You are currently viewing सोनुर्ली- वेत्ये रस्ताच गोलमाल

सोनुर्ली- वेत्ये रस्ताच गोलमाल

जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत रात्रीच्या वेळेस डांबरीकरण

पावसाचे आगमन हे मिरगाच्या दहा दिवस अगोदर होण्याची हवामान खात्याने शक्यता वर्तवली आहे, त्यामुळे सावंतवाडी तालुक्यातील गावागावातील डांबरीकरणाची कामे आटोपण्यासाठी ठेकेदारांची धावपळ सुरू आहे. सावंतवाडी तालुक्यातील माजगाव परिसरातील मुख्य रस्त्याचे सुरू असलेले काम बोगस झाल्याची तक्रार पुढे येत असतानाच सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली वेत्ये मार्गाचे डांबरीकरण जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत रात्रीच्या वेळी सुरू असून त्यामध्ये गोलमाल असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.
सोनुर्ली माऊली मंदिर ते वेत्ये व्यक्ती था या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम जोरात सुरू आहे परंतु बऱ्याच ठिकाणी डांबरीकरणाची कामे बोगस होत असल्याच्या तक्रारी पुढे येत असतानाच सोनुर्ली वेत्ये या रस्त्याचे काम ठेकेदाराने रात्रीच्या वेळेत सुरू ठेवून कामात गोलमाल करत असल्याचा आरोप संबंधित गावातील ग्रामस्थानी केला आहे. या रस्त्याच्या डांबरीकरणाची चौकशी होऊन रस्ता कामात झालेल्या गोलमालाची शहानिशा करावी अशी मागणी ग्रामस्थ व वाहन धारक करत आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात केलेली डांबरीकरणाची बरीचशी कामे ही निकृष्ट दर्जाची होत असल्याचे प्रत्येक वेळेस समोर येत आहे. पावसाच्या तोंडावर होणारी डांबरीकरणाची कामे बरेचदा पहिल्याच पावसात खडी उखडून वाहून जातात. अशा वेळेस कोकणात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे डांबरीकरण खराब होत असल्याचे संबंधीतांकडून सांगण्यात येते. परंतु कमिशनच्या नादात केलेली कामे निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरल्यामुळे वाहून जातात ही सत्य परिस्थिती आहे. ज्या ठिकाणी तपासणी करावयाची आहे त्या ठिकाणी डांबरीकरणाची जाडी मापात ठेवली जाते, त्यामुळे बऱ्याचदा जनतेच्या पैशातूनच केलेल्या कामांमधून जनतेच्या डोळ्यात धूळफेक होत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या कामांबाबत नागरिकांनी तसेच लोकप्रतिनिधी, नेते यांनी जागरूकपणे लक्ष देऊन जनतेच्या हिताची कामे करून घेणे आवश्यक आहे. ज्या ज्या ठिकाणी डांबरीकरणाच्या कामाच्या तक्रारी येतात त्याची उच्चस्तरीय चौकशी होऊन संबंधितांवर कठोर कारवाई केली जावी अशीही मागणी होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा