You are currently viewing बांदा – शेर्ले ब्रीजचा जोडरस्ता तातडीने न केल्यास आंदोलन

बांदा – शेर्ले ब्रीजचा जोडरस्ता तातडीने न केल्यास आंदोलन

भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब यांचा इशारा

बांदा

बांदा तेरेखोल नदीवर ब्रीजचे बांधकाम करण्यात लघुपाटबंधारे विभागाने मुळातच जाणीवपूर्वक उशीर केला. सध्या पावसाळा तोंडावर असून ब्रीजच्या दुतर्फा जोडरस्ता पूर्ण करण्यात संबंधित ठेकेदार टाळाटाळ करीत असल्याचा आरोप बांदा ग्रा. पं. सदस्य तथा भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब यांनी केला आहे.

ते म्हणतात, गेल्या अनेक वर्षापासून बांदा तेरेखोल नदीवर ब्रीज व्हावा हे येथील दशक्रोशीतील जनतेची मागणी होती. यासाठी बांदा व शेर्ले भागातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी यासाठी लढा दिला. अथक प्रयत्नानंतर लघु पाटबंधारे विभागाच्या कालव्याचे पाणी वेंगुर्ल्यापर्यन्त देण्यासाठी पाईप लाईनची गरज भासली. सदर पाईपलाईन ब्रीज उभारुन नेण्याची मागणी प्रशासनाने मान्य करुन ब्रीज उभारला.

ब्रीजचा फायदा येथील जनतेला होण्यासाठी ब्रीजच्या दुतर्फा जोडरस्ता होण्याची गरज आहे. ब्रीजच्या जोडरस्त्यासाठी मातीची भर मिळत नाही हा युक्तिवाद हास्यास्पद आहे. तसेच टाकलेली माती पुराबरोबर वाहून बाजारपेठेत घुसण्याचा धोकाही आहे. त्यामुळे जोडरस्ता करण्याचे काम तत्काळ हाती घ्यावे. अन्यथा भाजपाच्या माध्यमातून जन आंदोलन उभारण्याचा इशारा जावेद खतीब यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा