You are currently viewing यशोगाथा सैनिक स्कूल अंबोलीची सिंधुदुर्गच्या उज्वल सैनिक परंपरेची

यशोगाथा सैनिक स्कूल अंबोलीची सिंधुदुर्गच्या उज्वल सैनिक परंपरेची

महाराष्ट्रातील तरुणांच्या मनात सैन्य दलात भरती होण्यासाठी बालवयातच आकर्षण निर्माण व्हावे व त्याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मविश्वास, शौर्य, सांघिकवृत्ती देशभक्ती व नेतृत्व आदी गुणांची जोपासना व्हावी या हेतूने ऑक्टोबर 2003 साली आंबोली येथे सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली या इंग्रजी माध्यमाच्या निवासी व अनुदानित शाळेची स्थापना झाली. सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट एक्स – सर्व्हिसमेन असोसिएशन या माजी सैनिक संघटनेमार्फत चालविण्यात येणारी ही एकमेव सैनिक शाळा आहे. सुरुवातीपासूनच शाळा व संस्थेने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्ता विकासास महत्त्व देत अनेक पथदर्शी उपक्रम राबविण्यास सुरुवात केली. शासनाच्या धोरणानुसार राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ निर्धारित अभ्यासक्रमासोबतच संरक्षण शास्त्र हा अतिरिक्त विषय समाविष्ट करण्यात आला. शाळेचे वेळापत्रक सकाळी 5.30 ते सायंकाळी 10 असे तयार करण्यात आले. संगणक, नेतृत्व विकास, सामान्यज्ञान, गटकार्य, प्रश्नमंजुषा अशा अनेक विषयांसाठी अतिरिक्त तासिका वापरण्यात आल्या. तसेच प्रगत युद्धशास्त्रांमध्ये वापर होत असलेल्या, इलेक्ट्रॉनिक्स, बिनहत्यारी कवायत, नकाशा वाचन, आत्मसंरक्षण, सामान्य सेवा माहिती, भाषण – संभाषण, समाजसेवा, अतिथी व्याख्याने आदी अनेक विषयांचे मार्गदर्शन केले जात आहे. शालेय अध्ययन – अध्यापनात संगणकाचा प्रभावी वापर करून ई-लर्निंग सारख्या उपक्रमातून शाळा अधिक समृद्ध झाली. एक तास वाचनाचा या उपक्रमाद्वारे दररोज विद्यार्थ्यांना ग्रंथालय भेटीचे आयोजन केल्याने विद्यार्थी पुस्तक वाचनात रमू लागले.

गत 19 वर्षाच्या कालावधीत संस्था व शाळा या दोहोंनी संख्यात्मक वाढीबरोबरच गुणात्मक दर्जा कायम राखला आहे. मार्च 2009 ते मार्च 2021 या तेरा वर्षाच्या कालखंडात शाळेच्या एस. एस. सी. चा निकाल 100 टक्के लागला आहे. तर एच. एस. सी. चा निकाल शंभर टक्के लागतोय. या शाळेत अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने भारताचा आदर्श, जबाबदार नागरिक आणि भावी सेनाधिकारी घडविण्यासाठी अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत.

भारत सरकारच्या रक्षा मंत्रालयामार्फत सेवा निवड समिती (एसएसबी) द्वारे उच्च पदस्थ अधिकारी निवडीसाठी आजपर्यंत शाळेचे 20 विद्यार्थी निवडले गेलेत. नॅशनल डिफेन्स अकॅडमी (एनडीए) ची खडतर राष्ट्रीय पातळीवरची परीक्षा आतापर्यंत तेरा विद्यार्थ्यांनी क्रॅक केली आहे. शाळेचा विद्यार्थी कॅडेट रोहित शिंदे हा आज लेफ्टनंट म्हणून जम्मू काश्मीर येथे सेवा बजावत आहे. आज अखेर 20 विद्यार्थी भारतीय सैन्यदलामध्ये दैदिप्यमान सेवा बजावताना शाळेचे नाव उज्वल करीत आहेत. शाळेचे अनेक गुणवंत विद्यार्थी वैद्यकीय अभियांत्रिकी, मर्चंट नेव्ही, तंत्रज्ञान, व्यवस्थापन, अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावत आहेत. शाळेतून शिक्षण घेतलेले शेकडो विद्यार्थी विदेशात आपले कौशल्य दाखवीत आहेत. विविध क्रीडा प्रकारात शाळेच्या क्रीडापटूंनी राज्यस्तरावर सोबतच राष्ट्रीय पातळीवरही आपल्या कौशल्याची चमक दाखविली आहे. शाळेच्या विस्तीर्ण मैदानावर विविध इनडोअर व आउटडोअर खेळ प्रकार शिकवले जातात. विद्यार्थ्यांच्या क्रीडा नैपुण्याबद्दल राज्य शासनाच्या क्रीडा विभागामार्फत पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये धाडस आणि सहसीवृत्ती निर्माण करण्यासाठी विविध साहसी आणि नेतृत्व विकास खेळांची प्रात्यक्षिके घेतली जातात. जंगल ट्रेनिंग, रॅपलिंग, रॉक क्लायम्बिंग, ट्रेकिंग हॉर्स रायडिंग, आणि आॅबस्टिकल (अडथळा) शर्यत असे साहसी खेळ प्रकार शिक्षकांद्वारे शिकविले जातात. अर्थ मॅरेथॉन स्पर्धेत शाळेच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पारितोषिक प्राप्त केले आहे.

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी इंग्लिश संभाषण, गटचर्चा, नेमबाजी, अश्वारोहण, वादविवाद स्पर्धा, समस्या निवारण, सामान्यज्ञान, संगीत, क्षेत्रभेटी, अतिथी व्याख्याने आदी उपक्रम आयोजित केले जातात. शाळेला संरक्षण दलातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या असून शाळा व संस्थेच्या विविध समाजोपयोगी उपक्रमांचे विशेष कौतुक केले आहे दरवर्षी साजरा केला जाणारा वर्धापनदिन हा गणवेशधारी अतिथीच्या उपस्थित होतो. ही शाळा निवासी असून विद्यार्थ्यांना पुरेसा संतुलित आहार पुरविण्यात येतो. शाळेचे निवासी डॉक्टर विद्यार्थ्यांच्या वाढ व विकासाकडे विशेष लक्ष ठेवून असतात. जैवविविधतेने समृद्ध अशा आंबोलीच्या निसर्गरम्य परिसरात सैनिकी प्रशिक्षण देणारी ही शाळा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मानबिंदू ठरलेली आहे. विद्यार्थ्यांसाठी सर्व सोयीयुक्त असे वसतीगृह व भोजनकक्ष असून अद्ययावत प्रयोगशाळा, व्यायामशाळा, वैद्यकीय अधिकारी कक्ष, संगणक कक्ष, ग्रंथालय स्कूल बस सुविधा अशा विविध सोयी-सुविधा संस्थेने अल्पावधीत उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. प्रतिवर्षी प्रजासत्ताक दिनी जिल्हा मुख्यालय येथे विद्यार्थी संचालन करतात. देशाच्या संरक्षणासाठी भावी सैनिक घडविण्याचे काम नियोजनबद्ध रीतीने व्यवस्थापन, प्रशासन, शाळेचे कमांडंट, प्राचार्य, शिक्षक आणि प्रशिक्षक करीत आहेत.

कोव्हीड -19 या विषाणूजन्य साथीच्या रोग प्रसारामुळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदीच्या काळात संस्था व शाळेचे खूप आर्थिक नुकसान झाले. परंतु या कालावधीत शाळेने सुरुवातीला Learning from Home ही संकल्पना अत्यंत कल्पक पद्धतीने राबविली. झूम ॲप द्वारे सर्व विद्यार्थ्यांना सर्व विषय ऑनलाइन पद्धतीने विविध तंत्रज्ञानाचा वापर करून शिकविले. दिशा ॲप, ई-बालभारती, Talking Banks आदी माध्यमांचा प्रभावी वापर शिक्षकांनी अध्यापनात केला. Google, Classroom, Google from, link, YouTube आदी पर्यायांचा प्रभावी वापर करून अध्ययन-अध्यापन पद्धतीने अधिक मनोरंजक करण्यात आली. गैरहजर विद्यार्थ्यांच्या पालकांना फोनद्वारे संपर्क करून शिक्षण प्रवाहात आणण्यात आले. साथरोग आटोक्यात येतात प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यात जिल्ह्यात प्रथम पुढाकार घेणारी सैनिक स्कूल ही पहिली शाळा होती हे ही नमूद करावे लागेल.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी कोणतीही तडजोड न करता त्याचा शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी संस्थेने नेहमीच पुढाकार घेतला आहे. अनेक आव्हाने स्वीकारत जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील नामवंत सैनिक शाळा घडविण्याचा संस्थेचा मानस आहे. यासाठीच समाजातील दानशूरांनी पुढे येणे गरजेचे असून संस्थेचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यात आपला खारीचा वाटा उचलणे क्रमप्राप्त ठरते. शाळेच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा!!

प्रतिक्रिया व्यक्त करा