You are currently viewing वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्राला मानाचा “सर्वोत्कृष्ट संशोधन केंद्र” पुरस्कार

वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्राला मानाचा “सर्वोत्कृष्ट संशोधन केंद्र” पुरस्कार

कोकण कृषी विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात गौरव

वेंगुर्ले

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली यंदा आपले सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. या विद्यापीठा अंतर्गत कोकण विभागामध्ये एकूण १६ संशोधन केंद्रे कार्यरत आहेत. या संशोधन केंद्रामध्ये शेतीविषयक संशोधन आणि विस्तार कार्य करण्यात येते. विद्यापीठाने सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त या संशोधन केंद्रांपैकी उत्कृष्ठ संशोधन केंद्राला पुरस्कार द्यावयाचे निश्चित केले होते. आणि त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्राला हवंमानाचा “सर्वोत्कृष्ट संशोधन केंद्र” पुरस्कार जाहीर झाला. या पुरस्काराचे वितरण कोकण कृषी विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कोकण कृषी विद्यापीठाने हा पुरस्कार देताना संशोधन केंद्राने निर्माण केलेल्या विविध जाती, शेतकऱ्यांसाठी दिलेल्या शिफारशी, केंद्राने उत्पादित केलेली कलमे / रोपे, मिळविलेले आर्थिक उत्पन्न केलेले विस्तार कार्य, कार्यरत शास्त्रज्ञांनी प्रसिद्ध केलेले लेख / पुस्तके / घडीपत्रिका, संशोधन केंद्रावर निर्माण केलेल्या सोयीसुविधा, बहिस्त संस्थांकडून मिळविलेले संशोधन प्रकल्प आणि निधी, संशोधन केंद्राची तत्परता आणि कार्यक्षमता या विविध अंगांचा विचार करुन सर्व संशोधन केंद्रांकडून प्रस्ताव मागविलेले होते. पुरस्काराकरीता संशोधन केंद्रांच्या प्रस्तावांची छाननी प्रथम विद्यापीठ स्थरावर व नंतर राष्ट्रिय स्तरावरील शास्त्रज्ञांकडून करण्यात आली.

या सर्व चाचण्यांमधून प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला या केंद्राची उत्कृष्ट संशोधन केंद्र म्हणून निवड करण्यात आली. सदर पुरस्कार विद्यापीठाचा सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन कार्यक्रमात डॉ. ए. के. सिंग, उपमहानिदेशक, भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांचे हस्ते आणि डॉ. एस. एस. मगर, माजी कुलगुरु डॉ. संजय सावंत, आजी कुलगुरु आणि इतर मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कार रु. पाच लाख रोख आणि सन्मानचिन्ह असे त्याचे स्वरुप आहे. प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला या केंद्राच्या या दैदिप्यमान वाटचालीत डॉ. बी. एन्. सावंत, सहयोगी संशोधन संचालक आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे योगदान आहे. केंद्राला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल डॉ. बी. एन्. सावंत यांचे सर्व स्तरावरुन कौतूक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा