You are currently viewing कहाणी

कहाणी

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी हेमंत कुलकर्णी यांची अप्रतिम कथा

ध्यानस्थ बसलेल्या धोंडूला पहात चंची पार हरखून गेली होती.मनातल्या मनात आनंदाने मोहरून कौतुकाने एकटक त्याच्याकडे ती पहात होती.धोंडूची समाधी लागली होती.थोड्या वेळाने त्याने हळूहळू डोळे उघडले.समोरील शिवलिंगावर त्याची दृष्टी स्थिरावली होती. आजपर्यंतचा सगळा जीवनप्रवास लख्खपणे त्याच्या डोळ्यांसमोर उभा राहिला होता.
जन्मापासूनच तो या वनात वावरत होता. आधी बापाच्या खांद्यावर बसून, नंतर स्वतःच्याच पायाने त्याने अख्खं जंगल अनेकदा पालथं घातलेलं होतं. त्यामुळे त्याला इथल्या रानवाटा, श्वापदांच्या जागा, त्यांच्या वेळा, झाड-पाला, फळे, त्यांचे ऋतू अशी जंगलाविषयची खडान् खडा माहिती होती. जन्मताच त्याची आई गेल्यामुळे बापानेच त्याला वाढवले. धोंडू वयात आल्यावर एके दिवशी बाप दूर असलेल्या धोंडूला घेऊन त्याच्या मामाकडे जायला निघाला.सात डोंगर पार करून ते दोघे त्या रानात पोहोचले. धोंडूच्या मामाशी बोलून, ‘चंची’ या मामाच्या मुलीशी धोंडूचं लग्न लावून तिघे परत आपल्या राहत्या वनातल्या झोपडीकडे परतले. धोंडू आणि चंची सुखाने संसार करत होते.
एकदा धोंडू रानातल्या दुसर्‍या टोकाला मध आणायला गेला असताना साप चावून बाप मरून पडला. धोंडूवर आभाळच कोसळलं. झोपडीच्या मागच्या बाजूला एक मोठा खड्डा खणून त्याने बापाला तिथेच पुरले. आता चंची आणि धोंडू दोघेही एकमेकांचा आधार बनले. त्यांच्यातलं नातं आणखीनच घट्ट झालं. दोघे अगदी दोन देह एक आत्मा असे वागत.
चित्रवर्मा राजाचा पुत्र ‘चित्ररथ’ त्या रानात अधुनमधून शिकारीसाठी येत असे.धोंडू रानातील मूलनिवासी तसेच त्याला जंगलाची असलेली इत्थंभूत माहिती त्यामुळे राजपुत्राचे सैनिक वाटाड्या म्हणून नेहमी धोंडूला बोलावून घेत. चित्ररथाच्या रथाबरोबरच धोंडू धावे आणि मार्गदर्शन करित असे. एके दिवशी जामानिम्यासह शिकारीवर असताना सकाळपासून दुपारपर्यंत काहीच हाती लागलं नाही. ते सगळे आता रानाच्या पार दुसर्‍या टोकाला एका दरीच्या जवळ येऊन पोहोचले होते. राजपुत्र दमला होता पण रिकाम्या हाती परतण्यास तयार नव्हता. दरीच्या खालच्या बाजूला धोंडू कधीच गेलेला नव्हता. पण राजपुत्राच्या हट्टापायी तिथे जायचे ठरले. त्याप्रमाणे सगळे उतरून दरीच्या खालच्या अंगाला आले. चित्ररथाची पुरती दमछाक झाली होती. जवळच एक पुरातन असे भग्न शिवालय दिसले. सगळ्यांना तिथेच विसावण्याची त्याने आज्ञा केली.
धोंडू तो परिसर आणि शिवालय पाहून जरा हरखूनच गेला होता. पर्ण पाचोळ्याने झाकलं गेलेलं शिवलिंग त्याला तिथे दिसलं. पाचोळा दूर करताच शिवलिंगाचं तेज पाहून तो स्तिमीत झाला. आयुष्यात पहिल्यांदाच तो शिवलिंग पाहत होता. त्याने राजपुत्राला त्याच्या भाषेत विचारलं “महाराज हे काय आहे?” एका दुभाष्यामार्फत त्यांचा संवाद सुरू होता.”अरे, हे एक जीर्ण, पुरातन असं शिवलिंग आहे.”राजपुत्र उत्तरला. धोंडूने विचारले, “मला हे खूपच अलौकिक आणि तेजस्वी भासतंय, मी हे माझ्याबरोबर नेऊ का?” राजपुत्र म्हणाला,”खुशाल ने. आमच्या राजधानीत आणि आसपासच्या नगरात याहीपेक्षा तेजःपुंज शिवलिंग नि भव्य अशी शिवालये आहेत.नित्यनेमाने शिवाराधना होत असते आमच्या राज्यात. पण तू तर या जंगलात राहणारा. तुला जमणार आहे का नित्यनेम?.” राजपुत्राने असे म्हणताच एकच हशा पिकला. सगळे सैनिक कुचेष्टेने हसू लागले, कुजबुजू लागले. धोंडूला नागर भाषेतले संवाद काही कळत नव्हते. तो चित्ररथाच्या पायाशी लागला व म्हणाला, “महाराज! मला यातलं खरंच काही माहिती नाही, कळत नाही. आपणच माझे मार्गदर्शक, माझे गुरू आहात. आपण जसे सांगाल तसे मी करीन. नाही जमले तर प्राणत्याग करीन.” राजपुत्रालाही कुणीतरी ‘गुरू’ वगैरे म्हटल्यामुळे गंमतच वाटत होती. त्याच्या एकूण राहणीमानाचा विचार करता, त्याने धोंडूला नित्यनेमाचा विधी सांगितला. तो म्हणाला,” दररोज शुचिर्भूत होऊन, स्मशातून चिताभस्म आणून शिवलिंगावर विलेपन करावे. नंतर दृष्टी शिवलिंगावर ठेऊन ‘ॐ नमः शिवाय’ असा जप करीत ध्यानस्थ व्हावे.ध्यानधारणा झाल्यावर शिवाला नैवेद्य अर्पण करावा. हा नित्यनेम सर्वकाळ करावा. खंड पडू देऊ नये. खंड पडला तर तुझ्यासारखा करंटा तूच!” गुरूची आज्ञा मान्य करून तो ते शिवलिंग घेऊन घरी आला आणि चंचीला सारा वृत्तांत सांगितला. चंची देखील तेजस्वी शिवलिंग पाहून मनोमन आनंदली होती.
सर्वव्यापी, सर्वसाक्षी शिव-पार्वती कैलासावरून एकांतात भक्तीचा हा प्रकार पहात होते. पार्वतीने शंकराला विचारले,”काहीच उमगले नसताना तो भिल्ल जे करू पाहतोय त्याला भक्ती म्हणता येईल? शंकर उत्तरले,”होय! त्या भिल्लाने राजपुत्राला गुरू मानले. गुरू प्रति कसलीही शंका न घेता केवळ गुरू आज्ञेचं पालन करणे, ही श्रेष्ठ अशी गुरूभक्ती आणि ईश्वरभक्ती सुद्धा आहे.” पार्वती म्हणाली,”मग आता परीक्षाही घेणारच असाल?” शिव-पार्वती नियतीच्या चक्राची वाट पाहू लागले.
त्या विस्तीर्ण जंगलाला पाच वेगवेगळ्या राज्यांच्या सीमा असल्यामुळे, सीमा भागांजवळ आसपासच्या पंचक्रोशीतील स्मशाने होती. युद्ध, श्वापदे, सर्प, विंचू, रोगराई अशा अनेक कारणांमुळे धोंडूला चिताभस्म मिळण्यास कधी अडचण भासली नाही.त्यासाठी रोज स्मशानात जाऊन चिताभस्म आणण्यासाठी त्याला फारशी पायपीट करावी लागत नसे. तो परते पर्यंत चंची देखील नैवेद्याची तयारी करून ठेवायची.कधी एखादी पारध मिळे तर कधी नुसतीच कदान्ने किंवा फळे तर कधी कधी तृणधान्ये. निसर्गाचे देणे देवाला अर्पण! पण त्या दोघांची श्रद्धा आणि भाव मात्र अगदी शुद्धच होता.
नित्यक्रमाने आजही धोंडू सकाळी लवकर उठला आणि चिताभस्म आणण्यासाठी स्मशानाच्या वाटेने निघाला. ग्रीष्माची काहिली कोण म्हणत होती. गर्द निबीड वनातही रखरख जाणवू लागली होती.ओढ्यातले पाणी आटले होते. पशुपक्षीही कातावले होते. रणरणत्या उन्हाच्या वेळी, दारातच चंची धन्याच्या वाटेकडे डोळे लावून उभी होती. खरं तर या वेळेपर्यंत पूजा-ध्यान आटपून नैवेद्यही व्हायचा. विचारांच्या गर्तेत उंबर्‍यावर उभी असतानाच तिला शिंक आली आणि कधी नव्हे ते मनात शंकेची पाल चुकचुकली. ‘अरेरे! आज मनाला असे अस्वस्थ का वाटते आहे?’ डाव्या डोळ्याची पापणी लवलवू लागली. अपशकुनांची मालिकाच सुरू झाल्यासारखे तिला वाटू लागले. तिच्या जीवाला नुसता घोर लागला होता. आपला धनी सुखरूप घरी परतावा म्हणून ती शिवाची मनोभावे प्रार्थना करू लागली.
दोन प्रहरी तिला धोंडू परतताना दिसला, तसे तिला हायसे वाटले खरे पण निराश होऊन खालमानेने परतलेल्या धन्याकडे पाहताच तिच्या काळजात अगदी धस्स झाले.आज रानातील सगळ्या मसणवाटा तुडवून सुद्धा त्याला चिताभस्म काही मिळाले नव्हते. गेले वर्षभर आचरलेले व्रत आज मात्र भंग पावणार असे चित्र आता निर्माण झाले होते. राजपुत्राचे शब्द आज त्याला पुन्हा पुन्हा ऐकू येत होते,”जर नेम चुकला तर तुझ्यासारखा करंटा तूच” थोडा वेळ तो तसाच शांत होता आणि मनाचा निश्चय पक्का करत तो चंचीला म्हणाला, “प्रिये! वाईट वाटून घेऊ नकोस. मी जे व्रत अंगिकारले आहे, त्यात मी जिवंत असेपर्यंत खंड पडू देणार नाही. त्यामुळे मी आता या सरणामध्ये बसून अग्निप्रवेश करतो. माझ्या देहाचं भस्म घेऊन तू माझ्या व्रताची सांगता कर” हे ऐकून चंची हसतच म्हणाली,” अहो एवढीशीच गोष्ट आहे ना? आणि त्यासाठी तुम्ही देहत्याग करणार? तुम्ही एवढी वणवण तरी का केलीत? अजिबात काळजी करू नका आणि निराश सुद्धा होऊ नका. मी तुमची अर्धांगिनी आहे. त्यामुळे तुमचे कार्य तेच माझेही. मी झोपडीत बसते. तुम्ही ही झोपडीच पेटवून द्या. माझ्या देहाच्या भस्माने आपले व्रत आज पूर्ण करा आणि अखंडितपणे रोज करत रहा.”
चंचीचे हे बोलणे ऐकून धोंडू गहिवरला आणि म्हणाला,”तुला या घरात आणताना मामा आणि इतर बांधवांना वचन दिलं होतं की तुझी काळजी घेईन, तुझं रक्षण करेन. मी तुला कधी काहीही होऊ देणार नाही. हे माझं व्रत आहे, माझा नेम आहे. त्यासाठी मी तुझा बळी नाही देऊ शकत. आज आपली संसारयात्रा संपली, असे समजून मला निरोप दे.” त्यावर ती ठामपणे म्हणाली,”तुम्ही दिलेल्या वचनाचीच मी तुम्हाला परत आठवण करून देते. तुम्हीच म्हणाला होता की माझ्या ईच्छेविरूद्ध तुम्ही कधीच काही करणार नाही.आपल्या नात्यात आपल्या दोघांमध्ये माझ्या मताला प्राधान्य आजवर तुम्ही देत आलात.आज मी तुमची अर्धांगिनी म्हणून अहेवपणाची माझी ही शेवटची ईच्छा नव्हे, नव्हे हट्टच आहे असं समजा आणि मला तुमच्या आधी जाऊ द्या.” असे म्हणून ती तडक झोपडीत शिरली आणि दार लावून घेतले. धोंडूने दाराबाहेरून तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण चंचीने आज त्याला निरुत्तर केले होते. त्याचाही नाईलाज झाला. दोघांच्याही परस्परांवरच्या प्रेमाची परिणिती आज त्यागाची परीक्षा पाहत होती. चूड त्याने झोपडीला लावली आणि वणवा मात्र त्याच्या अंतरंगात पेटला. ‘ईश्वरेच्छा बलियसी’ असे म्हणून धोंडू काही काळ स्तब्ध झाला होता.
सर्वदर्शी शिवपार्वती हा सगळा प्रसंग पहातच होते. न राहवून पार्वती म्हणाली, “नाथ! पुरे करा आता. ‘आशुतोष’ म्हणजे लवकर प्रसन्न होणारे, म्हणून ख्याती तुमची. किती परीक्षा पाहणार?” देवांनी फक्त स्मित केले आणि देवीकडे पाहिले. देवीलाही मौनातले मर्म उमगले.
धोंडूने चंचीच्या चितेचे भस्म गोळा करून प्रसन्नचित्ताने पिंडीवर विलेपन केले.आज अंमळ उशीरच झाला होता. आज ध्यानमग्न होताना काहीतरी अद्भुत होते आहे, असे त्याला जाणवले. ध्यानमग्नतेतून समाधी अवस्थेत तो कधी गेला, त्याचे त्यालाच कळले नाही.किती काळ लोटला याचेही त्याला भान राहिले नाही. जाणीव आणि नेणिवेच्याही पलिकडे तो पोहोचला. इहलोकाचा त्याला अगदी विसरच पडला.हळूहळू तो समाधीतून जागा झाला. त्याने सावकाश डोळे उघडले. समोरील शिवलिंग आज त्याला नेहमीपेक्षाही तेजःपुंज आणि विस्मयकारक भासत होते. आतून असीम आनंदाचा, नवचैतन्याचा अनुभव दाटून आला होता. ईश्वरप्राप्तीची अनुभूतीच जणू त्याच्या आसपास व्यापून उरली होती. कळिकाळाचेही भान उरले नव्हते.स्मरण आणि विस्मरण सगळ्याच्याच पलिकडे तो गेला होता.
आता नैवेद्यासाठी नेहमीप्रमाणे त्याने चंचीला साद घातली खरी पण अंतरातली कळ बाहेर यावी तसा तो भानावर आला. नुकत्याच शिवलिंगावर विलेपिलेल्या भस्मातील चंचीच्या आठवणीने त्याचे डोळे भरून आले. आणि…….भरलेल्या डोळ्यांपुढे त्याला चंची नैवेद्याचं ताट घेऊन उभी असलेली दिसू लागली. ईश्वरलीला, चमत्कार की दिवास्वप्न, धोंडूला काहीच कळेना. तशी ती जवळ येऊन बसली. धोंडूच्या मनातील प्रश्न चंचीने त्याच्या चेहर्‍यावरच वाचले. ती म्हणाली,”धनी! मी झोपडीत शिरले आणि डोळे मिटून निपचीत पडून राहिले. तुम्ही बाहेरून काय बोलताय ते मला काहीच नीट ऐकू येत नव्हतं.थोड्या वेळाने झोपडीच्या भोवती आणि माझ्याही आसपास ज्वाळा भडकलेल्या मला दिसल्या पण मला त्यांचा दाह काही जाणवलाच नाही. नंतर मला झोप लागली आणि आता तुम्ही साद घातलीत, तशी मी जागी झाले. पहाते तर काय, ही झोपडी पूर्वीसारखीच. मी केलेला नैवेद्यही तसाच. तुमच्या हाकेसरशी लगोलग नैवेद्य घेऊन आले.” तिचं बोलणं ऐकतानाच एकीकडे धोंडूच्या नेत्रधारेने लिंगावर अभिषेक सुरू होता. आता दोघांनीही शिवाची मनोभावे प्रार्थना केली. त्याचे आभार मानले. नैवैद्य दाखवला. प्रसाद भक्षण केला आनंदी झाले. वनातला सुखी संसार संपवून परमगतीला प्राप्त झाले.
जसा त्या दोघांना तो भोळासांब प्रसन्न झाला तसा तुम्हा-आम्हा होवो. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

—हेमंत कुलकर्णी,
मुलुंड, मुंबई

प्रतिक्रिया व्यक्त करा