You are currently viewing ही वेळ युवकावर का आली?

ही वेळ युवकावर का आली?

कोरोना….बेरोजगारी….. वाढती महागाई…..गुन्हेगारी प्रवृत्तीस कारण?

विशेष संपादकीय….

राजघराण्याचा वारसा लाभलेलं सुशिक्षित सुसंस्कृत लोकांचे शहर…सावंतवाडी. दादागिरी गुन्हेगारी प्रवृत्ती शहराने कधी पोसलीच नाही. कोकणातील शांत, निसर्गसंपन्न शहर म्हणून सावंतवाडीत व्यवसाय नोकरीसाठी आलेला नोकरदार, व्यापारी वर्ग देखील सावंतवाडी शहराच्या प्रेमात पडून इथेच विसावतो. पूर्वीपासून उच्च शिक्षणाची सोय असलेलं शहर त्यामुळे इथला तरुण शिकून नोकरी व्यवसायात स्थिरावला, अनेकांनी देश विदेशात जात शहराचे नाव उज्वल केलं. साहित्याचाही शहराला वारसा लाभलेला आहे. श्रीमंत बापूसाहेब महाराजांच्या पावन भूमीला आजही श्रीमंतांची भूमी म्हणून ओळख आहे. शहरातील विठ्ठल मंदिर, आत्मेश्वर मंदिर, हनुमान मंदिरे, राजघराण्याचे पाटेश्वर देवस्थान व ३६४ खेड्यांचा अधिपती उपरलकर अशा अनेक मंदिरांनी पवित्र असणाऱ्या सावंतवाडी शहरात एका तरुणाच्या डोक्यात केवळ सोन्यासाठी खुनासारखे वाईट कृत्य करण्याची वेळ यावी यापेक्षा दुर्दैव ते काय?

ही वेळ का आली?

