सावंतवाडी :
बाल वैज्ञानिक स्पर्धेत योगेश जोशी चे यश मुंबई विज्ञान अध्यापक मंडळाच्या वतीने आयोजित डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत राणी पार्वतीदेवी हायस्कूलचा विद्यार्थी कुमार योगेश विवेकानंद जोशी यांनी कोल्हापूर विभागातून सुवर्णपदक प्राप्त केले. त्याच्या या यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ कडून त्याचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष विकास सावंत यांच्या हस्ते त्याला गौरविण्यात आले. संस्थेचे सचिव व्ही. बी. नाईक, खजिनदार सी एल नाईक, शाळा समिती अध्यक्ष डॉक्टर दिनेश नागवेकर, संचालक अमोल सावंत चंद्रकांत सावंत सौ छाया सावंत योगेश जोशी यांचे आई-वडील नवनिर्वाचित संचालक सतीश बागवे, उपमुख्याध्यापक शेखर नाईक, माजी उपमुख्याध्यापिका सोनाली सावंत व इतर मान्यवर उपस्थित होते. सत्कार प्रसंगी योगेशने स्पर्धेसाठी सुरेखा संस्थेच्या श्रीमती सुषमा केणी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे सांगितले.
तसेच एस. पी के. कॉलेजचे प्रा. डॉक्टर देठे, प्रा.डॉक्टर गणेश मर्गज, डॉक्टर शिवराम पई, आर.पी.डी. प्रशालेचे मुख्याध्यापक जगदीश धोंड, शिक्षक दशरथ शृंगारे, प्रल्हाद सावंत व आई-वडिलांचेही मार्गदर्शन लाभल्याचे सांगितले. सुमारे ३७ हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. लेखी प्रात्यक्षिक, प्रकल्प व मुख्य व मुलाखत अशा चार टप्प्यात ही स्पर्धा होते. त्यातून ०.७५ टक्के विद्यार्थी हे बक्षीस पात्र ठरतात. योगेशने “दैवत्व देऊन राखीव ठेवलेली झाडे” या विषयावर प्रकल्प केलेला होता. त्यासाठी त्यांनी माजगाव, ओटवणे, कारिवडे, शिरशिंगे, वेरले, शेरले, असनिये, तांबोळी, आदी गावांना भेटी देऊन तेथील झाडांचा अभ्यास केला होता. स्पर्धेचे बक्षीस वितरण ठाणे के. ई.एम. हॉस्पिटलचे रेडिओलॉजिस्ट डॉ. सतीश पांडे यांच्या हस्ते झाले.