You are currently viewing याला जीवन ऐसे नाव…

याला जीवन ऐसे नाव…

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ राधिका भांडारकर यांचा अप्रतिम लेख

पंच्याहत्तर वर्षांपूर्वी, कोण्या अज्ञात शक्तीने, माझे पृथ्वी बँकेत खाते उघडले. संपूर्ण केवायसी व्हेरिफिकेशन वगैरे करून. खाते उघडताना, त्याविषयीचे नियम ,मुदत, उद्देश,शिलकी विषयीचे बंधन, व्याजाचा दर ,हे सर्व काही सही शिक्क्यानिशी मान्य केले गेले.
आज माझ्या खात्याचे स्टेटस, “अॅक्टिव्ह” असेच आहे. शिल्लक माहित नाही. कारण ती, त्या अज्ञात शक्तीच्या अधिपत्याखाली आहे. मात्र जोपर्यंत खाते चालू स्थितीत आहे, तोपर्यंत मी ते ऑपरेट नक्कीच करू शकते. बाकी बेरजा, वजाबाक्या तो बँकर करतोय.
ठीक आहे.
तर माझ्या जीवनाचा प्रवास असा सुरू झाला .जिंदगीकी एक लंबी सफर!! कोई समझा नही, कोई जाना नही!
तीन टप्प्यांवरचा हा प्रवास.बाल्य, यौवन आणि जरा.
सध्या मी, तिसर्‍या टप्प्यावर असल्यामुळे माणूस म्हणून जगताना चा एक महापटच ,मागे वळून पहातआहे.
कसा होता हा प्रवास?
भरगच्च होता.
चांगला होता का?
संपूर्ण वाईट नव्हता. पण इतका ही सरळ नव्हता.

काही वाटा कच्च्या होत्या. काही ठिकाणी, काम चालू रस्ता बंद अशा पाट्या होत्या. बरेच स्पीड ब्रेकर्र्स होते . डायव्हर्जन्स होती. तर काही रस्ते खूपच सरळ, गुळगुळीत आणि रम्य होते. प्रत्येक ठिकाणी मी फुले, खडे, शंख, शिंपले वेचत गेले. बालपण छान गेले. रम्य होते ते! माणूस म्हणून जगण्याची, कदाचित सुरुवात नव्हती झाली तेव्हां. पण हो! एक काटा बोचल्याचे आठवते.
आम्ही गल्लीतली मुलं खूप खेळायचो. दंगा करायचो. एक दिवस विटी दांडू खेळताना, आमच्या गल्लीत राहणाऱ्या बटू बाईच्या कठड्यावर विटी आपटून तिला थोडसं लागलं. तिचा सगळा रोष माझ्यावरच असावा. तिने मला जोरात ,”ए बटारे! इकडे ये पाहू!”असं अत्यंत रागमिश्रीत तुच्छतेने हाकारलं. माझे डोळे जास्तच मोठे म्हणून मला “बटारी” ही पदवी तिने दिली होती
मी फार दुखावले. घरी येऊन रडरड रडले. आजीने जवळ घेतलं, आणि म्हटलं ,”तुझे डोळे सुंदर आहेत. मोठ्या डोळ्यांनी तू मोठ्ठं जग पाहशील.”
हा पहिला धडा असावा, माणूस म्हणून जगतानाचा.. मनात एक पक्कं रुजलं, कधी कुणाच्या व्यंगावरून कुणाला दुखवायचं नाही.कुणी काळा ,काणा, जाडा टकल्या असेनाका..त्याचा काय दोष? सहअनुभूतीच्या शिकवणीचा एक सूक्ष्म कण असा वेचला.
जोपर्यंत आपली बोटं कुणी धरलेली असतात, कोण्या हातांचा आधार असतो, तोपर्यंत वाटा सुरक्षित ,सपाट असतात . आपल्या सोबत दिशादर्शक असतात. इकडे जा, तिकडे जाऊ नको , असे सांगणारे आवाज असतात. पण जेव्हा हात सुटतात, आधार दूर जातात, तेव्हां सुरू होते खरे जीवन. खरे संघर्ष. खरी लढाई. तेव्हां माणूस म्हणून जगताना, आपण एका समर भूमीवर निशस्त्र सैनिका सारखे असतो. कधी कोणी समोरून लढतो तर कधी कुणी पाठीमागून वार करतो. मग बहिणाबाईंचे उद्गार आठवतात,
” माणसा, माणसा रे! कधी व्हशीन तू माणूस?”
मग मीही माझ्यातल्या माणसाला शोधण्याचा प्रयत्न करते.
तुकडे तुकडे झालेल्या नकाशाला जोडणार्‍या एका मुलाला त्याचे शिक्षक सांगतात,” अरे वेड्या! या तुकड्या मागचा माणूस जोडण्याचा प्रयत्न कर. नकाशा आपोआप जुळेल.”
मात्र ही माणूस जोडण्याची जी प्रक्रिया आहे ना.. ती न संपणारी आहे.
मी आणि माझी धाकटी जाऊ. आमचं नातं अगदी बहिणी, मैत्रिणीं सारखं आहे. जेव्हा तिला पहिला मुलगा झाला, तेव्हा माझ्या सासुबाई पटकन म्हणाल्या,
” माझ्या सरोज ने गड जिंकला.”
मी थोरली सून. दोन सुंदर गुणी कन्यांची माता. मनाला बजावलं, मुलगा नसल्याचं वैषम्य आपल्याला जर नाही तर सासुबाईंचे उदगार, का लावून घेऊ मनाला? त्यांची ती नकळत झालेली प्रतिक्षिप्त क्रिया ही असू शकते.
पण वाईट एकच वाटलं, समाजाच्या संकल्पना बदललेल्या नाहीत. अजूनही मुलगा झाला या भावनेचा आनंद, मुलीच्या जन्माने घेतलेला नाही. असं का? जग पुढे गेलं म्हणजे नक्की काय? याचा, माणूस म्हणून जगताना अर्थ सापडेनासा होतो.
माझ्या ऑफिसमध्ये शोभा कर्णिक नावाची एक तरुणी होती. अविवाहित आणि प्रौढत्वाकडे झुकत चाललेली, म्हणून प्रौढ कुमारिका हे लेबल लागून, आलेलं एक बिच्चारेपण तिच्या चेहऱ्यावर होतं.
प्रत्येक वेळी मनात येतं, वांझोटी, निपुत्रिक, प्रौढ कुमारिका हे काटेरी शब्द,शब्द कोशातूनच काढून टाकले पाहिजेत. विधवा सुवासिनी हे भेद कशाला? एक स्त्री आणि तिचे जीवन याकडे निखळपणे का नाही पाहता येत?
तर सांगत होते शोभा कर्णीकविषयी.
एक दिवस ती माझ्याकडे आली. खूप आनंदात होती. मला म्हणाली,” हा घ्या पेढा माझं लग्न जमलं”.
लग्न जमलेल्या आनंदापेक्षा काहीतरी मिळवल्याचा आनंद तिच्या चेहर्‍यावर पाहून मीही सुखावले. लग्न जमलं, कोणाशी जमलं , हे भरभरून सांगताना, शेवटी ती म्हणाली,” मॅडम! हे सगळं तुमच्यामुळे झालं. मी तुमची खुप आभारी आहे.”
मला कळलेच नाही,हे कसे?.
“मॅडम तुम्ही एकच अशी व्यक्ती आहात की, मला रोज म्हणता !”शोभा तू किती छान दिसतेस! हा रंग तुला किती छान दिसतो! तुझं गळ्यातलं फारच सुंदर आहे!” तुमच्या सहज प्रामाणिक कौतुकाने ,मॅडम! मला एक आत्मविश्वास मिळत गेला. माझ्यातले न्यून विझू लागले मीच स्वतःला, एक व्यक्ती म्हणून पाहू लागले. निराशा झटकली. आणि थोडी बिनधास्त झाले. म्हणून म्हणते, मॅडम हे सगळं तुमच्यामुळे…”
दोन चांगले सकारात्मक शब्द इतकी जादू करू शकतात, हे माणूस म्हणून जगताना मला जाणवले. खरंच काय बिघडतं जर दोन चांगल्या शब्दांमुळे कुणाचं जीवन अर्थपूर्ण होत असेल तर?
जीवन म्हणजे आठवणींचं,अनुभवांचं बेटच.
गरज सरो वैद्य मरो …
सब घोडे बारा टक्के..
असतील शिते तर जमतील भूते….
आवळा देऊन कोहळा काढला….अति परिचयात अवज्ञा…
अडला नारायण गाढवाचे पाय धरी …या सगळ्या प्रचलित म्हणींचा, माणूस म्हणून जगताना मी पुरेपूर अनुभव घेतला. पटावरच्या सोंगट्या कशा नाहीशा होत गेल्या हेही अनुभवलं. जी तुटली ती नातीच नव्हती असे मनाला समजावले.घरंगळून गेलेल्या कणां पेक्षा मुठीला चिकटून राहिलेले दोन पाच वाळूचे कण मोलाचे वाटले.
बहुत कुछ सिखाया जिंदगी के सफरमे अनजाने ने
वो किताबों मे दर्ज था ही नही
जो पढाया सबक जमाने ने …।
पंच्याहत्तर वर्षांपूर्वी उघडलेल्या अकाउंट चे स्टेटस अजूनही ॲक्टिव आहे. खात्यात किती शिल्लक?
माहीत नाही.
किती डेबिट-क्रेडिट ?
माहीत नाही,
व्याज माहित नाही. बोनस पॉइंट्स माहित नाही. पण माणूस म्हणून जगताना खरं-खोटं, भलं बुरं , शुद्ध अशुद्ध, याचं यथाशक्ती भान ठेवलं . माणूस म्हणूनच जगले. संत झाले नाही. अर्जुन झाले नाही. चाणक्य झाले नाही. पण आर के लक्ष्मणच्या काॅमन मॅन सारखी सदैव प्रश्नचिन्ह घेऊन जगले.
एक सांगते! एक स्त्री म्हणून जगताना स्त्रीत्वा बरोबरच, एक पुरुषत्व ही बाळगलं. आणि संघर्षाच्या वेळी समस्यांच्या वेळी त्याचा शस्त्र म्हणून वापरही केला.
हरले, धडपडले, चुकले,फसवले गेले,भांबावले पण मोडले नाही.
फुल तो मेहनत के हथेली पर उगाने दो।
मोड तो आये कई
मगर मंजीले गुमनाम रही ..।
यालाच म्हणतात कां जीवन ?जगणं?

राधिका भांडारकर

प्रतिक्रिया व्यक्त करा