You are currently viewing कणकवली शहराला पाणीटंचाई भेडसावण्याची शक्यता

कणकवली शहराला पाणीटंचाई भेडसावण्याची शक्यता

नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकार्‍यांनी वेधले जलसंपदा विभागाचे लक्ष

संबंधित विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद

कणकवली :

गडनदीपात्रातील पाण्याची पातळी या वर्षी एकदम कमी झाली आहे. कणकवली शहरातील नळयोजना या नदीपात्रातील पाण्यावर अवलंबून असते. मात्र यावर्षी नदीपात्रातील केटी बंधाऱ्यांना लावलेल्या प्लेट या योग्यप्रकारे लावल्या नं गेल्याने साठवलेले सर्व पाणी वाहून गेले. यामुळे कणकवली शहरातील नळयोजनेला पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कणकवली शहराला जेमतेम पाच ते सहा दिवस पुरेल एवढाच पाणी साठा जॅकवेल कडे उपलब्ध आहे. त्यामुळे शिवडाव धरणाचे पाणी नदी पात्रात सोडा अशी मागणी कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे व मुख्याधिकार्‍यांनी जलसंपदा विभागाकडे केली आहे.
यासंदर्भात नगराध्यक्ष समीर नलावडे व बंडू हर्णे यांनी संबंधित अधिकाऱ्यांचे देखील लक्ष वेधले आहे. मुख्याधिकारी यांनी देखील यासंदर्भात संबंधित विभागाशी पत्रव्यवहार केला असून शिवडाव धरणाचे पाणी तातडीने सोडवे अशी मागणी केली आहे. कणकवली शहरातील नळयोजनेच्या जॅकवेल जवळ असलेल्या पाणीसाठ्यात यावर्षी बंधाऱ्यातील पाणी वाहून गेल्याने मोठी घट झाली. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांनंतर कणकवली शहरात ही समस्या निर्माण झाली आहे. कणकवलीतील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा तुटवडा भासू नये यादृष्टीने नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी तातडीने हालचाली केल्या असून, संबंधित विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. दरम्यान शिवडाव धरणाच्या खालील भागात नदीपात्रालगत च्या गावांना कल्पना दिल्यानंतर लगेच पाणी सोडण्यात येणार आहे. मात्र शिवडाव धरणातील हे पाणी खाली येण्यासाठी किमान पाच ते सहा दिवस जाण्याची शक्यता आहे. यावर्षी केटी बंधाऱ्यांच्या प्लेट योग्य प्रकारे न लावल्याने ही समस्या निर्माण झाली. मात्र याबाबत तातडीने हालचाली सुरू करण्यात आल्याचे श्री नलावडे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा