You are currently viewing मी आले मोहरून ….

मी आले मोहरून ….

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा. सौ. सुमती पवार यांची अप्रतिम काव्यरचना

मी आले मोहरून , माझा कर धरा करी
अहो राया घडीभर बना तुम्ही माझे हरी
पुजतेच तुम्हाला मी घरधणीन मी जरी
कसं मी सांगू तुम्हाला हो हौस माझी पुरवा…
माझ्या केसात माळा हो मरवा…
माझ्या केसात माळा हो मरवा …

राघू मैनेची ही जोडी सारे बोलतात लोक
आहे तुम्हाला माहित माझ्या गजऱ्याचा शौक
कुणी ठेवतील नावे द्या हो मुरडू ना नाक
पायघड्यांना गुलाब आणा नका करू पर्वा…
माझ्या केसात माळा हो मरवा ….

कमळाचे आणा देठ जाऊ अंबाबाईला हो
समुद्राच्या काठावर घडीभर बसू या हो
फेसाळत येती लाटा जरा अंगावर घेऊ
तुषारात थंडगार दोघे भिजूनच जाऊ
गिरगांवाच्या चौपाटीवर दही पुरी भरवा …
माझ्या केसात माळा हो मरवा ….

राणी ती बाग पहा नाही पाहिली अजून
सर मोत्याचा गळ्यात आले पहा मी सजून
सी लिंकवर पहा चला जाऊ या जोडीनं
घारापुरी लेणी बघू जाऊ दोघेच बोटीनं
नरीमन पॅाईंट फिरू या पायी हौस माझी पुरवा …
माझ्या केसात माळा हो मरवा ….
माझ्या केसात माळा हो मरवा …

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : 3 जून २०२२
वेळ : संध्या. ४ : ५६

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven + three =