अन्यथा मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर रस्त्यातील खड्ड्यात करणार वृक्षारोपण
अजित नाडकर्णी यांचा बांधकाम विभागाला इशारा
फोंडाघाट
देवगड निपाणी हायवे ची फोंडाघाट हद्दीतील हवेलीनगर पेट्रोलपंप ते लोरे फाटा दरम्यान खड्डयांमुळे चाळण झाली आहे. येत्या पावसाआधी जर हे खड्डे बुजवून रस्ता वाहतुकयोग्य केला नाही तर मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर या रस्त्यावरील खड्ड्यांत वृक्षारोपण करणार असल्याचा इशारा अजित नाडकर्णी यांनी दिला आहे. हवेलीनगर पेट्रोलपंपासमोर तर हा हायवे पूर्ण खड्ड्यात गेला आहे. गतवर्षी पावसाळ्याआधी अजित नाडकर्णी यांनी रास्ता रोकोचा इशारा दिल्यानंतर तात्पुरती डागडुजी सार्वजनिक बांधकाम खात्याने केली होती. डागडुजी करताना सम्पूर्ण खड्डेमय रस्त्यावर डांबरी सिलकोट करून देण्याचे आश्वासनही सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांनी दिले होते. त्यामुळे नाडकर्णी यांनी रास्ता रोको तहकूब केला होता. मात्र आपल्या आश्वासनाचा संबंधित अभियंत्यांना विसर पडला असून 1वर्ष झाले तरीही या रस्त्यावरील खड्डे जैसे थे आहेत. पावसाळा तोंडावर असून पावसात हे खड्डे आणखी मोठे होऊन या ठिकाणी अपघातात झालेल्या मानुष्यजीवितहानी ची उजळणी होण्याचा धोका आहे. जीवितहानी झाल्यावरच पिडब्ल्यूडी खात्याला जाग येणार आहे काय ? आणि त्यानंतरच भर पावसात खड्डे बुजवायला घेणार आहात काय ? असा सवाल करत अजित नाडकर्णी यांनी येत्या पावसाआधी या मार्गावरील रस्त्यावरील खड्डे डांबरीकरण करून बुजवावे अशी मागणी केली आहे. अन्यथा मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर पिडब्ल्यूडी खात्याचा निषेध म्हणून रस्त्यावरील खड्ड्यांत वृक्षारोपण करणार असल्याचा इशारा दिला आहे.