You are currently viewing आरोग्य विभागाकडील बाह्यस्त संस्थेमार्फत कंत्राटी कर्मचारी भरती प्रक्रियेत “वसुली”

आरोग्य विभागाकडील बाह्यस्त संस्थेमार्फत कंत्राटी कर्मचारी भरती प्रक्रियेत “वसुली”

दलालांमार्फत उमेदवारांकडून तीन ते चार महिना आगाऊ वेतन घेऊन नियुक्ती दिल्याच्या तक्रारी मनसेकडे प्राप्त

आरोग्य यंत्रणेतील वसुलीबाज “वाझें”वर कारवाईसाठी आरोग्य सचिवांकडे तक्रार करणार..

उपसंचालक आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ कार्यालय अखत्यारीत आस्थापनांमध्ये बाह्यस्त संस्थेमार्फत 3 वर्षांकरिता कंत्राटी पद्धतीवर कर्मचारी भरतीसाठी मे. डी. एम. एंटरप्रायजेस,वाशी-नवी मुंबई या कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ट्रामा केअर सेंटर कणकवली येथे 4 व ट्रामा केअर सेंटर सावंतवाडी येथे 4 तर महिला व बाल रुग्णालय,कुडाळ येथे 23 अशा एकूण 31 कुशल-अकुशल कर्मचारी पुरवठा करण्यासाठी वाशी येथील कंपनीला पुरवठा आदेश देण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार सदर कंपनीच्या कोल्हापूर शाखेतील काही प्रतिनिधींनी उपसंचालक आरोग्य मंडळ,कोल्हापूर व जिल्हा सामान्य रुग्णालय,ओरोस येथील काही भ्रष्ट कर्मचाऱ्यांना हाताशी धरून प्रत्येक उमेदवारांकडून तीन ते चार महिन्यांचे वेतन आगाऊ वसुली करत नियुत्या दिल्याच्या तक्रारी मनसेकडे प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये उमेदवारांकडून पैशांची मागणी करणाऱ्या मोबाईल संभाषण ऑडीओ क्लिप समोर आल्या असून “कुंपणच शेत खात असेल तर दाद तरी कुणाकडे मागावी” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. भरती प्रक्रियेतील भ्रष्टाचाराची संपूर्ण आरोग्य यंत्रणेत चर्चा असून जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांची आर्थिक पिळवणूक करून वसुली करणाऱ्या आरोग्य यंत्रणेतील या भ्रष्ट “वाझें”वर कठोर कारवाई व्हावी अशी कर्मचाऱ्यांची भावना आहे. या प्रकरणी आरोग्य सचिवांकडे तक्रार दाखल करणार असून मनसे वेळप्रसंगी न्यायालयाचे दरवाजे ठोठावू अशी माहिती मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. दरम्यान मनसेच्या या गौप्यस्फोटानंतर जिल्हा आरोग्य यंत्रणा काय कार्यवाही करते हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा