“जाज्वल्य देशाभिमान याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर: विवेक मुतालिक
कुडाळ :
“जाज्वल्य देशाभिमान याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. देशावर, देशबांधवावर प्रेम असेल तर कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी लागते. हे आपल्या उदाहरणातून दाखवून दिले ते स्वा. सावरकर भारतामध्ये जन्माला आले हे आपल्या सर्वांचे महत भाग्य आहे. त्यांच्या वक्तव्यामध्ये लोकांना पेटून उठण्याचे सामर्थ्य असणारे लोकोत्तर महापुरुष म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. असे उद्गार विवेक मुतालिक यांनी काढले ते बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेच्या सेंट्रल स्कूल तर्फे आयोजित स्वा. सावरकर यांच्या जयंती कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. त्यानी आपल्या पुढील मनोगतामध्ये सावरकर यांची देशनिष्ठा बुद्धिमत्ता, तेजस्वी आणि ओजस्वी वाणी यावरच्या विविध घटना गोष्टी रूपातून उपस्थितांसमोर व्यक्त केल्या .यावेळी व्यासपीठावर महिला व रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण मर्गज, फिजिओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुरज शुक्ला, सेंट्रल स्कूलच्या प्राचार्या शुभांगी लोकरे, नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या मीना जोशी उपस्थित होत्या . स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर व इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी गायिलेल्या सावरकरांच्या जयस्तुते, ने मजसी ने परत मातृभूमीला…., शिवाजी राजांची आरती या गीत गायनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये अरुण मर्गज यांनी “आपल्या कार्याप्रती श्रद्धा व आपले कार्य प्रामाणिकपणे करणे व आपल्या प्रत्येक कृतीच्या वेळी देशहिताचा विचार केला तरी देशप्रेम शोधायला बाहेर जायला नको. असे सांगत सावरकरांचे देशप्रेम व राष्ट्रनिष्ठा कोणत्याही जातीय व पक्षीय वादाच्या पलिकडचे आहे. अशा भारत मातेच्या सुपुत्राच्या राष्ट्रप्रेमाचा व स्वातंत्र्य चळवळीतील त्यांच्या योगदानाचा विसर पडू न देणे हे आदराचे ठरेल”. असे मनोगत व्यक्त करीत सावरकरां सारखी देशनिष्ठा प्रत्येकाने आपल्या मनात व कृती उक्तीमध्ये जागृत ठेवण्याच्या गरजेचे प्रतिपादन केले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नचिकेत मिलिंद देसाई व उपस्थितांचे आभार ऋचा कशाळकर यांनी मांडले यावेळी विद्यार्थी व शिक्षक वृंद बहुसंख्येने उपस्थित होते.