पो.नि. खोत यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला वेग.
आंबोली घाटातील दरीत सडलेल्या अवस्थेत मिळालेल्या मृतदेहाचा तपास करणे तसे अत्यंत अवघड काम होते. कोणताही पुरावा हाती लागला नसताना आणि बेपत्ता तक्रार दाखल केलेल्यांनी मृतदेहाची ओळख न पटविल्याने तिची ओळख मिळणे अत्यंत जिकरीचे झाले होते. परंतु मळगाव येथून बेपत्ता असलेल्याच महिलेभोवती तपास केंद्रित करून तिच्या मोबाईल डाटावरून तिच्याशी संपर्क ठेवलेल्या क्रमांकांवरून शेवटचा संपर्क झालेली व्यक्ती ही गरड माजगाव येथे बिल्डिंग मध्ये फ्लॅट भाड्याने घेऊन राहत असल्याचे निदर्शनास आल्यावर योगेश कांबळे नामक व्यक्तीवर करडी नजर ठेवून त्याचे अवैद्य धंद्यांशी असलेले धागेदोरे तपासून त्याला ताब्यात घेण्यात पोलिसांनी यश मिळविले आणि तिथूनच मृतदेहाचा संबंधित सर्व माहिती उघड होण्यास सुरुवात झाली.
कोणताही पुरावा हाती नसताना पो.नि. शशिकांत खोत आणि सहकारी स.पो.नी. गोते यांनी अतिशय कल्पक बुद्धीने मोबाईल डाटाच्या महितीद्वारे संशयित आरोपी शोधून काढले आणि काहीच दिवसात त्यांना गजाआड करून उल्लेखनीय कामगिरी केली. सडलेल्या अवस्थेतील मृतदेहाचा तपास लागणे कठीणच होते. यापूर्वीही आंबोलीच्या दरीत असे काही मृतदेह, सांगाडे सापडले होते परंतु त्यांचा तपास मात्र लागला नव्हता. परंतु यावेळी मिळालेल्या मृतदेहाचा तपास आणि गुन्हेगारांचा लावलेला शोध ही सावंतवाडीच्या पोलिसांची कामगिरी वाखाण्याजोगी.
संशयित गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागले, त्यांनी कबुली सुद्धा दिली परंतु मृत महिला ही तीच गीतांजली मळगावकर आहे हे सिद्ध होण्यासाठी तिच्या चीजवस्तू, मोबाईल, पर्स इत्यादी ज्या आरोपींनी आंबोली घाटात वाटेत फेकून दिल्या त्या मिळणे आवश्यक आहे. त्याच प्रमाणे डीएनए रिपोर्ट सुद्धा तिच्या मुलाच्या डीएनए शी जुळवून बघत पोलीस प्रशासन आपल्याकडून कोणतीही दिरंगाई होणार नाही याची काटेकोरपणे काळजी घेत आहे. संशयित आरोपींकडून चीजवस्तू फेकलेल्या बाबत विसंगत माहिती मिळत असल्याने त्या ताब्यात घेण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे संशयित आरोपींनी ज्या ठिकाणी दरीत पर्स, मोबाईल इत्यादी वस्तू फेकल्या अशी माहिती मिळते त्या ठिकाणी रेस्क्यू टीमच्या मदतीने दरीत उतरून तपास केला जाणार आहे. सावंतवाडी पोलीस आपल्या परीने आरोपींना कडक शासन होण्यासाठी अत्यंत काळजीपूर्वक तपास करत असून लवकरच ते आरोपींच्या मुळापर्यंत पोचतील यात शंकाच नाही.
लॉकडाऊनच्या काळात बक्कळ पैसा कमविण्याच्या नादात अवैद्य धंद्यांकडे ओढलेली तरुण पिढी व्यसनाधीन होत गंभीर गुन्हे करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. त्यामुळे अशा अनैतिक, अवैध धंद्यांकडे आकर्षित होऊन गुंतणाऱ्या तरुण पिढीला वचक बसण्यासाठी पोलिसांकडून आतापर्यंत शिस्तबद्ध रित्या तपास झाला तसाच तपास होऊन सर्व आरोपींना योग्य शासन होणे आवश्यक आहे. तरच अवैध धंद्यांकडे पैशाच्या मोहापायी ओढली जाणारी तरुण पिढी धसका घेईल, आणि पोलिसांची त्यांच्या मनात भीती राहील.