सावंतवाडी :
पर्यावरणाप्रती लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांद्वारे आयोजित केला जाणारा “जागतिक पर्यावरण दिवस” हा जगातील सर्वात मोठा कार्यक्रम आहे. आज मनुष्य, प्राणी-पक्षी, किटक यांचे जीवन पर्यावरणामुळेच शक्य आहे. या दिवसामागील पर्यावरणाशी संबंधित समस्यांना मानवी चेहरा देण्यासोबतच, लोकांमध्ये पर्यावरणाबाबत जागरुकता निर्माण व्हावी हा या मागील उद्देश आहे.
याच निमित्ताने सावंतवाडी येथील निसर्गप्रेमी तथा सिंधुदुर्ग जिल्हा निसर्ग मित्र समितीचे सचिव प्रा.रुपेश पाटील व सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.मधुकर घारपुरे यांनी पर्यावरण संरक्षण प्रचारासाठी सातत्याने विधायक उपक्रम हाती घेतले आहेत.
५ जून पर्यावरण दिनाच्या निमित्ताने प्रा. रुपेश पाटील व डॉ.मधुकर घारपुरे यांनी सावंतवाडी रेल्वे स्थानकात पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी ‘पर्यावरण वाचवा, निसर्गमित्र व्हा..!’ या आशयाच्या १०१ स्व लिखित पत्रिका प्रवाशांना वाटून पर्यावरण संरक्षणाचा विधायक संदेश दिला आहे.
पत्रात त्यांनी “निसर्ग सौंदर्य अबाधित राहण्यासाठी रिकामे कप, डिशेश, खाद्यपदार्थ वेष्ठणे, रिकाम्या बाटल्या खिडकीतून बाहेर फेकू नका, निसर्गाला जपा आणि छान निसर्ग मित्र व्हा! असा संदेश देणारी पत्रके प्रवाशांच्या हाती दिल्यावर, हा आपल्या हाती दिलेला कागद शेजाऱ्यांलाही द्या आणि त्यालाही दुसऱ्याला दाखवण्याची विनंती करा, असा संदेश लिहत सदर पत्रके पर्यावरणदिनाच्या निमित्ताने सावंतवाडी रेल्वे स्टेशन वर जाऊन वाटली आहेत.
प्रा. रुपेश पाटील हे निसर्गमित्र समितीचे जिल्हा सचिव असून पर्यावरण संरक्षणासाठी ते नेहमीच विधायक उपक्रम राबवित असतात. तर डॉ. घारपुरे हे एक जागरूक सावंतवाडीकर नागरिक म्हणून प्रसिद्ध आहेत. वर्तमान पत्रात सातत्याने पत्रव्यवहार करून ते समाजाभिमुख कार्य करत आहेत. प्रा. पाटील व डॉ. घारपुरे यांच्या या विधायक उपक्रमाचे सर्व स्तरावरून स्वागत व कौतुक होत आहे.