सावंतवाडी शहरातील युवा पिढी आज झटपट पैशांच्या हव्यासापोटी भटकली आहे हे त्रिवार सत्य आहे. शिकून सुशिक्षित झालेले अनेक युवक आज अवैध धंद्यांमधून कमी श्रमात मिळणाऱ्या झटपट पैशांसाठी गुन्हेगारीकडे वळलेली आहे. अवैध धंद्यातून बक्कळ पैसा आणि प्रॉपर्टी उभारलेल्या काही राजकीय व्यक्तींनी आपल्या स्वार्थासाठी शहर आणि परिसरातील युवकांना पैशाचे आमिष दाखवत अवैद्य धंद्यांमध्ये ओढले आहे. एका एका रात्रीत मिळणाऱ्या पाच पाच हजार रुपायांच्यासाठी तरुणाई गुन्हेगारीमध्ये फसत चालली आहे. मटका, जुगार, दारू आदी धंद्यांमध्ये बरबाद झालेली युवा पिढी आज चरस, गांजा आदी व्यवसायांमध्ये खोलवर रुतत चालली आहे.
एकीकडे अशाप्रकारे अवैध धंद्यांमध्ये युवक फसत असतानाच शहरातील अवघ्या ३२ वर्षांच्या दोन मुलांचा बाप असलेल्या एका युवकाने गेली दीड वर्षे कोरोनाच्या प्रकोपात बाजारपेठ बंद राहिल्याने पूर्णपणे विस्कळीत झालेली व्यवसायाची घडी, “अच्छेदिन चे वादे” करणाऱ्या सरकारच्या फसवे दिन मध्ये भरमसाठ वाढलेली महागाई, आणि बोकाळलेली बेरोजगारी आदी कारणांमुळे कर्जबाजारी होत पैशांची भासणारी चणचण, घराची जबाबदारी, आदी कारणांमुळे केवळ किरकोळ किमतीच्या सोन्याच्या वस्तूसाठी दोन निरपराध वृद्ध महिलांचा खून केला?
बेकारी, कर्ज आणि घर चालविणे, बायको मुलांचे पालनपोषण करण्यासाठी एक साधा मुलगा जो उंदीर मारायलाही घाबरतो तो निर्घृणपणे खून करण्यासारख्या प्रवृत्तीकडे कसा काय वळतो? हा टोकाचा निर्णय तो घेतो? हे प्रश्न मात्र नक्कीच गांभीर्याने आज देशाची काय स्थिती होत चालली आहे, सर्वसामान्य जनता जगण्यासाठी काय काय करण्यापर्यंत विचार करू लागली आहे, याचा विचार करायला भाग पाडतात.
डिजिटल इंडियाचे स्वप्न उराशी बाळगून लाखो रुपये खर्च करून उच्च शिक्षण घेत डिग्री, डिप्लोमाची प्रमाणपत्रे लॅमीनेशन करून अनेक युवक नोकरीच्या शोधात उशाशी घेऊन झोपताहेत. देशातील जनता सरकारी नोकरीसाठी आंदोलने,उपोषणे करत आहे तर सरकार मात्र निद्रिस्तपणाचे सोंग घेऊन खाजगिकरणाकडे वाटचाल करत आहे. त्यामुळे नोकरीमध्ये असणाऱ्या व्यक्तींना देखील आपल्या नोकरीची शाश्वत्ती राहिली नाही आणि देशात लाखो रोजगार, नोकऱ्या देणार अशी खोटी आश्वासने देत रोजच्यारोज तरुणाईची फसवणूक होत असल्याने तरुणाईचा सरकारवर विश्वास तर राहिलाच नाही परंतु तरुणाईची जीवनाकडे पाहण्याची दृष्टी देखील बदलली आहे. सुखाचे भास होणारी तरुणाई आज पैशांच्या मोहापायी आभासी दुनियेकडे वाटचाल करत असून त्यातूनच नैराश्येपोटी संकटातून मार्ग निघत नसल्याने तरुणाई अनैतिक धंदे आणि खुनासारखे विघातक कृत्य करून आपल्या आयुष्याची तर राखरांगोळी करतातच…..परंतु आपल्या कुटुंबियांना देखील ताठ मानेने जगणे मुश्किल करून ठेवतात.
एक चूल एक मूल या संकल्पनेमुळे अनेक कुटुंबात एक दोनच मुले असतात. शिक्षण,कामधंदे, व्यवसाय, नोकरी अशा एक ना अनेक कारणांनी मुले बाहेरगावी जातात, घरात वयस्कर आई-वडील एकटेच राहतात. काही स्त्रियांचे पती सैनिक आहेत, परदेशात नोकरीला आहेत, त्यामुळे शिक्षणासाठी आपल्या मुलाला घेऊन शहरात वास्तव्य करतात. कितीतरी मुली शिक्षणासाठी खोल्या घेऊन भाड्याने राहतात, अशावेळी पैशांसाठी, सोन्यासाठी एकट्या राहणाऱ्या व्यक्तींच्या घरात घुसून लूट, खून पडू लागले तर भविष्यात जीवन जगणे कठीण होऊन बसेल. एखादी वाईट घटना घडताना शेजाऱ्यालाच लोक हाक मारतात, मदतीसाठी याचना करतात, परंतु सावंतवाडीत घडलेल्या घटनेत शेजाऱ्यानेच घात केलेला पाहता, शेजार धर्मावरील विश्वास देखील टांगणीला लागला आहे. शेजारीच मदतीला धावून येतील ही आशा बाळगण्याच्या वेळी शेजाऱ्यानेच खून केल्यावर शेजारधर्म हा शब्दच गहाण पडला आहे. अशावेळी एकट्या राहणाऱ्या व्यक्तींच्या, स्त्रियांच्या मनात एक भीती निर्माण झाली आहे. रात्रीच्यावेळी आपला मुख्य दरवाजा उघडा तर राहिला नसेल ना? याची लोक रात्री मध्यरात्री उठून देखील खात्री करत आहेत.
