*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच समूह प्रमुख ज्येष्ठ लेखक कवी पांडुरंग कुलकर्णी यांची अप्रतिम वृत्तबद्ध काव्यरचना*
*===। बेहोशिका। ===*
वृत्त : उध्दव ( 2.8.4 मात्रा )
कवि पांडुरंग कुलकर्णी
बेहोशित कविता करतो
तुम्हाला शेकायाला
तो गरम तवाही होतो ..१
लागता भूक काव्याची
चांदण्यांस बोलावीतो
चंद्राची भाकर घेवून
तो खुशाल खाया बसतो.२
सूर्याचा फोडुनी कांदा
सांजेची सलाड घेतो.
ताऱ्यान्चा बैंगन भर्ता
तो खुशाल चुरुनी खातो.३
मेघांच्या मधाळ धारा
धारोष्ण जणू गायीचे
त्या सागर थाळीमध्ये
तो काला वरपून खातो.४
सप्तर्षी वरून बघती
ध्रुवाच्या तोंडी पाणी.
आणाया सर्वा खाली
तो गरुडाला पाठवतो…५
मग अंगत पंगत त्यांची
सर्वांना घेवून जमते
कोकिळा श्लोक गाताना
तो त्यात रंगुनी जातो..६
पांघरे शाल कुरणाची
वर वेलफुलांची नक्षी
लेवून विजेचा हार
तो जोशाने चमचमतो…७
गडगडे साथ मेघांची
सळसळे साथ सरितेची
धबधब्यात नहात असता
तो आकान्डतान्डव करतो..८
बगळ्याच्या लेवून माळा
हत्तीला कवेत घेतो
मोराच्या वरती बसुनी
तो स्वर्गी निघून जातो..९
ह्या बडबड बाता त्याच्या
पुरे जाहल्या आता
याचना क्षमेची करूनी
तो मूळ स्वभावी येतो..१०
*= पांडुरंग कुलकर्णी =*