जिल्हाध्यक्ष वसंत मुसळे यांचे शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याचे सूतोवाच !
देवगड :
आजचा दिवस दुहेरी आनंद देणारा असून तुम्ही सर्वजण माझ्यापेक्षा वयाने मोठे आहात. हा सन्मान माझ्या हस्ते होत असताना मन भरून आले आणि कृतार्थ होण्याचे भाग्य लाभले असे कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. प्रवीण तुकाराम सनये यांनी तांबळडेग येथील श्री देव महापुरुष रंगमंच येथे ज्येष्ठांच्या सन्मानार्थ आयोजित अध्यक्षस्थानावरून बोलताना म्हणाले.
यावेळी प्रा. डॉ. प्रवीण सनये पुढे म्हणाले कि, ज्येष्ठ नागरिकांसाठी निसर्ग उपचार केंद्र, विरंगुळा केंद्र निर्माण करून त्याचा लाभ ज्येष्ठांना मिळवून देण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज असून शासनाच्या योजनांचा एकत्रित लाभ मिळाला पाहिजे असे नमूद केले.
प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात सामाजिक कार्यकर्त्या रेशमी रविंद्र कांदळगावकर यांच्या सुमधुर स्वागतगीताने करण्यात आली.
याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे जिल्हाध्यक्ष वसंत मुसळे, सौ. वैजयंती मुसळे, सरपंच अनिता कोचरेकर, माजी नायब तहसीलदार मनोहर पालयेकर, मुंबई मनपा माजी जनसंपर्क अधिकारी शिवा इंगोले, ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कांदळगावकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष शामसुंदर सनये आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी संस्थेचे सचिव नरेंद्र राजम यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेऊन पुढील उपक्रम राबविण्याचा मनोदय व्यक्त केला. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे जिल्हाध्यक्ष वसंत मुसळे यांनी सांगितले कि, प्रथम तुम्ही स्वतःला म्हातारे समजू नका ! ज्येष्ठांच्या आरोग्यासाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन करून शासनाच्या योजना कशाप्रकारे घ्याव्या यावर मार्गदर्शन करताना मुसळे यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निधी उपलब्ध आहे. त्याचा फायदा करून घेण्यासाठी तांबळडेग नागरिक संस्थेने प्रयत्न करावेत यासाठी गावच्या सरपंचांच्या माध्यमातून अटी व शर्थी पूर्ण करून फायदा घ्यावा. अर्थात यासाठी जिल्हा संघटना आपल्या सोबत आहे. तिचं नेहमीच सहकार्य असेल अशी ग्वाही देतो असे सूतोवाच केले.
यावेळी गणेशमूर्तीकार चंद्रकांत चोपडेकर, बुवा मोहन कुबल, सेवानिवृत्त शिक्षक प्रभाकर राजम, सामाजिक कार्यकर्ते महादेव तथा बाळ केळुस्कर आदींसह महिला, पुरुष ज्येष्ठ नागरिकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यक्रमासाठी उमेश शिरवडकर, प्रमोद कांदळगावकर, घनश्याम कुबल यांचं सहकार्य लाभले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सचिव नरेंद्र राजम , खजिनदार देवानंद केळुस्कर, प्रा. सुभाषचंद्र सनये , अशोक सनये यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सत्यवान तथा भाऊ सरवणकर यांनी केले.