .. वाटले , याच साऱ्ठी
केला होता अट्टाहास, परिश्रमाचे चिज झाले, दैवाची साथ
मिळाली . मुले मार्गी लागली. आता लग्न करून टाकावे. वधू
संशोधन सुरू झाले. व थोड्या थोड्या अंतराने मुलांची लग्ने ही
झाली. साजेशा गुणी सुना मिळाल्या.

आणि आता दैवाने एक मोठी संधी दिली, परदेशी जायची.
परदेशी जाणे हे तर आजकाल साऱ्यांचेच स्वप्न असते. खोऱ्याने पैसे मिळवायची ही संधी कोण सोडणार ? झाले..
कंपनी ने दोन्ही मुलांना परदेशी पाठवण्याचे ठरवले. मुलांची
घालमेल झाली. आई बाबांचे वय झालेले.आयुष्यभर त्यांनी
आपल्या साठी एवढ्या खस्ता काढल्या. इतक्या उच्चपदस्थ
पदी पोहोचवलं. खरं तर त्यांना आता आधाराची, सांभाळण्याची गरज आहे. आणि दोघांना परदेशी जाण्याची
आलेली संधी ? काय करावे? मुलांचे पंख कसे छाटावे? त्यांनी
तर आकाशी झेप घ्यायलाच हवी ना ?

मुलांच्या स्वप्नांच्या आड आपण येता कामा नये, त्यांना त्यांच्या पद्धतीने जगता आलेच पाहिजे.आई वडिलांनी
काळजावर दगड ठेवून दोघांनाही सपत्नीक परदेशी पाठवण्याचा निर्णय घेतला. व तशी तयारी सुरू झाली .
व एका सुमुहूर्तावर दोन्ही मुले अमेरिकेत उडाले.आणि २/३
वर्षातच अमेरिकेतच स्थिरावले. वय झाले असले तरी आम्ही
दोघे अजून पायांवर उभे होतो.मुलांनी परदेशात जाण्याचे
कौतुक होतेच. मोठ्या अभिमानाने लोकांना सांगत होतो मुले
परदेशी असल्याचे…

पण वास्तु मात्र दुखावली होती. लहानपणा पासून मुलांचा आवाज गोंधळ गडबड भांडणे ऐकायची सवय तिला!
एकदम स्तब्ध झाली. म्हणाली, दिले पाठवून मुलांना ..
“आता बसा भिंतींशी बोलत “? मला सारा गलबला ऐकून करमायचे, त्यांचे बोल घरात घुमायचे, वास्तु कशी जिवंत
वाटायची. गाणी गप्पा गोष्टी वा वा .. जीव कसा हरखून
जायचा. कंटाळा कसा तो येत नसे. आता कुणाकडे बघायचे
आम्ही? वाटले होते, आता सुना आल्या, नव्याने पुन्हा घरात
गोकुळ नांदेल, पण कसले काय ? जमिनीवर दुधाचे ओघळ
उठणारंच नाहीत आता? बाळाचा टॅहॅ नाही की, आई मला चहा
हवा असे बोल ही उठणार नाहीत आता…!कसे दिवस घालवायचे आता..?

निर्जीव वास्तु पण किती खरे बोलत होती ती? तिची ही
अवस्था तर आमचे काय झाले असेल हो? वर्ष दोन वर्ष
मुलांचे दर्शन होईनासे झाले. फोनवर बोलून बोलून किती
बोलणार ? पैसे नियमित येत होते पण ते ही फारसे लागत
नव्हतेच! शिवाय आमचे पेन्शन होतेच..जेव्हा पाहिजे तेव्हा
पैसे नव्हते नि आता मायेची मायेची माणसे दूर गेली होती.
होत्या फक्त भिंती आणि दारे व दिवसभर लागणारे मोकळे
वारे.. नि आम्ही हाडकुळी माणसे.. आधाराची गरज असलेले.
दिवसभर करमत नसे. काय करावे नि मग आम्हीच एक
दिवस वृद्धाश्रमाचा रस्ता धरला. चार लोकात निदान करमेल
तरी. नि काळजी घेणारे भाड्याचे का होईना मिळतील!

मुलांची वाट पाहून डोळे थकले, आता खिडकीत बसून
मृत्यूला साकडे घालायचे ….सोडव बाबा ह्या खिडकीतूनही
आता.. कोणी येणार नाही भेटायला, आता तू तरी ये नि
कर सुटका या खिडकीतून ही ….कायमची … निरंतर …॥
( एका सत्य घटनेवर आधारीत पण आता हे दु:ख सार्वजनिक
झाले आहे .)त्याचे ही काही वाटेनेसे व्हावे इतक्या संवेदना
बोथटल्या आहेत आजकाल ….)

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : ६ जून २०२२
वेळ : दुपारी १२ : ५७

प्रतिक्रिया व्यक्त करा