You are currently viewing ‘सौदामिनी’वर नजर ‘दामिनी’ची

‘सौदामिनी’वर नजर ‘दामिनी’ची

‘सौदामिनी’वर नजर ‘दामिनी’ची

       मान्सूनचे आगमन होण्यापूर्वी किंवा परतीचा पाऊस सुरू होण्याच्या कालावधीत अनेकदा विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडतो. काहीवेळा वादळेही होतात. यात अनेकदा वित्तहानी व जीवितहानीही होते. ही हानी टाळण्याच्या उद्देशाने उष्ण कटीबंधीय हवामान शास्त्र संस्था पुणे (IITM) व पृथ्वी प्रणाली विज्ञान संस्था (ESSO) यांच्या संयुक्तविद्यमाने दामिनी हे विजांच्या लखलखाटांचा इशारा देणारे मोबाईल ॲप विकसीत केले आहे. या ॲपमुळे शेतकऱ्यांना विजांच्या कडकडाटांचा व वादळी पावसाचा अंदाज साधारणतः 15 ते 45 मिनीटे अगोदर मिळू शकतो. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून उपाययोजनाही करणे शक्य होणार आहे. एकंदरीतच आकाशात कडाडणाऱ्या सौदामिनीवर दामिनीची नजर राहणार आहे.

       ग्रामीण कृषी मौसम सेवा, उद्यान विद्या महाविद्यालय, मुळदे, ता. कुडाळ येथील डॉ. यशवंत मुठाळ यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. विजेचे झटके व कडकडाट ही एक अशी घटना आहे, जनमानव जातीला केवळ हानी पोहचवत नाही तर भयभीतही केले आहे. प्रत्येक सेकंदाला पृथ्वीवर सुमारे 50 ते 100 विजेचे झटके येतात. अलीकडच्या काळात पृथ्वीवर इतर नैसर्गिक आपत्तीच्या तुलनेत वीज सर्वाधिक मारक म्हणून ओळखली जाते. त्यामुळे मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. एकट्या विजेमुळे भारतात दरवर्षी सुमारे दोन हजार ते अडीच हजार मृत्यू होतात.

       लवकरच पावसाळ्याला सुरूवात होत आहे. पाऊस म्हणजे नवनिर्मिती. पाऊस म्हणजे हिरवाई अन् मनमुराद आनंद ! परंतु, पावसाच्या आधी आकाशात सौदामिनीचा कडकडाट आलाच. याच तिच्या कडकडाटामुळे आपसुक नुकसान हे आलेच. वीज कोसळून होणारी हानी टाळता येण्यासाठी त्याचबरोबर शेतकऱ्यांनी, सामान्य नागरिकांनी काय करावे काय करू नये यासंदर्भात माहिती देण्यासाठी दामिनी हे ॲप डाऊनलोड करणे आवश्यक आहे.

       दामिनी ॲपसाठी IITM ने लाईटनिंग लोकेशन नेटवर्क मॉडेल विकसित केले आहे. माहिती संकलनासाठी विविध भागात सेन्सर बसवण्यात आले आहेत. प्रत्येक सेन्सरची 200 कि.मी. परिघातील घडामोडींचा वेध घेण्याची क्षमता असून परिसरातील क्षेत्रात आगाऊ इशारा मिळतो. सर्व सेन्सर सेंट्रल प्रोसेसिंग युनिटशी जोडण्यात आले असल्यामुळे वादळी पाऊस, विजांच्या कडकडाटाचे अचूक अंदाज आणि घडामोडी नगरिकांना घर बसल्या समजणार आहेत.

       नागरिकांनी विशेषतः शेतकऱ्यांनी https://play.google.com/store/apps/details?id=com.lightening.live.damini हे ॲप आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करून घ्यावे. त्याचबरोबर आपले नाव, मोबाईल नंबर, पत्ता, पिनकोड आदीची माहिती ॲपमध्ये नोंद करून घ्यावी.

       राज्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागानेही याबाबत सर्व जिल्ह्यांना पत्र पाठवून जिल्हास्तरावर वीज कोसळून होणाऱ्या हानी संदर्भात करावयाच्या उपाययोजनांबाबत सूचना केल्या आहेत. यात प्रामुख्याने आएमडी व आयआयटीएम यांनी विकसित केलेल्या दामिनी ॲपबाबत जागृती निर्माण करून त्याचा व्यापक प्रमाणावर प्रचार व वापर करण्याबाबत विशेष सूचना केली आहे. या ॲपचा नागरिकांनी जरूर वापर करावा आणि संभाव्य होणाऱ्या हानीपासून बचाव करावा.

-प्रशांत सातपुते – जिल्हा माहिती अधिकारी, सिंधुदुर्ग

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty + two =