You are currently viewing वैभववाडी शहरात विजेचा लपंडाव : वीज पुरवठा सुरळीत करा

वैभववाडी शहरात विजेचा लपंडाव : वीज पुरवठा सुरळीत करा

सर्वपक्षीय नगरसेवक व व्यापाऱ्यांची वीज वितरण कार्यालयाला धडक

वैभववाडी

वाभवे – वैभववाडी शहरात वारंवार विजेचा लपंडाव सुरू आहे. याचा नाहक त्रास शहरवासीयांना भेडसावत आहे. वीज पुरवठ्यात येणारे अडथळे तात्काळ दुर करा. व वीज सुरळीत करा. या मागणीसाठी सर्व पक्षीय नगरसेवक व व्यापारी मंडळ पदाधिकारी यांनी वीज वितरण कंपनीचे अधिकारी श्री कानडे यांची भेट घेत निवेदन सादर केले. यावेळी न. पं. चे नगराध्यक्ष नेहा माईणकर, उपनगराध्यक्ष संजय सावंत, नगरसेवक बबलू रावराणे, रणजित तावडे, राजन तांबे, नगरसेविका यामिनी वळवी, सुप्रिया तांबे, नगरसेवक मनोज सावंत, तेजस आंबेकर, सुरेंद्र नारकर, अरविंद गाड, संतोष कुडाळकर आदी उपस्थित होते.

उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. वाभवे वैभववाडी शहर हे तालुका मुख्यालयाचे ठिकाण असल्याने आजुबाजुच्या गावातील नागरिक शासकिय कामा निमित्त वैभववाडी शहरा मध्ये ये-जा करत असतात‌. वीजपुरवठा नसल्याने त्यांचीही शासकीय कामे खोळंबतात. वीज सतत येत जात असल्याने विद्युत भार कमी जास्त होवून त्याचा विद्युत यंत्रणावर तसेच नगरपंचायतीच्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या पंपावर परिणाम होऊन ते ना दुरुस्त होत आहेत. मोटारपंप ना दुरुस्त झाल्याने त्यांचा परिणाम पाणी पुरवठ्यावर होत असून पर्यायाने नागरिकांच्या रोशाला नगरपंचायतीला सामोरे जावे लागत आहे. तसेच शहरासाठी वीज वितरण ने वायरमन म्हणून महिला कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे. त्या ठिकाणी दुसरा कर्मचारी देण्यात यावा. अशा मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.

वरील विषयाची गंभीरता ओळखून विद्युत लाईटची अनियमितता दूर करावी तसेच पावसाळ्यापूर्वी नगरपंचायत कार्यक्षेत्रा मधील सर्व विद्युत पोल व विद्युत लाईन वरील झाडी तात्काळ तोडण्यात यावी. विद्युत पुरवठा सुरळीत होईल याची काळजी घ्यावी. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सर्व पक्षीय नगरसेवक व व्यापारी मंडळ पदाधिकारी यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा