अवैद्य धंद्यात ओढल्या जाणाऱ्या तरुणांची जबाबदारी पालकांची नव्हे का

पोलीस प्रशासनावर बोट दाखवणे योग्य आहे का?

संपादकीय……

सावंतवाडीत अवैद्य धंद्यांना ऊत आलेला असून अवैद्य धंद्यातून अनेकांनी गाड्या घेतल्या, बंगले बांधले आणि त्यांचं वैभव पाहून कित्येक तरुणांना कमी वेळेत मिळणाऱ्या बक्कळ पैशांचा मोह झाला. त्यातूनच काही तरुण मुले, नुकतीच कॉलेज विश्वात पाय ठेवणारी कोवळी मुले गैरधंद्यांकडे आकर्षित होऊ लागली. पैशांच्या मोहापायी ही तरुण मुले दारू वाहतूक, विक्री, मटका यासाठी काम करू लागतात. सहज मिळणाऱ्या पैशांमुळे मुलांना जुगार, दारू, ड्रग्स अशी व्यसने लागतात. त्यामुळे व्यसनाधीन झालेल्या या मुलांकडून नशेच्या धुंदीत गुन्हे घडतात.
अवैद्य धंद्यांमध्ये गुंतणाऱ्या आणि गैरमार्गाने पैसे कमावणाऱ्या या मुलांची खरी जबाबदारी कोणाची? पालकांचे आपल्या तरुण मुलांप्रती काहीच कर्तव्य नाही का? मुलांच्या हट्टापायी त्यांना महागडे मोबाईल, गाड्या, आणि चैनीसाठी पैसे देणाऱ्या, त्यांच्या वागण्याकडे, फिरण्याकडे, रात्री अपरात्री घराबाहेर राहण्याकडे, रात्री नशेत घरी येण्याकडे दुर्लक्ष करण्याऱ्या पालकांचा दोष नाही का?
अवैद्य धंद्यांमध्ये गुंतणारी आपली मुले कोणाच्या संगतीत फिरतात? रात्री रात्री बाहेर राहून काय करतात? याकडे कानाडोळा करताना अशा तरुणांचे पालक आपला मुलगा बिघडला की त्याचं खापर मित्रांवर आणि गैर धंद्यांमध्ये घुसला म्हणून पोलीस प्रशासनावर फोडून मोकळे होतात. कुठल्याही तरुण मुलांची जबाबदारी ही प्रथम पालकांची असते, त्यांनी आपल्या पाल्याला चांगल्या मार्गावर न्यायचे असते. परंतु काही पालक आपला मुलगा रात्री अपरात्री आला तरी आपल्या हातावर रोजचेच ५००/१००० रुपये ठेवतो त्यावर खुश होत, आपला मुलगा काय करतो याकडे दुर्लक्ष करतात आणि त्यांची तरुण मुलं पूर्णपणे गैरधंद्यांच्या मार्गावर जाऊन व्यसनाधीन होऊन स्वतःची वाट लावून घेतात.
अशा निर्धास्त पालकांना हेही माहिती असतं की, त्यांची मुले कुठे अडकली तरी त्या मुलांचा गॉडफादर त्यांना सोडवून आणणार. परंतु जेव्हा ही तरुण मुले गैरधंद्यात अडकून व्यसनाधीन होऊन गंभीर गुन्हा करतात तेव्हा मात्र निर्धास्त असणारे पालक आपल्या चुकीचे खापर पोलीस प्रशासनावर फोडून पोलिसांवर आरोप करायला मोकळे होतात.
सावंतवाडीत अलीकडे घडलेल्या गुन्ह्यांमध्ये जी कोवळी तरुण मुले दिसून येतात, भोसले उद्यानच्या पार्किंगमध्ये काळ्या काचा लावलेल्या गाड्यात बसून व्यसनं करतात, नको ते उद्योग करत दिवसरात्र फिरतात, पॉम्पस समोरच्या टपरीवर सिगारेट ओढत दारू व्यवसायिकांसोबत रात्री उशिरापर्यंत बसतात, त्यांच्यासोबत गैरधंद्यांसाठी फिरतात याला पोलीस प्रशासन जबाबदार की आपल्या पाल्यावर आपला वचक नसल्याने बिघडलेल्या मुलांचे पालक जबाबदार?
तरुण कॉलेजकुमार मुलांच्या बिघडलेल्या भविष्यासाठी आजकाल तरुण मुलांकडे दुर्लक्ष करणारे पालक सर्वात जास्त जबाबदार असून पालकांनी आपल्या कामातून, नोकरीतून काहीवेळ आपल्या पाल्यासोबत घालवून पाल्याच्या वागणुकीवर, रात्री अपरात्री फिरण्यावर बंधन घालून चांगल्या मार्गावर जाण्यासाठी वेळ देणे आवश्यक आहे. आपल्या स्वतःच्या मुलाला पालक जर योग्य दिशा देऊ शकत नसतील तर पोलीस असो वा अन्य कुणीही तरुणांना योग्य दिशा देऊ शकणार नाहीत.
आपल्या तरुण मुलांप्रती आपली जबाबदारी ओळखून पालकांनी त्यांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे… तरंच पाल्याचे भविष्य उज्वल घडेल आणि ते गैरमार्गावर जाणार नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा