*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सौ.शारदा मालपाणी यांचा अप्रतिम ललित लेख*
*🖊️🌹ओढ कधी संपत नाही*
*रम्य सांजवेळी क्षितिजावर केशरी रंगाची उधळण मनाला किती सुखावते.. क्षितिजावर सागर किनारी धरती नभाच्या मिलनाचा आभासही मनात आनंदाच्या लहरी निर्माण करतो.. उन्हे तिरपी कलतात गोधन घरी परतून येते ..*
*खरंच हा सारा निसर्ग किती विविधरंगी विविधढंगी जादूगर कोण याचा निर्माता ? हा प्रश्न नेहमीच भेडसावणारा… चांदण्यात उसळणाऱ्या सागराच्या शुभ्रधवल फेसाळ लाटा ..तो वालुकामय किनारा.. घरट्यात परतण्यासाठी लगबगीत उडणारे पक्षी.. नीरव शांतता मंत्रमुग्ध मन … मावळतीला संधिप्रकाश पसरला अशा कातर वेळी स्मृती गंधाच्या फुलांचा दरवळ …त्या पावसालाही वसुंधरेच्या मिलनाची किती ओढ असते.. आभाळातून वसुंधरेला भेटायला खाली येतो आणि वसुधेला पावसात चिंब चिंब भिजवतो …अशा कातरवेळी तुझ्या सवे घालवलेल्या त्या सुगंधी क्षणांचा स्मृतिपटलावर जणूकाही आलेखच मांडलाय … तुझ्यासवे घालवलेला प्रत्येक क्षण माझ्या हृदय पटलावर कोरलेला.. किती ती कातरता …आतुरता भेटीची एक ओढ अनाकलनीय ..मनामध्ये विचारांचे जलतरंग उठतात ..त्या चंद्राला चांदण्यांच्या भेटीची असते आस…तो वासरमणी पण गेलाय त्याच्या कुटुंबाला भेटायला दिवसभर तापून थकलेल्या देहाला विसावा देण्यासाठी स्थिरावण्यासाठी… दुसऱ्या दिवशी तेजाचा वर्षाव करण्यासाठी.. सांजावतांना चंद्र आणि तारकांची सभा नभांगणात भरते.. त्यांच्यात काय संवाद होत असेल .. कोणत्या गुजगोष्टी चालल्या असतील हा एक प्रश्न कधीही न उलगडणारे कोडेच…. पौर्णिमेचा चंद्र किती आकर्षित करतो त्या तारकांना त्यांनाही ओढ असते मिलनाची ..चंद्राच्या शीतल प्रकाशात चिंब चिंब भिजण्याची …धरणीला प्रकाशमय करण्याची.. तसेच एक अनामिक ओढ मनात असते सख्याला सखीची ..साजनाला साजनीच्या भेटीची… हृदयात कालवाकालव मनात विचारांचे काहूर ..किती ती अगतिकता जरासा दुरावाही जणूकाही दुःखाचा डोंगरच. …हृदयाच्या मखमली कप्प्यात साठवलेल्या त्या आठवणींचे फुलपाखरू हवेवर तरंगत तरंगत मधुकण* *वेचण्याच्या आनंदात गुंग सैरभैर झालेलं…. खरंच हा निसर्ग* *किती किती सुंदर ..निर्मल स्वच्छ जल घेऊन सागराला भेटायला अधीर झालेली सरिता* .. *नभांगणी झुलणारा सप्तरंगी इंद्रधनुचा तो हिंदोळा.. ते उंच उंच डोंगर…हा हिरवागार निसर्ग जणू साद घालतो भेटण्यासाठी*..
*या निसर्गात ईश्वरीशक्तीचे दर्शन घडते. साजना तुझा हात माझ्या हाती अन ही निसर्ग भ्रमंती एका वेगळ्याच भावविश्वात घेऊन जाते..*
*श्वासाचे चाले स्पंदन*
*हृदयात अनाहत नाद*
*मनही घाली निसर्गाला*
*अंतरातून एक साद …*
*ही निसर्गाची किमया ,नवलाई ,हिरवाई ,अविष्कार बघण्याची ओढ कधी संपतच नाही.*
*🖊️🌹 सौ.शारदा मालपाणी*
*(काव्य शारदा)*
*सर्वाधिकार सुरक्षित©️®️*
*9420122216*