सावंतवाडीत घडलेल्या एका घटनेमुळे अनेक शंकाकुशंकांना उत आला आहे.
कोरोनामुळे देशात, राज्यात अगदी गावागावात सर्व उद्योग व्यवसाय, किरकोळ दुकाने देखील बंद राहिली. सरकारी नोकरी वगळता इतरांनी जगायचं कसं? हा प्रश्न सर्वांसमोर आ-वासून उभा राहिला. आयुष्यभर जमवलेली पुंजी खर्च करून कसेबसे लोकांनी अर्धपोटी राहत घरसंसार चालवले. परंतु हाताच्या पोटावर घर चालवणाऱ्या अनेकांचे हाल अगदी कुत्र्यालाही नकोत असे झाले. इज्जतीने पैसे कमावणारे कोणाकडे उधार मागू न शकणारे इज्जत सांभाळत कसेबसे जगले, परंतु ज्यांना आपला संसार चालवायचा होता, आज ना उद्या काम करून पैसे कमवू अशी आशा असणाऱ्या कित्येकांनी सावकारी कर्ज देणाऱ्यांकडून उधार कर्जाऊ पैसे घेतले. तारण न ठेवता घर चालविण्यासाठी बँका पैसे देत नाहीत, त्यामुळे सावकारी कर्ज थकले की ते लोकांच्या मागे लागतात, त्यामुळे कर्जफेडी हाच पर्याय समोर असणारे युवक मात्र खुनासारख्या घृणास्पद निर्दयी कृत्याकडे वळतात.
कोरोना काळात सर्व व्यवहार बंद होते, काही महिने वगळता बँकांचे हफ्ते देखील सुरूच होते, ज्यांनी पैसे उशिरा भरले त्यांच्याकडून व्याजासहित वसुली देखील केली, देशात सरकारने टॅक्स माफी तर केली नाही, म्हणजे वसुली सर्वच ठिकाणाकडून सुरू होती परंतु कोरोनाच्या काळात देश चालविण्यासाठी पैसा कमी पडतो म्हणून इंधनाचे दर वाढले, महागाई गगनाला भिडली…. अगदी पेजपाणी, डाळ-भात देखील लोकांना खाणे मुश्किल होऊन बसले. दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईने देशातील जनता मेटाकुटीस आली. खायचं काय आणि कसे? हे प्रश्न जनतेच्या मनात घर करू लागले. नोकऱ्या गेल्या, व्यवसाय बंद पडले त्यामु बेरोजगारी वाढत गेली आणि जगण्यासाठी माणूस संघर्ष करू लागला. जो तरला, ज्याने दर्या पार करून गेला तो सुटला…परंतु कर्जाच्या डोंगराखाली दबलेला, कुटुंबाच्या काळजीने व्याकूळ झालेला, अन्नाला महाग झालेला, गरिबीने पोळलेला मात्र सरकारी महागाईचा बळी ठरला….काहींनी स्वतःचे जीवन संपवले…काही मानसिक ताण-तनावाने जीवनातून मुक्त झाले तर कोणी स्वतः जगण्यासाठी दुसऱ्याला संपविले…
कायद्याच्या आणि जनतेच्या नजरेत गुन्हा करणारे, गुन्हेगारीकडे वळणारे हे गुन्हेगारच आणि दोषी देखील….परंतु त्यांना गुन्ह्याकडे का वळावे लागले, त्यांनी आपल्या भूतकाळात कोणता गुन्हा केला होता का? अगदी रागाने तरी कोणाच्या कानशिलात आवाज काढला होता का? अशा प्रश्नांचा देखील विचार करणे आवश्यक आहे. समाजात साधे सरळ व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असणारी एखादी व्यक्ती सामान्य वाटणाऱ्या गोष्टींसाठी असामान्य गुन्हा करतात तेव्हा त्या गुन्ह्याकडे वळविणारी समाज यंत्रणा आणि सर्वसामान्य जनतेसाठी अत्यंत कठीण काळ जात असतानाही जनतेला आधार देण्यापेक्षा सर्वच प्रकारची महागाई वाढवून जनतेला जगण्यासाठी संघर्ष करायला लावून मरणाच्या खाईत लोटणारे सरकार दोषी नाही का?

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 − two =