You are currently viewing कणकवलीत थांबलेल्या टेम्पोला आयशरची मागून धडक, दोघे जखमी….

कणकवलीत थांबलेल्या टेम्पोला आयशरची मागून धडक, दोघे जखमी….

वाहतूक शाखेचे पोलीस मदतीसाठी धावले; जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू…

कणकवली

रस्त्यावर थांबलेल्या टेम्पोला मागून भरधाव येणाऱ्या आयशरची धडक बसल्याने झालेल्या अपघातात चालक व क्लीनर दोघे जखमी झाले आहेत. हा अपघात आज सकाळी पाच वाजता ओसरगाव टोलनाक्या जवळ मुंबई-गोवा महामार्गावर घडला. त्यांना जिल्हा वाहतूक पोलिसांनी तात्काळ धाव घेत अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्रवीण संजय कोंडगे (वय २९, रा. चांदणी चौक बावधन पुणे) व पोपट शिवाजी साळुंखे (वय ३४ रा. कराड जि. सातारा) अशी जखमींची नावे आहेत. त्यांना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला याबाबतची माहिती मिळताच वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप पुजारे, हवालदार सुशांत पवार, पोलीस नाईक श्री. धुरी, वागतकर, श्री. नाईक आदींनी त्या ठिकाणी धाव घेत त्या जखमींना सहकार्य केले.

ही धडक एवढी जबरदस्त होती की आयशरचा पुढचा भाग पूर्णतः चेपला आहे. अशा परिस्थितीत पत्रा वाकवून त्या दोघांना वाहतूक पोलिसांनी बाहेर काढले व १०८ रुग्णवाहिकेच्या माध्यमातून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. यात जखमी कोडगे यांची प्रकृती गंभीर आहे. गाडीचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा