You are currently viewing तहसिलदार, बीडीओ, मुख्याधिकारी, पोलीस आणि बंदर विभागाने वॉटरस्पोर्ट्स बीचवर टेहळणी पथकाची निर्मिती करावी

तहसिलदार, बीडीओ, मुख्याधिकारी, पोलीस आणि बंदर विभागाने वॉटरस्पोर्ट्स बीचवर टेहळणी पथकाची निर्मिती करावी

पर्यटकांच्या सर्वोच्च सुरक्षिततेला प्राधान्य देत सर्व यंत्रणांनी सतर्क आणि सक्रीय रहा

 -जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्गनगरी

ज्या ज्या समुद्र किनाऱ्यांवर वॉटर स्पोर्ट्स होत आहेत. त्या ठिकाणी पर्यटकांच्या सर्वोच्च सुरक्षिततेला प्राधान्य देत सर्व यंत्रणांनी सतर्क आणि सक्रीय राहिले पाहिजे. कोणतीही दुर्घटना होणार नाही यासाठी तहसिलदार, गट विकास अधिकारी, मुख्याधिकारी, पोलीस यंत्रणा आणि बंदर विभाग यांनी टेहळणी पथक स्थापन करून अनधिकृत बाबींवर तात्काळ कारवाई करावी, अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिल्या.

            जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेबाबत  आणि भविष्यात कोणतीही आपतकालीन दुर्घटना घडू नये यासाठी सर्व प्रमुख यंत्रणांची आज  बैठक घेण्यात आली. याबैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, मुख्य बंदर अधिकारी कॅ. सुरज नाईक, प्रांताधिकारी वंदना खरमाळे, वैशाली राजमाने, प्रशांत पानवेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर, प्रभारी जिल्हा प्रशासन अधिकारी जयंत जावडेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांच्यासह पोलीस ठाण्यांचे निरीक्षक उपस्थित होते.

            नुकत्याच घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांसाठी सुरक्षा व्यवस्था करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, ग्रामपंचायत, नगर पालिका हद्दीतील किनाऱ्यांवर त्या त्या यंत्रणांनी जीवन रक्षक व्यक्तींची नेमणूक करावी. वाहन तळ व्यवस्था करावी. माहिती फलक, दिशा दर्शक फलक लावावेत. धोक्याची सुचना देणारे सायरन उपलब्ध करावेत. आरोग्य विभागाने वैद्यकीय पथकांची उपलब्धता ठेवावी. त्याच बरोबर भरती – ओहोटी यांच्या तारखा व वेळा यांची माहितीही फलकांवर द्यावी. जीवन संरक्षक साहित्याची व्यवस्था करावी. ग्रामपंचायत तसेच नगर पालिका यांनी त्याबाबत मागणी करावी.

            बंदर विभागाने बोटींची सुरक्षितता दर महिन्याला तपासावी. त्याचबरोबर त्यांना प्रशिक्षण द्यावे. अनधिकृत बोटी, असुरक्षित बोटी यांच्यावर तात्काळ कारवाई करावी. अचानक भेटी देऊन तहसिलदार, गटविकास अधिकारी, पोलिस निरीक्षक यांनी बोटीची नोंदणी आहे का? लाईफ जॅकेट आहे का? क्षमते पेक्षा जास्त पर्यटक बसवले जातात का? याबाबत  तपासणी करावी. एमटीडीसीने जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांच्या नोंदी त्यांचे संपर्क क्रमांक याबाबतची माहिती ठेवावी. स्कुबा ऑपरेटरांकडे परवाने, नोंदी आहेत का? याबाबतही तपासणी करावी.

            निवासी उपजिल्हाधिकारी श्री. भडकवाड आणि पोलीस अधिक्षक श्री. दाभाडे यांनीही सविस्तर मार्गदर्शन केले. पर्यटन जिल्ह्याच्या नाव लौकिकाला कोणतेही भविष्यात गालबोट लागू नये याबाबत सर्वच यंत्रणांनी दक्ष राहण्याबाबत सूचना दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा