You are currently viewing झेलू शकते वार नव्याने

झेलू शकते वार नव्याने

*मराठी बालभारती, थीम सॉंग्स, शॉर्ट फिल्म आदींसाठी उत्कृष्ट काव्य लेखन केलेल्या नंदुरबार येथील गझलकारा सौ.सुनंदा भावसार यांची अप्रतिम गझल रचना*

झेलू शकते वार नव्याने
कर तू आता ठार नव्याने

नियती फिरून तापवते का
झाले होते गार नव्याने…

बनवल्यास का नवीन खिडक्या
कुठे उघडले दार नव्याने

आत्म्याची जर गरज भासली
मलाच आता मार नव्याने !

उतरवतो की चढवतोस तू…
कळतच नाही भार नव्याने

हासत दोन्ही घेऊ शकते
हार फुलांचा,हार नव्याने

वरवर दिसते नवीन सारे
जुनाच अवघा सार नव्याने

©®सुनंदा सुहास भावसार
नंदुरबार

प्रतिक्रिया व्यक्त करा