भिरवंडे गावातील शेतकऱ्यांना मोफत भात बियाणे वाटप
कणकवली
भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा हा देशातला शेतकरी आहे. त्यामुळे आमच्या गावचा शेतकरी विकसित झाला पाहिजे हाच आमचा ध्यास असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू असे प्रतिपादन शिवसेना नेते सतीश सावंत यांनी केले भिरवंडे विविध कार्यकारी सेवा सोसायटी आणि शिवसेनेच्या माध्यमातून भिरवंडे तसेच गांधीनगर ग्रामपंचायत क्षेत्रातील शेतकऱ्यांना मोफत भात बियाणे वाटप करण्यात आले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, उपतालुकाप्रमुख हेमंत सावंत, गावच्या सरपंच सुजाता सावंत, पंचायत समिती सदस्य मंगेश सावंत,सोसायटीचे चेअरमन बेनी डिसोजा, व्हाईस चेअरमन शेखर सावंत, गांधीनगर सरपंच मंगेश बोभाटे, उपसरपंच राजेंद्र सावंत, नागेश सावंत,महेंद्र सावंत, शासकिय य़ेकेदार संजय सावंत, प्रकाश घाडीगांवकर, श्रावण मेस्त्री, प्रमोद दळवी, मंगेश सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. श्री. सावंत म्हणाले, सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा विकास व्हावा असा आम्ही ध्यास घेतला आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या रोप वाटपाचा कार्यक्रम झाला. मिरची रोप वाटप, वांगी रोपवाटप, हळद बियाने वाटप असे विविध वाटप केले. यंदाही शेतकऱ्यांना भात बियाण्याबरोबर विविध प्रकारच्या रोपांचे वाटप केले जाणार आहे. शेतकऱ्यांनी आपल्या बांधावर बांबू लावावेत, शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहनही करण्यात आले.
भिरवंडे विकास सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भात बियाण्याबरोबर यंदा खत विक्रीही केली जाणार आहे. मात्र, शेतकऱ्यांना रत्नागिरी आठ या जातीचे भात बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला. कोकण कृषी विद्यापीठ निर्मित हे बियाणे गावातील प्रत्येक शेतकऱ्याने पेरणी केल्यानंतर त्याला चांगल्या पद्धतीने उत्पादन मिळेल. त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल असे मत श्री. सावंत यांनी यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार सावंत यांनी केले तसेच आभार राजेंद्र सावंत यांनी मानले.