You are currently viewing पाडलोस कालव्यावरील उखडलेल्या रस्त्यावर दुचाकीला अपघात होऊन तरुण जखमी

पाडलोस कालव्यावरील उखडलेल्या रस्त्यावर दुचाकीला अपघात होऊन तरुण जखमी

रस्त्याच्या खडीकरण-डांबरीकरणाबाबत ग्रामस्थांची नाराजी…

बांदा

पाडलोस कालव्यावरील उखडलेल्या रस्त्यावर काल रात्रीच्या सुमारास दुचाकीस्वार रामू गावडे यांचा अपघात झाला. खडीकरण केलेल्या ठिकाणी खड्डे पडल्याचा अंदाज न आल्याने दुचाकी खड्ड्यात रुतली अन आपण रस्त्यावर कोसळलो. या अपघातात डाव्या हाताला किरकोळ जखम झाली असल्याचे अपघातग्रस्त रामू गावडे यांनी सांगितले.
पाडलोस-बामणवाडी येथील रामू गावडे नेहमी प्रमाणे कामावरून घरी येत असताना शनिवारी रात्री 9.15 वाजताच्यासुमारास कालव्यावरील खडीकरण केलेल्या ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांचा अंदाज आला नाही. अचानक गाडी खड्ड्यात जाऊन रुतली व तोल जाऊन आपण पडलो. या अपघातात डाव्या हाताला किरकोळ जखम झाल्याचे श्री. गावडे यांनी सांगितले.
दरम्यान, बांदा-शिरोडा मार्गावरील पाडलोस मधील कालव्याच्या पुलावरील रस्त्याचे काम करून पंधरा दिवसांचा कालावधी उलटला नाही तोवर रस्ता उखडला. रस्ता किमान वर्षभर तरी टिकणे आवश्यक आहे. कामावर अधिकाऱ्यांचा झालेला दुर्लक्ष वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. ठेकेदार काम करताना दर्जात्मक काम करत नाहीत आणि अधिकारी याकडे दुर्लक्ष का करतात असा सवाल वाहनचालकांतून होत आहे. तसेच दुसरा अपघात होण्यापूर्वी रस्त्याचे पुन्हा खडीकरण व डांबरीकरण करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा