You are currently viewing पाडलोस-केणीवाडा येथे दागिने साफ सफाई करण्याच्या बहाण्याने फिरणाऱ्यांना दणका…

पाडलोस-केणीवाडा येथे दागिने साफ सफाई करण्याच्या बहाण्याने फिरणाऱ्यांना दणका…

एक ताब्यात, दुसरा पळून जाण्यास यशस्वी…

बांदा

पाडलोस-केणीवाडा येथे एकाच वेळी तीनवेळा दागिने सफाई करण्याच्या बहाण्याने फेऱ्या मारणाऱ्या बिहार येथील जुलफान अली नामक संशयिताला सतर्क ग्रामस्थांनी पकडले. तर त्याचा दुसरा मन्सूर नामक सवंगडी पळून जाण्यात यशस्वी झाला. बांदा पोलिसांनी घटनास्थळी येऊन त्या संशयिताला ताब्यात घेतले. अधिक तपास बांदा पोलीस करीत आहे.

यावेळी पोलिस पाटील रश्मी माधव, पाडलोस तंटामुक्त समिती माजी अध्यक्ष महेश कुबल, युवासेना मळेवाड विभाग प्रमुख समीर नाईक, माजी ग्रा.पं. सदस्य हर्षद परब, पाडलोस सोसायटी व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक, माजी सरपंच अमिषा पटेकर, ग्रामस्थ अमोल नाईक, गौरेश पटेकर, बबलू नाईक, गोकुळदास परब, अविनाश गावडे, महेश नाईक, अंकुश पटेकर, मयुरेश नाईक, एकनाथ कुबल, आनंद कुबल, बाळा ठाकूर, ओमकार नाईक आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

मंगळवारी सकाळी 11 वाजताच्यासुमारास जुलफान अली व मन्सूर हे दोघेजण दागिने, मूर्ती, तांब्याची भांडी साफसफाई करून देण्यासाठी पाडलोस केणीवाडा येथे आले होते. त्यांनी एकाच घरी तीन वेळा फेऱ्या मारल्याने गौरेश पटेकर यांना संशय आला. त्यांनी तात्काळ याची खबर तंटामुक्त समिती माजी अध्यक्ष महेश कुबल यांना दिली. त्यांनी ग्रामस्थांना जमवत त्या दागिने सफाई करणाऱ्यास बोलावून घेतले. दूरवरून त्याच्या साथीदाराने सर्व पाहून त्याने तेथूनच धुम ठोकली व फोन बंद केला. पकडलेल्या जुलफान अली याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे संशयास्पद मिळाल्याने ग्रामस्थांनी पोलीस पाटील रश्मी माधव व बांदा पोलिस ठाण्याशी संपर्क साधला.

ग्रामस्थांनी त्याच्याकडील साहित्याची तपासणी केली असता चार डबी मध्ये वेगवेगळे वस्तू होते. तसेच शाम्पू, कलर मेंदी, तारीख संपलेली पावडरची पाकिटे मिळाली. मुख्य म्हणजे खोटे आधार कार्ड बनविलेले सापडल्याने ग्रामस्थांचा संशय बळावला व त्यांनी पोलिसांना बोलाविले. बांदा पोलिसांनी घटनास्थळी येत त्या संशयिताला ताब्यात घेतले. पळालेल्या दुसऱ्या संशयिताचा शोध घ्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली. तर ग्रामस्थांनी अशा कोणत्याही अनोळखी व्यक्तीला घरी घेऊ नये व सतर्क राहावे असे आवाहन बांदा पोलिस संजय हुंबे यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा